Why want energy bar? | चिक्की नको एनर्जी बार हवा!

चिक्की नको एनर्जी बार हवा!

-भक्ती सोमण

मधल्या वेळी तोंडात टाकायला काहीतरी हवं म्हणून आपण अनेकदा राजगिरा किंवा शेंगदाणे गुळाची चिक्की तोंडात टाकतो. उपवासाला तर चिक्की खाल्ली जातेच.  चिक्की आवडत असली तरी तिला इतर पदार्थांप्रमाणे जरा कमीच गृहीत धरलं जातं. पण आजकाल ही चिक्की फिटनेसप्रेमी लोकांच्या राज्यात एकदम लोकप्रिय आणि महत्त्वाची ठरत आहे.  चिक्कीच्या ऐवजी त्याला एनर्जी बार म्हणतात आता. कमी कॅलरीमध्ये भरपूर प्रोटिन्स मिळविण्याचा उद्देश चिक्की खाऊन साध्य होतो. नव्हे या  एनर्जी बारमुळे साध्य होतो. आपण एरवी भोपळ्याची भाजी केली की त्याच्या बिया फेकून देतो. किंवा मग अळीवाचे लाडू करण्यासाठीच त्या बिया वापरल्या जातात, पण एनर्जी बारच्या बाबतीत याच बिया फार महत्त्वाच्या ठरतात. त्याचबरोबर या एनर्जी बारमध्ये सूर्यफूल, अळशी, अंबाडी, तीळ, कारळे, चिया या बिया वापरल्या जातात. याशिवाय अक्रोड, बदाम यासारखा सुकामेवा वापरतात. चिक्कीसाठी मिर्शण एकजीव करण्यासाठी साखर किंवा गुळाऐवजी मध, खजूर, काळे खजूर यांचा वापर केला जातो. राजगिरा, खसखस यांच्याबरोबर वरीलपैकी कोणत्याही प्रकारच्या बिया भाजून, त्यात खजूर वगैरे एकत्र करून त्यांचे बार केले जातात.  

वेगळेपणा म्हणून त्याच्यात काही जण चोकोपावडरही घालतात. 150 ते 200 उष्मांक मूल्यं या बारमधून मिळतं. बाहेर विकत घेतले तर हे एनर्जी बार 100 रुपयांपासून ते हजार रुपयांपर्यंत उपलब्ध आहेत. 
मध्यंतरी सोनाली खरे या  मराठी अभिनेत्रीनं विविध बिया, अक्रोड आणि चोकोपावडर वापरून एनर्जी बार घरी तयार  केला होता. त्याला समाजमाध्यमांवर लाखो लाइक्स मिळाले होते. काहींनी तर तो करून त्याचे फोटो काढून सोनालीला टॅग केले होते.  दिवाळीच्या काळात खूप गोड खाऊन सुस्तावलेल्या  ‘हेल्थ कॉन्शिअस’ लोकांनी तर आवर्जून हे बार खायला हवे. पूर्वीच्या काळी आजी घरात जे पौष्टीक लाडू, खिरी करायची तेच पदार्थ आज आधुनिक रूपात लोक आवडीनं खाऊ लागले आहेत. आज त्या जुन्या सामग्रीला नवं रूप आल्यानं या पदार्थांना  ‘ग्लॅमर’  आलं आहे. जुनं  ते सोनं म्हणजे हेच की!

(लेखिका ‘लोकमत’च्या मुंबई आवृत्तीत उपसंपादक  आहेत.)

 bhaktisoman@gmail.com

Web Title: Why want energy bar?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.