Where to go out to celebrate Diwali? | दिवाळी साजरी करायला कुठे बाहेर जायचं का?

दिवाळी साजरी करायला कुठे बाहेर जायचं का?

-मनस्विनी प्रभुणे-नायक

खू प दिवसांनी सकाळी निवांतपणा मिळाला. रोजची ऑफिसला जाण्याची घाई नव्हती, त्यामुळे हातात चहाचा कप आणि वृत्तपत्र   घेऊन शांतपणे बसले. रोज ऑफिसला पळता पळता फक्त हेडलाइन्सवर नजर टाकणं होतं आणि त्यातही पहिलं पान ओलांडून पुढच्या पानावर उडी मारणं सुरू असतं. हल्ली वृत्तपत्राच्या पहिल्या पानावर आकर्षक जाहिराती असतात ना. त्या दिवशीही छान आकर्षक जाहिरात होती. ती बघून त्या पानावरून मी नेहमीप्रमाणे पुढच्या पानावर उडी मारली नाही. पान उलटायच्या ऐवजी नजर तिथेच खिळून राहिली. खूप दिवसांपासून नुसतंच मनातल्या मनात नियोजन करत असलेल्या नयनरम्य भूतानची ती जाहिरात होती. दिवाळी जवळ आल्यानं रोज नवनवीन ऑफर्स देणा-या कंपन्यांच्या जाहिराती असतात. छान आकर्षक सवलत देणारी भूतानची जाहिरात एका ट्रॅव्हल कंपनीची होती. एका क्षणात तारखा - दिवस, आर्थिक ग्णितं यांची बांधणी सुरू झाली आणि लक्षात आलं की दिवाळीचे दिवस आहेत. मग कसं शक्य होणार? खरं तर या विचारानं भूतानला जाण्यासाठी सरसावलेलं माझं मन मागे फिरलं. 

प्रत्येक सणाचे काही संकेत ठरलेले असतात. तसे दिवाळीचेही काही संकेत ठरलेले आहेत आणि ते पाळल्याशिवाय दिवाळी साजरी केल्यासारखं वाटत नाही. दिवाळी सुरू होण्यापूर्वी आठवडाभरापासून अंगणात किल्ला बांधण्याची लगबग सुरू होते. घराघरांतून फराळाच्या पदार्थांचे कधी खमंग तर कधी गोड असे मिश्र सुवास दरवळू लागतात. आकाशकंदील बनवण्याची धडपड सुरू होते. अभ्यंगस्नानासाठी आणलेले सुगंधी उटणे, दारात काढली जाणारी रांगोळी, नव्या कपड्यांची नवलाई, फटाक्यांची आतषबाजी या सा-या शिवाय दिवाळी साजरी झाल्यासारखं वाटत नाही. लहानपणापासून दिवाळीचं हेच चित्र मनावर बिंबवलंय. त्यामुळेही दिवाळी घरीच साजरी करण्यावर भर असतो.

दिवाळीच्या निमित्ताने सगळ्यांनी चार-पाच दिवस एकत्न येणं, गप्पाटप्पा, मौजमजा करणं, तीन-चार दिवस छान चमचमीत, गोडधोड पदार्थांवर ताव मारणं, दुपारच्या वेळी लोळत पडून दिवाळी अंकाचं वाचन करणं असा दरवर्षीचा क्र म ठरलेला असतो. अजून काय वेगळं हेच सगळं म्हणजे दिवाळी.  

आजूबाजूला बघितलं की लक्षात येतं की काळाप्रमाणे थोड्याफार प्रमाणात दिवाळी साजरी करण्याचं हे नेहमीचं चित्नदेखील बदलू लागलंय. पूर्वी फक्त वर्षातून एकदाच दिवाळीच्या फराळाचे पदार्थ बनवले जायचे. ते आता बाजारात वर्षभर मिळतात. चकलीची भाजणी ही फक्त दिवाळीच्या काळात केली जायची. पण आता बाजारात चकलीची भाजणी कायम उपलब्ध असते. त्यामुळे दिवाळीची वाट बघावी लागत नाही. या बदलेल्या काळामुळे दिवाळीतल्या फराळाच्या पदार्थांचं पूर्वीसारखं अप्रूप राहिलं नाही. सगळा रेडिमेडचा जमाना असल्यामुळे रेडिमेड किल्ला, रेडिमेड आकाशकंदीलने घराघरात जागा पटकावली. खरं तर हे सगळं करायला आता पूर्वी इतका पुरेसा वेळदेखील नाही. पण तरी प्रत्येकजण आपापल्यापरीनं, आपापल्या पद्धतीनं दिवाळी साजरी करतात. ऑफिसमधल्या मैत्रिणींचं कुटुंब खूप मोठं; पण नोकरी व्यवसायाच्या निमित्तानं देश-विदेशात विखुरलेलं. अनेक वर्षं त्या सगळ्यांनी आपल्या मूळ घरी येऊन दिवाळी साजरी केली. मग जे ज्या भागात, शहरात आहेत त्या प्रत्येकाकडे एकेक वर्ष दिवाळीला एकत्र जमले. आता त्यांनी आणखी नवा पर्याय शोधून काढलाय. आता ते दरवर्षी एका नव्या गावात दिवाळी साजरी करतात. त्यानिमित्तानं  नव्या भागात, नव्या प्रदेशात जाणं होतं. दिवाळीच्या एक महिना आधी सर्वजण कामाला लागतात. कुठे जायचं ती जागा पक्की झाली की बाकीच्या तयारीला लागतात. दिवाळीत फराळाचे काही मोजकेच पदार्थ जे आवडीनं खाल्ले जातात तेवढेच पदार्थ एकमेकांकडे वाटून घेतात. म्हणजेच कोणा एकीलाच सगळं करण्याचा त्रास होत नाही. याशिवाय उटणंदेखील बरोबर घेतात. कुठेही गेलो तरी घरात नाही म्हणून दिवाळीची उणीव भासायला नको याची काळजी ते घेतात. आतातर व्हॉट्सअँप ग्रुपमुळे अशा ट्रीपचं नियोजन अगदी काटेकोरपणे पार पडू लागलंय.

दरवर्षी नव्या ठिकाणी, निसर्गरम्य गावात सगळ्यांनी दिवाळी साजरी करायची ही कल्पना मला मनापासून आवडली.  पूर्वी लक्ष्मीपूजन झाल्याशिवाय कोणी गावाला जायला  घरातून बाहेर पडत नव्हते. घरातील सासुरवाशीणदेखील लक्ष्मीपूजन केल्यानंतर भाऊबीजेला माहेरी जायची. पण आता असं राहिलं नाही. वर्षभरातली कामाची धावपळ, दगदग सर्वात महत्त्वाचं म्हणजे सर्वांना एकाच वेळी न मिळणा-या सुट्या यामुळे कुटुंबातील सर्व सदस्यांनी एकत्न येणं दिवसेंदिवस अवघड होत आहे. दिवाळीत मात्र सर्वांना काही दिवस सुट्टी असतेच. या दिवसात निसर्गरम्य ठिकाणी, एखाद्या छानशा गावात जाऊन शांत-निवांतपणा अनुभवत दिवाळी साजरी करणार्‍यांचं प्रमाण हल्ली वाढतंय. यात ट्रॅव्हल कंपन्यांनी आणखी भर घातलीय. तुम्ही फक्त त्यांच्यावर सगळं सोडून द्यायचं की ते तुम्हाला तुमच्या मागणीप्रमाणे प्रवासाचं सगळं नियोजन करून द्यायला तत्पर असतात. तुमची दिवाळी तुमच्या कुटुंबाबरोबर अविस्मरणीय होण्याची काळजी घेतात. काळ बदलतोय तसे अनेक बदल आजूबाजूला घडत आहेत. हे चांगलं, हे वाईट असं सरसकट शेरे मारण्याचा काळ आता उरला नाही हे जाणवतंय. ट्रॅव्हल कंपन्यांमधील चटपटीत हुशार मुलामुलींशी बोलताना अनेक वेगवेगळी उदाहरणं ऐकायला मिळाली. प्रत्येकजण शांतता, निवांतपणाच्या, नव्या अनुभवांच्या शोधात आहे. पारंपरिक सण साजरे करण्याच्या  संकल्पनाही बदलू लागल्या आहेत.

माझ्याच आजूबाजूला दिवाळीतला आनंद नेहमीपेक्षा वेगळ्या पद्धतीनं साजरा करण्यासाठी उत्सुक मंडळी भेटली. त्यांचा हुरूप बघून दिवाळी आहे असं म्हणून दोन पावलं मागे सरलेलं मझं मन दिवाळीचे चार दिवस साजरे करण्यासाठीचं डेस्टिनेशनचा शोध घेऊ लागलं.  रद्दीच्या गठ्ठय़ात तळाशी गेलेल्या वृत्तपत्रातली ती जाहिरात मला आठवली. 
यंदा त्या ट्रॅव्हल कंपनीला फोन करून मी दिवाळीत कुठे जायचं ते ठरवणार आहे!


-------------------------------------------------------------------


दिवाळीने ‘उंबरठा’ ओलांडला, कारण..

नोकरीच्या निमित्तानं वेगवेगळ्या शहरात स्थायिक झालेल्या कुटुंब सदस्यांना एकत्र आणायला सणवार, उत्सव ही निमित्त उपयोगी पडतात. 
 मुलं मोठी झाली की आधी शिक्षणासाठी मग नोकरीच्या निमित्तानं बाहेरगावी, परदेशी गेलेली असतात. चार दिशांना चारजण अशी परिस्थिती असलेल्या कुटुंबांनी यावर एक छान तोडगा काढलाय. 
 दिवाळीत सगळ्यांनी एकत्र असणं आणि एकत्र येऊन दिवाळी साजरी करणं महत्त्वाचं असतं ना मग ती घरीच केली पाहिजे असं बंधन थोडंच आहे. ती तुम्ही कुठेही साजरी करू शकता.
 मी जरी दिवाळी घरीच साजरी करावी यावर अडून बसले असले तरी माझ्याच मित्र-मैत्रिणींमध्ये अनेकजण असे आहेत जे दिवाळी एखाद्या नव्या गावात जाऊन साजरी करतात. 
 यात मला एक गोष्ट फारच आवडली ती म्हणजे प्रत्येक सणवाराला स्वयंपाकघरातील ओट्याला बांधलेल्या गृहिणीची किमान दिवाळीत तरी सुटका होऊ शकते. सर्वांबरोबर तीदेखील आनंदानं, उत्साहानं दिवाळी साजरी करू शकते.

---------------------------------------------------------

आजी-आजोबांची दिवाळीही ‘बाहेर’
 आश्चर्याची गोष्ट म्हणजे दिवाळी साजरी करण्यासाठी बाहेर फिरायला जाणं या नवीन ट्रेण्डमध्ये तरुणांपेक्षा ज्येष्ठ नागरिकांचीच संख्या जास्त आहे. 
 ही पिढी नव्या बदलांना छानपणे स्वीकारत आहेत. 
 मुलगा-सून-नातवंडं सातासमुद्रापार, त्यांना दिवाळीत तीन-चार दिवसांसाठी येणं शक्य नसतं. ऐन दिवाळीत घरात एकटेपणानं घेरण्यापेक्षा दरवर्षी याकाळात ही मंडळी कुठेतरी बाहेरगावी जातात.
 मुळात निवृत्तीनंतर नातवंडांना सांभाळण्यात वेळ घालवणारे आजी-आजोबा राहिले नाहीत आणि त्यापद्धतीनं त्यांच्याकडे अपेक्षा ठेवणारी मुलंदेखील राहिली नाहीत. 
 आयुष्यभर घरासाठी खस्ता खाल्ल्यानंतर निवृत्तीच्या काळात मनसोक्त हिंडणारे अनेक आजी-आजोबा आजूबाजूला दिसतात.
 आमच्याच भागातला ज्येष्ठ नागरिकांचा एक ग्रुप दिवाळीत राजस्थानला फिरायला जायचं नियोजन करत आहेत. या ग्रुपमधल्या एक आजी काही कामानिमित्तानं आमच्या घरी आल्या होत्या. विषय निघताच त्यांनी त्यांच्या राजस्थान सहलीबद्दल अतिशय उत्साहानं सांगितलं. मुलाला आणि सुनेला मी सांगितलं दिवाळीत मी इथं नाही. मी राजस्थानला जातेय. तुम्ही कुठेतरी चार दिवस जाऊन या.
- असं सांगताना त्यांच्या चेहर्‍यावर आपण काहीतरी वेगळं करतोय याचा विशेष भाव होता. 

(लेखिका पणजीस्थित मुक्त पत्रकार आहेत.)

manaswinirajunayak@gmail.com

Web Title: Where to go out to celebrate Diwali?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.