Who will answer the questions of the children trapped in the house because of corona? | घरात कोंडल्या गेलेल्या मुलांच्या प्रश्नांची उत्तरं कोण देणार?

घरात कोंडल्या गेलेल्या मुलांच्या प्रश्नांची उत्तरं कोण देणार?

- प्रगती जाधव-पाटील


कोरोनाकाळ मोठ्यांसाठी जेवढा त्रासदायक अगदी तसाच तो लहान मुलांसाठीही. रोज शाळेत जाणं, दंगा, अभ्यास, दोस्त कंपनीबरोबरची मजामस्ती अचानक बंद झाल्यानं मुलं गेल्या सात महिन्यांपासून एका विशिष्ट चौकटीतच डांबली गेलीत.

या काळात त्यांना अनेक प्रश्न पडले, मात्र तू लहान आहेस; तुला काय कळणार, असं म्हणत वडीलधाऱ्यांनी वेळ तरी मारून नेली किंवा उत्तरं टाळली. मुलांच्या शेकडो प्रश्नांकडे निव्वळ वैतागून मोठी माणसं दुर्लक्ष करताहेत ही वस्तुस्थिती आहे. यातूनच मुलांमध्ये चिडचिड, एकटेपणाची भावना वाढून ती आक्रमक होऊ लागल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत.

मार्च महिन्यात कोरोनाचा संसर्ग जेव्हा अगदी बाल्यावस्थेत होता. मोठ्यांसह छोटेही गोंधळात पडले होते. शाळेला सुट्टी म्हणजे अभ्यास नाही ही भावना मुलांना प्रचंड सुख देणारी असली तरीही सवंगड्यांना भेटता येणार नाही, याची बोचही त्यांना होती. शाळा सुरू होणार, सगळं पूर्ववत होणार असं म्हणत, अपेक्षा करतच एप्रिल-मे महिन्याच्या सुट्या संपल्या. जूनमध्ये पुस्तकं खरेदी करून शाळेत थेट पुढच्या वर्गात जाण्याचं स्वप्न भंगलं.

याविषयी मुलांनी पालकांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या वयाचं होऊन त्यांच्या मनात डोकावलं तर दिसते एक मोठ्ठी पोकळी आणि नानाविध प्रश्नांचा गोंधळ.

अनेक घरांमध्ये मुलांबरोबर संवाद साधला जात नाही हे वास्तव आहे. ‘मुलं लहान आहेत’ असा टॅग लावून त्यांचं मोठं असणं पालक अमान्य करतात, मोठी माणसं मोकळेपणानं बोलत नाहीत याचं कारण अनेकदा कशाला मुलांना टेन्शन द्या, ते घाबरतील असंही मोठ्यांना वाटतं.

मात्र झालं काय की, कोरोनापूर्व काळात अभ्यास, गृहपाठ, क्लास, खेळ अशा अनेक गोष्टींमध्ये व्यस्त असल्यानं मुलांचा दिवस पटकन संपायचा; पण गेल्या सहा-सात महिन्यांपासून मुलांची व्यस्तता थंडावली. रोज संध्याकाळी घराबाहेर जाऊन खेळण्यावर बंदी आल्यानं त्यांची चलबिचल झाली. फ्लॅट संस्कृतीत राहाणार्‍या मुलांच्या शारीरिक आणि मानसिक व्यथाही अजून जास्त आहेत. पालक कामात आणि मुलं घरात एकटी, खेळायला कुणी नाही, घरबंद. मोठी माणसं संसर्गाच्या भीतीने मुलांना घराबाहेर काढण्यासही कचरत. त्यामुळे तेच घर, त्याच भिंती, तीच माणसं बघूनही मुलांमध्ये टोकाची नकारात्मकता वाढीस लागत आहे. अनेक घरांमध्ये बालक-पालक संवादाची कमतरता आहे, त्यात कोविडच्या दिवसांत अजूनच भर पडली आहे. अवांतर वाचनाची सवय नसलेल्या घरांमध्ये तर कोरोनाचा हा संपूर्ण काळ मुलांना अस्वस्थ करणारा ठरला, आणि अजून पुढे परीक्षा बाकी आहेच..

-------------------------------------------------------------------------------------------------------------

आपण काय करू शकतो?

१. निसर्गनियमानं आपली मुलं रोज मोठी होत असतात, हे मोठ्यांनी मान्य केलं पाहिजे.

२. मोठ्यांसारखंच मुलांचही विश्व आहे, त्यांनाही भविष्याची काळजी आहे. त्यामुळे आपल्या जगात जे काही सुरू आहे, तसंच त्यांचं जगही आहे, अनेक शंका त्यांच्या मनातही घोळतात, त्यांचं समाधान करण्याची जबाबदारी पालकांची आहे. ते सोप्या शब्दांत करता येईल.

३. पालकांनी अनुत्तरित ठेवलेल्या प्रश्नांची उत्तर मुलांनी शोधली तर ती अशास्रीय किंवा बर्‍याचदा घातक स्वरूपाची असण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे त्यांना बोलतं करत त्यांचं ऐकलं पाहिजे. कमी बोला, जास्त ऐका.

४. मुलांबरोबर दिवसभर राहाण्यापेक्षा ठरावीक वेळ काढून मुलांशी बोललं, गप्पा मारल्या तर मुलांची अस्वस्थता कमी होऊ शकते. मोठ्यांनी गप्पा मारणं, प्रश्नांची उत्तरं मोठ्यांकडून मिळणं ही त्यांची नैसर्गिक गरज आहे. मुलांच्या मनातली अस्वस्थतेची कोंडी फोडण्यासाठी मोठ्यांनी ही गरज ओळखणं गरजेचं आहे.

(लेखक सातारा आवृत्तीत उपसंपादक आहेत.)

 

pragatipatil26@gmail.com

Web Title: Who will answer the questions of the children trapped in the house because of corona?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.