Who can sees and understand the actress 'panic in the serial ' by wearing production's belonging sari | मालिकांमधील प्रॉडक्शनची साडी चोळी अंगावर वागवताना अभिनेत्रींना होणारा त्रास कोणाला दिसतो?

मालिकांमधील प्रॉडक्शनची साडी चोळी अंगावर वागवताना अभिनेत्रींना होणारा त्रास कोणाला दिसतो?

-योगेश गायकवाड  

कॉलेजच्या वयात असताना  ‘साडी’ या वस्त्रप्रकाराचा धसकाच बसावा, असे काही प्रसंग माझ्या आयुष्यात घडून गेले होते. त्या धसक्यामुळेच मी बायको पण साड्या नेसायला अजिबात न आवडणारी निवडली. साडी नावाचं आपल्याला अजिबात न समजणारं हे वस्त्र आपल्या आयुष्यात येऊच नये यासाठी मी सगळी फिल्डिंग लावली होती. पण आपलं आयुष्य कधी आपलं ऐकतं का? वैयक्तिक आयुष्य तर मी ‘साडी प्रुफ’ केलं पण माझ्या व्यावसायिक आयुष्यात या पाच वाराच्या तलम कपड्यानं वेळोवेळी माझा गळा आवळला. 
एका मराठी सिरीअलचा क्रिएटिव्ह हेड म्हणून काम करत असताना आमची कॉश्च्युम डिझायनर अंगा-खांद्यावर पाच-सहा साड्यांचा डिस्प्ले घेऊन माझ्या समोर आली आणि विचारू लागली, ‘ दादा, शीतलला यातली कोणती देऊ ? जांभळी, आमसुली की वांगी?’
- या प्रश्नाचं उत्तर मी एका क्षणात द्यावं अशी तिची अपेक्षा होती. त्या मालिकेचा क्रिएटिव्ह  हेड असल्यानं एकूण रंगसंगती बघणं, त्या संदर्भातले निर्णय घेणं ही माझी जबाबदारी असली तरीही गरीबाची इतकी क्रूरचेष्टा करावी का? या बायकांच्या  डोळ्याला प्रिझम्स लावलेले असतात की काय ? एका रंगाच्या किती शेड्स दिसतात त्यांना ? आमसुली म्हणजे खुद्द आमसुलाच्या नव्हे, तर आमसुलाच्या सरबताच्या रंगाची, एवढं साधं कळत नसलेल्या माणसाला क्रिएटिव्ह हेड कोणी केला? असे भाव चेह-यावर आणत शेवटी ती तिच्या आवडीचा रंग परस्पर निवडून निघून गेली. आणि  मी विचार करत राहिलो की  वांगी कलर म्हणताना  बायकांना भाजीचं वांगं अपेक्षित असतं की भरताचं ? 
- माझ्या सगळ्या क्रिएटीव्हीटीवर कफन बनून पसरलेल्या त्या साडे पाच मीटर कपड्यापासून आपण स्वत:चा बचाव करू शकणार नाही, हे शेवटी माझ्या  लक्षात आलं. कारण आपण अशा समाजात राहतो जिथे टीव्ही सिरिअल्स हिरॉईनपेक्षा तिच्या साड्यांसाठी बघितल्या जातात. सिरीअलच्या किंवा त्यातल्या नटीच्या नावानं व्यापारी साड्या विकतात. एका आठवड्यात  नायिकेची साडी कितीवेळा रिपीट झाली, यावरून सिरीअलची लायकी ठरवली जाते. अशा प्रेक्षकांची संख्या जास्त असलेल्या समाजासाठी तयार  केल्या जाणा:या सिरिअल्स आणि सिनेमांच्या जगात आपण रोजी रोटी कमवत असल्यानं  आपली या साडीपासून सुटका नाही हे मला एव्हाना कळून चुकलं होतं. आणि म्हणून मग तह करून मी सिरीअलमधल्या साड्यांकडे (हिंमत करून ) आपुलकीनं बघायला लागलो. त्यांच्या शेकडो शेड्स, सतराशे साठ प्रकारचं कापड, त्यांचे पोत, नेसण्याच्या पद्धती अशा सगळ्या गोष्टी मग मला इंटरेस्टिंग वाटू लागल्या. आता साधारण 2क् वर्ष सिरीअल प्रॉेडक्शनच्या क्षेत्रत काम केल्यानंतर मी पिंक, बेबी पिंक  आणि शॉकिंग पिंक कलरच्या साड्या एका फटक्यात ओळखू शकतो.. आणि या अधिकारानंच या  ‘प्रॉडक्शनच्या साड्यांबद्दलच्या’ काही  आतल्या गोष्टी तुम्हाला सांगतो. 
आपल्या आवडत्या किंवा रोजच्या सवयीच्या सिरिअल्स बघताना तुम्हाला वाटत असेल की या सिरीअलमध्ये कामं करणा-या बायकांची मजा असते, रोज नवनवीन साड्या नेसायला मिळतात. नटायला मिळतं. रात्री झोपण्याचा सीन असला तरी त्यांचा गाऊन पण डिझायनर असतो. आपण आयुष्यभर करतो  तितकी कपड्यांची हौसमौज त्या एका सिरीअलमध्येच करून घेतात.  मजा असते या सिरीयलवाल्या पोरींची.. पण..पण.. पण..दिसतं तसं नसतं. 
 सिरीअलमध्ये काम करणा-या नट्यांच्या साड्या हा प्रेक्षकांना वाटतो तितका आनंददायी प्रकार अजिबात नसतो. सामान्य महिला हौसेनं साडी मिरवतात कारण कितीचीही असली तरी ती त्यांची साडी असते. तिच्या रंगाबद्दल, स्टाइलबद्दल त्यांना मत असतं. पण सिरीअलवाल्या मुलींना हा अधिकारच मुळात नसतो. सिरीअलमध्ये  त्यांनी मिरवलेल्या सर्व साड्या या प्रॉडक्शनच्या म्हणजेच त्या निर्मिती संस्थेच्या मालकीच्या असतात. सकाळी कामावर आल्यावर त्या कलाकारांना नेसायला दिल्या जातात आणि रात्री घरी जाताना परत घेतल्या जातात. दिवसभर शुटींगच्या सेटवर दुस-याची प्रॉपर्टी असल्यासारख्या त्यांना त्या सांभाळाव्या लागतात. चहा घेताना चुकून जरी डाग पडला तरी आधी कॉश्च्युम डिझायनरच्या आणि मग दिग्दर्शकाच्या शिव्या खाव्या लागतात. त्यामुळे शेफ लोक स्वयंपाक करताना वापरतात तसा अँप्रन लावून या कलाकारांना सेटवर जेवावं लागतं. 
बरं या साड्या सिलेक्ट करण्याचा तरी त्यांना चॉईस असतो का?- तर नाही. त्यांच्या भूमिकेला साजेलसा त्यांचा लूक चॅनेलच्या ऑफिसमध्येच ठरलेला असतो.    त्याप्रमाणो स्टायलिस्ट त्यांच्यासाठी कपडे निवडते. आणि सगळ्यात वाईट म्हणजे खरेदी पण तीच करते. आता मला सांगा दुस-या बाईनं, तिच्या चॉइसनं खरेदी केलेली साडी कोणती बाई हौसेनं नेसेल ? टीव्हीवर बघताना आपल्याला अर्ध्या तासात एक एपिसोड दिसून जातो; मात्र तो शूट करायला कधीकधी दोन दिवसपण लागतात. अशावेळी आदल्या दिवशी दिवसभर नेसून घामट्ट झालेली साडी आणि ब्लाउज हेच कपडे दुस-या दिवशीपण घालावे लागतात. दैनंदिन मालिकांच्या दिवसरात्र चालणा-या  शुटींगमध्ये या साड्या लॉण्ड्रीमध्ये देणं पण शक्य नसतं. मग नाईलाजानं दुस-या  दिवशी तीच साडी वरवर ब्रश आणि इस्त्री फिरवून नेसावी लागते. अगदीच अशक्य झालं तर नाइट शिफ्टला थांबून ड्रेसमन दादा (कॉश्च्युम विभागात कपड्यांची काळजी घेण्यासाठी खास नियुक्त केलेली व्यक्ती) या साड्या वॉशिंग मशीन मधून काढून हेअर ड्रायरनं वाळवून सकाळी छान इस्त्री करून कलाकारांना देतात. 
मराठी सिरीअलच्या सेटवर तर वॉशिंग मशीन पण नसतं, अशावेळी त्या महागाच्या साड्या  खराब न होऊ देता हातानंच धुतल्या जातात. आणि स्वच्छ साडी नेसून सकाळी कलाकार आपले सीन्स करतात. बरं, साड्या नेसणं या प्रकारातला आणखी एक आनंदाचा भाग म्हणजे भरपूर वेळ घेऊन साड्या नेसणं.  ‘फंक्शनल साडी घड्याळ लाऊन पंधरा मिनिटांत नेसून ये’ असा आग्रह धरला तर नवरा उपाशी ठेवतील बायका. कारण त्यातली हौस जरी बाजूला ठेवली तरी त्या नि-या   त्या किती खोचायच्या, घोट्यापासून किती उंचीवर थांबवायच्या, त्या साडीची ओळख असलेला पदर दिसेल असा कसा  घ्यायचा, चापून चोपून नेसलेल्या साडीत चालता येईल इतकी  ‘अँडजेस्टमेण्ट’ कशी करायची, असल्या हजार भानगडी असतात. हे सगळं करायला नाही म्हटलं तरी वेळ लागतोच. पण डेली सोप करणा-या  बायकांच्या नशिबी हे सुख पण नसतं. 

 


मराठी सिरीअलच्या शुटींगसाठी या  कलाकारांना सकाळी 9 च्या शिफ्ट ला 8:30 लाच सेटवर हजर राहावं   लागतं. आणि फारफार तर अर्ध्या तासात तयार होऊन कॅमे-यामोर यावं लागतं. एक सीन झाला आणि कॉश्च्युम चेंज असेल तर तेवढ्याच वेळात आधीची सोडून  दुसरी साडी नेसून, मेकअप आणि हेअरस्टाइल ठीकठाक करून त्यांना पुढचा सीन सुरु  करावा लागतो. यात उशीर झाला तर एपिसोड वेळेत पूर्ण होत नाही आणि निर्मात्याचं प्रचंड आर्थिक नुकसान होतं. त्यामुळे सिरीयलमधल्या स्त्रीवर्गाला साडी वेळेत नेसता यावी म्हणून कॉश्च्युम विभागात ड्रेपर्स नियुक्त केलेले असतात. या ड्रेपर मुली कलाकारांना साडी नेसायला मदत करतात. 
ऐतिहासिक मालिका असेल तर ड्रेपर मुलींची जबाबदारी अधिकच वाढते. कारण नऊवारचे वार झेलणं अजिबात सोपं नसतं. माझ्या माहितीतल्या काही अभिनेत्री तर कारमधून येता येता बेसिक मेकप स्वत:च करून यायच्या. स्टुडीओत आल्यावर मेकअप दादा फक्त टचअप करायचे आणि मग त्यांना साड्या नेसायला थोडा अधिक वेळ मिळायचा. 
टीव्हीवर आपण एखादा सीन बघतो की तिच्या प्रेमाखातर तो कधी नाही ते कांदा चिरायला जातो आणि त्याचं बोट  कापलं जातं. ती लगेच धावत येते आधी त्याचं बोट तोंडात धरते. थोडी लाजते आणि मग घाई घाईनं साडीचा पदर टरकवून त्याच्या जखमेवर पट्टी बांधते. ‘काय टिपिकल सीन आहे’ , म्हणून आपण पटकन कॉमेण्ट करून  मोकळेण होतो. पण त्यामागची कॉश्च्युम विभागाची धावपळ समजली तर तुम्हाला पण त्यांच्याबद्दल सहानुभूती वाटेल. 
  ‘तो / ती जखमी होते,’ असं वाक्य पटकथेत दिसलं की कपडेपटात टेन्शन वाढतं. कारण हिरो किंवा हिरोईनला जखम झाली म्हणजे एकतर कपडे फाटणार नाहीतर कपड्यांना खोट्या रक्ताचा डाग तरी पडणार. डाग तरी धुतला जाऊ शकतो पण फाडलेल्या साडीचा पदर?  आपण पाहातो ते सीन काही एक सलग चित्रित होत नाहीत. प्रत्यक्षात साडी फाडण्याच्या सीनच्या आधीचा सीन नंतर कधीतरी चित्रित होणार असतो. मग  त्या सीनमध्ये साडीचा पदर फाटलेला दाखवून कसा चालेल? अशा वेळी एकसारख्या दोन साड्या ठेवाव्या लागतील. पण मग काहीतरी चूक झाली आणि रिटेक करावा लागला तर? प्रत्येक टेकला साडी तर फाडू शकत नाही ना? म्हणून मग अशावेळी सेटवरचे टेलर दादा सकाळी शुटींग सुरु  होण्याआधीच त्या साडीच्या आतल्या बाजूची एक पट्टी कापून ती पदराच्या पुढे एक टाक्याच्या हातशिलाईनं जोडून ठेवतात. आणि मग हिरोचं बोट कापल्यावर हिरोईन मूळ साडी न फाडता हा वरून जोडलेला तुकडाच फाडते. 
साडी नेसण्यामागे इतकी सगळी कटकट असूनही ती प्रेक्षकांपर्यंत कधीच पोचत नाही. टीव्हीवर बघताना, नायिकेच्या सौंदर्यात  भर घालणारी छान साडीच दिसते. 
..आणि मग कधीतरी सिरीअल मध्ये दिवाळी येते. त्यावेळी महा एपिसोड शूट होणार असतो. बजेट, वेळ याबाबतीत निर्माता पण थोडा उदार होतो. रेग्युलर वापरातल्या साड्यांव्यतिरिक्त साड्यांची खरेदी होते. तोपर्यंत भूमिका हीट झालेली असल्यानं ‘मला ही नको, ती पाहिजे’, असा हट्ट करण्याचा अधिकार सिरिअलमधल्या एक दोघींना प्राप्त झालेला असतो. 
मधूनच कधीतरी प्रमोशनसाठी कलाकारांना वाहिनीवरच्या विनोदी कार्यक्र मांत किंवा पुरस्कार सोहळ्यांना बोलवलं जातं. त्या वेळी मात्र आमच्या या नट्या नटण्याची सगळी हौस भागवून घेतात. इथे त्यांच्या खाजगी कलेक्शनमधल्या खास साड्या मिरवायची संधी त्यांना मिळते. अशा कार्यक्रमांना प्रेस फोटोग्राफर्स उपस्थित असतात. त्यामुळे इथे जर ड्रेस / साडी रिपीट झाली तर प्रेक्षक लगेच पकडतात. आणि अमुक एका कार्यक्रमाला नेसलेली तीच साडी या मुलाखतीला पण नेसून आली म्हणून कलाकारांची इज्जत काढली जाते. पण रोजच्या अशा कार्यक्रमांना रिपीट न करता कपडे घालायचे म्हणजे किती मोठा वॉर्डरोब लागेल? अशावेळी कलाकार याच कॉश्च्युम डिझायनर्सकडून खास कपडे बनवून घेतात. एवढंच नाही तर कधी कधी फक्त एका पार्टीसाठी चक्क कपडे भाड्यानं पण आणतात. 
घट्ट झालं तर वीण उसवत, अपरं झालं तर जोड शिवत या कलाकार महिला स्क्रीन वर छान छान दिसत आपली भूमिका चोख पार पाडत असतात. साडी नेसण्यातला त्रस, त्यामागची गैरसोय कधीही कॅमे-या समोर दिसू देत नाहीत. साडीशी निगडीत स्त्री सुलभ हौस बाजूला ठेवत, हे नटण्या मुरडण्याचं काम त्या अत्यंत प्रोफेशनली करत असतात. आणि तात्पुरती का होईना पण आपल्या वाट्याला आलेली ही ‘प्रॉडक्शनची साडी चोळी’ मानानं स्वीकारून प्रामाणिकपणो प्रेक्षकांचं मनोरंजन करत असतात. 

(लेखक  सामाजिक विषयांवरील फिल्ममेकर आहेत.) 

yogmh15@gmail.com

 

Web Title: Who can sees and understand the actress 'panic in the serial ' by wearing production's belonging sari

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.