Who says home is safe from pollution | कोण म्हणतं तुमच्या घरात प्रदूषण नाही? घ्या ही यादी, तपासा..

कोण म्हणतं तुमच्या घरात प्रदूषण नाही? घ्या ही यादी, तपासा..

-डॉ. सीमा घाटे

आवडता ऋतू कोणता, असा प्रश्न विचारला तर अनेकजण हिवाळा असंच उत्तर देतात. थंडीचे हे दिवस शरीर आणि मनाला खरंच सुखावणारे असतात. पण इतर सर्व गोष्टींसारखे  ‘होते ते दिवस’ अशा भूतकाळात तर हे थंडीचे दिवस गुडूप होणार नाही ना? अशी भीती वाटायला लागली आहे. दिवाळी संपून जरा थंडीची चाहूल लागली की, वातावरणात धूर, धुक्याचं अस्तित्व दिसू लागतं. थंडीनं हुडहुडी नंतर भरते. आधी प्रदूषणाच्या बातम्यांनी थंडीच्या आनंदावर चिंतेचे ढग दाटायला सुरुवात होते. दिल्लीमधील वायूप्रदूषण, चीनमधील स्मॉग हे प्रश्न आपल्याही शहरात लवकरच कधीतरी अवतरतील अशी काळजी वाटू लागते. हल्ली थंडीचे दिवस उगवतात ते अशी प्रदूषणाची काळी चादर ओढूनच. वाढत्या प्रदूषणामुळे घराबाहेर पडण्याचीही भीती वाटू लागते. घराबाहेरच्या प्रदूषणाची काळजी वाटणं, त्यापासून स्वत:चा बचाव करण्यासाठी उपाय करणं हे योग्य आणि स्वाभाविकच. पण प्रदूषण हे फक्त घराबाहेरच असतं असं वाटतं का तुम्हाला?  घरातल्या प्रदूषणाचं काय? त्याबद्दल आपण कधी बोलणार? घरातलं प्रदूषण कमी करण्यासाठी आपण काय काळजी घ्यायला हवी याचा विचार आणि विचारणा कधी करणार? घरातल्या प्रदूषणाबद्दल आपण कोणाला दोष देणार?
समजा तुमचा खोकला खूप दिवसांपासून बरा होत नसेल. डोकं सारखं दुखत असेल, डोळे सतत चुरचुरत असतील, खूप थकवा येत असेल तर हे असं का होतं याचा विचार कधी केलाय का तुम्ही?
या आणि अशा प्रकारच्या अनेक समस्या उद्भवत असतात तेव्हा त्याला बाहेरची खराब हवा किंवा धूळ, धूर,  प्रदूषण एवढंच कारणीभूत नसतं. बंद जागेतील प्रदूषण म्हणजेच  ‘घरातील प्रदूषण’ हेही त्यामागचं कारण असतं. 

 


घरात प्रदूषण ते कसं आणि का?
घरातील हवेत होणारे बदल जीविताला धोकादायक ठरत असल्यास त्यास घरातील वायूप्रदूषण असं म्हणतात. जर घरातील हवा खेळती नसेल तर हे प्रदूषक घरातच अडकून राहतात आणि घरातील हवा अशुद्ध आणि प्रदूषित होते. अशा प्रदूषित हवेचा आपल्या आरोग्यावर दुष्परिणाम होण्याची शक्यता असते. हा परिणाम कळत नकळत पण दूरगामी असतो. 
 * घरातील प्रदूषण वाढीस लागण्याचं प्रमुख कारण म्हणजे आपली चुकीची जीवनशैली. आपण दिवसातला जवळ जवळ 90 टक्के वेळ बंद जागेत घालवतो. मग ते घर असो, ऑफिस असो, शाळा असो वा महाविद्यालय असो. घरातील प्रदूषणाची पातळी बाहेरील प्रदूषणापेक्षा 12 टक्क्यानं जास्त असते.
*  घरातील प्रदूषण हे मानवनिर्मितच आहे. याचं मुख्य कारण म्हणजे आपल्या दैनंदिन जीवनात आपण अशा अनेक गोष्टींचा वापर करतो, ज्या प्रदूषक निर्माण करण्यास कारणीभूत असतात. उदाहरणच द्यायचं झालं तर लाकडी फर्निचरच्या पॉलिशमधून निघणारे प्रदूषक, सीमेंटचे कण, डांबर गोळ्या, रंग, इंधनाचा धूर, डासांना पळवून लावणा-या  उदबत्त्या, वड्या आणि फवारे यातून येणारी विषारी रसायनं ही प्रदूषकं निर्माण करतात. 
*  धुळीमुळे घरातील आद्र्रता पातळी वाढल्यामुळे तसेच हवेतील विविध वायूंच्या कमीअधिक प्रमाणामुळे घरातील प्रदूषण वाढू शकतं.
*  घरातील प्रदूषण निर्माण करणारे घटक हे रसायन, वायू, ध्वनी, लहरी तसेच भौतिक घटक यामध्ये सहजासहजी मिसळू शकतात. यामुळे घरातील प्रदूषणाची पातळी वाढते आणि आपल्याला त्याचे परिणाम जाणवू लागतात. 
 * आपण आपला 90 टक्के वेळ बंद जागेत व्यतीत करतो. येथे जर हवा खेळती नसेल तर श्वसनावाटे आपण प्रदूषित हवा घेत असतो.
*  घरातील प्रदूषणाची पातळी हिवाळा आणि उन्हाळा या दोन ऋतूत अधिक प्रमाणात वाढलेली दिसून येते. कारण उन्हाळ्यात उकाडा कमी करण्यासाठी आणि हिवाळ्यात घरातली ऊब वाढविण्यासाठी आपण घरं बंदिस्त करतो. त्यामुळेही घरातील हवा प्रदूषित होते. 
*  घरातील प्रदूषणाचे दुष्परिणाम शरीरावर होऊन अनेक रोगांच्या संख्येत झपाट्यानं वाढ होत आहे. डोकेदुखी, थकवा, त्वचा विकार, श्वसन विकार, मेंदूशी निगडित आजार, कोरडा घसा तसेच कोरडे डोळे अशा अनेक प्रकारच्या आरोग्याच्या समस्या घरातील प्रदूषणामुळे उद्भवतात. 
घरातील प्रदूषण रोखण्यासाठी
*  घरातील हवेचं प्रदूषण कमी करण्यासाठी घरातील हवा खेळती ठेवणं हा सर्वात चांगला उपाय आहे. ताजी स्वच्छ हवा आणि सूर्यप्रकाशामुळे घरातील प्रदूषक नष्ट होण्यास मदत होते. 
 * जर घरातील हवा खेळती ठेवणं शक्य नसेल तर प्रदूषण कमी करण्यासाठी वनस्पतींचा उपयोग होऊ शकतो.
*  घरातील सर्व प्रकारचं प्रदूषण टाळणं ही प्रत्येकाची वैयक्तिक जबाबदारी असते. पण तरी खबरदारी म्हणून तसेच घरातील प्रदूषण टाळ्ण्यासाठी घराला मोठय़ा खिडक्या असाव्यात. यामुळे हवा खेळती राहून घरातील प्रदूषित हवा बाहेर जाते आणि स्वच्छ हवा घरात येते.
*  घरातील खिडक्यांचे आणि दरवाजाचे पडदे नेहमी स्वच्छ ठेवावेत. कारण त्यावर असणा-या कणांमुळे दमा किंवा ब्रॉँकायटीससारखे आजार होऊ शकतात. तसेच प्रदूषण शोषणा-या वनस्पतींचा घरात वापर करावा. या वनस्पती प्रदूषण तर शोषतातच; पण रात्रीच्या वेळीही ऑक्सिजन सोडतात जो आपल्या आरोग्यासाठी खूप उपयुक्त आहे.

---------------------------------------------------------

 

शोभा वाढवणारी आणि प्रदूषणाशी लढणारी
फायटोरेमेडिशन

वनस्पतींचा वापर करून प्रदूषणावर मात करण्याला ‘फायटोरेमेडिशन’ असं म्हणतात. यामध्ये कमी प्रकाशात घरात वाढणा-या वनस्पतींचा वापर केला जातो. या वनस्पतींची देखभाल करणं सोपं असतं. त्यांना पाणीही कमी लागतं. या वनस्पतींवर सहसा कीड पडत नाही. वनस्पती त्याच्या पानांवर असलेल्या छिंद्राद्वारे श्वसनाचं काम करतात. हे श्वसन करताना वनस्पती प्रदूषकंही शोषतात. वनस्पतींच्या चयापचय क्रियेत त्यांचं विघटन होतं. विघटनामुळे प्रदूषकांचं साध्या पदार्थांमध्ये रूपांतर होतं. जे आपल्या आरोग्याला धोकादायक नसतात. ज्या मातीत या वनस्पती वाढवतात त्या मातीतील आणि मुळांच्या सान्निध्यातील सूक्ष्म जीव प्रदूषकाचं विघटन करण्यास मदत करतात. फायटोरेमेडिशन ही एक कमी खर्चाची घरातील शोभा वाढविणारी आणि घरातील प्रदूषणाची समस्या सोडवणारी सहज शक्य पद्धत आहे.

(लेखिका पर्यावरणीय वनस्पती शास्रातल्या शास्रज्ञ आहेत.) 

drseemaaghate@gmail.com

Web Title: Who says home is safe from pollution

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.