Who says this tennis supermom? These are superplayers, this is their story | कोण म्हणतं या टेनीसच्या सुपरमॉम? या आहेत सुपरप्लेअर, त्यांची ही गोष्ट

कोण म्हणतं या टेनीसच्या सुपरमॉम? या आहेत सुपरप्लेअर, त्यांची ही गोष्ट

-प्रतिनिधी

टेनिस कोर्टवर जगण्याचा वेग आणि चापल्य कळतं असं म्हणतात. पण त्या वेगाच्या पुढे स्वत:ला ठेवताना या तीन आयांना काय वाटलं असेल? 
यंदाची अमेरिकन ओपन खास होती. हातजितीच्या पलीकडे खास. त्याचं कारण ठरल्या टेनिस खेळाडू असलेल्या तीन माता. माध्यमांनी जरी त्यांचं वर्णन टेनिस सुपरमॉम असं केलं असलं तरी खरंतर त्या सुपर प्लेअर, त्यांचं आई असणं आणि उत्तम खेळाडू असणं त्यांनी नीट वेगवेगळं ठेवलं. एकाआड एक येत नाही की एकासाठी दुस-याचं भांडवलही केलं जात नाही.
सेरेना विल्यम्स तर सर्वांनाच माहिती आहे. तिची लेक टेनिस कोर्टवर येऊन हरखून जाऊन आईचा खेळ पाहतेय हा व्हिडिओ जगभर व्हायरल झाला. जिला पोटात घेऊन सेरेना कधीकाळी कोर्टवर उतरली होती, ती आज आईला सेमिफायनल गाठण्यासाठी प्रयत्नांची शर्थ करताना पाहत होती. 


मात्र ती मॅचही सोपी नव्हती. समोर होती अजून एक आई, स्वेताना पिरोनकोव्हा. तीचंही मूल लहान आहे आणि अमेरिकन ओपनमध्ये तीही प्रयत्नांची शर्थ करत होती, समोर सेरेना असतानाही. स्वेतानाला पत्रकारांनी विचारलं की, आई झाल्यावर एका टेनिस प्लेअरइतका फिटनेस कसा जमवलास? त्यावर तिनं फार छान उत्तर दिलं आहे, ती म्हणते, 
‘टेनिस कोर्टवर आया दिसतात ते हेच सांगतात की, आई झालेली कुणीही टफच असते. खरं सांगायचं तर तुम्ही मूल जन्माला घालू शकता, तर तुम्ही जगात काहीही करू शकता. बाकी जेव्हा तुम्ही मॅच खेळता तेव्हा मॅच खेळता, घरी गेलं की डायपर बदलता, इतकं साधं आहे हे..!’ त्या साधेपणाच्या जिद्दीतूनच अजून एका आईने सेमीफायनलमध्ये सेरेनाला हरवत थेट अंतिम फेरी गाठली. तिचं नाव व्हिक्टोरिया अंझारेका. २०१३ पासून ती ग्रॅम स्लॅमचं स्वप्न पाहत होती. मातृत्वानंतर तिने टेनिसमधून ब्रेक घेतला होता, पण आता कमबॅक केलं. आणि कमबॅकही काय, तर सेरेनाला नमवत तिनं अंतिम फेरी गाठली. तीन आया, तिघींचे तीन स्वभाव, तिघींचा खेळ वेगळा, पण पॅशन एकच, टेनिस.
त्या टेनिसच्या प्रेमापोटी त्या लेकराबाळांना सांभाळत कोर्टवर उतरतात, तेव्हा फक्त खेळाडू असतात. सुपरमॉम माध्यमं म्हणेनात का, त्या मानवी जगण्याची सारी जिद्द आणि सगळ्या भावना सांभाळत कोर्टवरचा वेग सांभाळतात.. सेरेना, अझांरेका, स्वेताना.. आणि टेनिसची ही गोष्ट, स्वत:च्या मर्यादा ओलांडण्याची वाट स्त्रियांनाच नाही पुरुषांनाही दाखवतेय..

 

 

Web Title: Who says this tennis supermom? These are superplayers, this is their story

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.