Join us  

झ्याक झुकिनी तुमच्या डाएट प्लॅनमध्ये आहे का? झुकिनी विकत घेताना काय खात्री कराल?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2021 5:11 PM

झुकिनी ही परदेशी भाजी, तिचा गाजावाजा आपल्याकडे होतोच. पण तिच्यात असं आहे काय खास?

ठळक मुद्देझुकिनीची फुलंही खाल्ली जातात. त्यांच सूप बनवता येतं. ग्रीसमध्ये या फुलांमध्ये चीज, भात, मसाले भरतात आणि मग ती तळून खातात.

वर्षा जोशी

झुकिनी. हल्ली डाएटमध्ये तिचा फार गाजावाजा दिसतो. आपल्याकडच्या मावळ काकडीसारखी दिसणारी पण गर्द हिरव्या रंगाची लांबट आकाराची एक भाजी हल्ली बाजारात दिसते. तिचंच नाव आहे झुकिनी. अमेरिका आणि युरोपमध्ये लोकप्रिय असलेल्या झुकिनीचं शास्त्रीय नाव आहे ‘तुतुमिस-पेपो’. आपल्या काकडीपेक्षा लांब असलेल्या झुकिनीचा आकार बारीक दुधीभोपळ्यासारखा असतो. त्याच्यासारखंच देठ झुकिनीला असतं. तिचं साल अगदी गुळगुळीत असतं. आतला गर मऊ पण कुरकुरीत असतो आणि काकडी, दुधी भोपळ्यासारख्या त्यामध्ये छोटय़ा बिया असतात ज्या खालल्या जातात. झुकिनीमधे पाण्याचं प्रमाण खूप असतं. झुकिनीचे तीन चार प्रकार आहेत. झुकिनीमध्ये भरपूर प्रमाणात क जीवनसत्व, चांगल्या प्रमाणात अ जीवनसत्व, ब जीवनस्तवाचे काही प्रकार, पोटॅशियम, लोह आणि मँगनीज असतात. काही प्रमाणात के जीवनसत्व, मँग्नेशियम, जस्त आणि चोथा असतात. उष्मांक कमी असतात. तिच्या सालीत चोथ्याचं प्रमाण चांगलं असतं. बहुतेक वेळा झुकिनी सालासकट शिजवून खाल्ली जाते. झुकिनीमधील क आणि अ जीवनसत्वांमध्ये ॲन्टिऑक्सिडंट गुणधर्म असल्यानं शरीराच्या एकूण आरोग्यास आणि दुर्धर व्याधींना प्रतिबंध करण्यास झुकिनीचा चांगला उपयोग होऊ शकतो. तिच्यात चांगल्या प्रमाणात असलेल्या पोटॅशियममुळे हृदयाचं आरोग्य चांगलं रहाण्यास मदत होतं. आणि ‘ब’ जीवनसत्वाचे प्रकार विशेषत: फोलेट शरीराच्या एकूण आरोग्स उत्तम असतात. आपल्याकडील तवसे या काकडीच्या प्रकाराप्रमाणे झुकिनी खूप लांब वाढू शकते. पण अशी झुकिनी जून आणि चोथट असते. म्हणून झुकिनी साधारण 8 इंच लांब झाली की तिची कापणी होते. ही फळं कोवळी असतात आणि त्यातील बियाही मऊ असतात.

विकत घेताना काय तपासून घ्याल?

झुकिनी विकत घेतांना कोवळी, चमकदार, गर्द हिरवी साल असलेली, घट्ट आणि जड अशी बघून घ्यावी. तिचा देठ मऊ आणि सुरकुत्या असलेला नसावा.

बाजारातून आणल्यावर झुकिनी लगेच वापरावी नाहीतर प्लॅस्टिकच्या पिशवीत घालून फ्रीजमधे भाज्यांच्या क्रिस्परमध्ये ठेवावी. फ्रीजमध्ये ती दोन तीन दिवस चांगली राहू शकते.

झुकिनीचे कोणते पदार्थ करता येतात?

स्वयंपाकात वापरण्यापूर्वी झुकिनी पाण्यानं स्वच्छ धुवावी. शक्यतो सालीसकट वापरावी. झुकिनीची चव जीभेवर रेंगाळ्त राहील असे अनेक प्रकार करता येतात. सलाड, सूप आणि थालीपीठही कोवळ्या झुकिनीची कोशिंबीर करता येते. ती सलाडमध्ये वापरता येते. झुकिनी वाफेवर शिजवता येते. तसेच पाण्यात शिजवूनही वापता येते. झुकिनीचे मोठे तुकडे करून आपण भरली कारली किंवा भरली वांगी करतो त्याप्रमाणो त्या तुकडय़ात मसाला भरून भाजी करता येते.  कॉर्न, कॉलिफ्लॉवर, बटाटे या भाज्या आपण बेक करतो किंवा बेक्ड व्हेजिटेबल्ससाठी या भाज्यांशिवाय गाजर, फरसबी वगैरे भाज्या वापरतो त्याप्रमाणो झुकिनीही वापता येते.

झुकिनीचे काप बार्बिक्यू करता येतात किंवा तळता येतात.

बनाना ब्रेड सारखा ब्रेड झुकिनी वापरून करता येतो.

झुकिनी किसून त्यात तांदळाचं आणि थोडं डाळीचं पीठ, आलं लसूण मिरची असं सगळ घालून त्याची धिरडी करता येतात.

थालीपीठाच्या भाजणीत झुकिनी किसून घालून थालेपीठ बनवता येतं.

पिझावर सुद्धा झुकिनी किसून घालता येते. झुकिनीचं सूप बनवता येतं.  इतर भाज्या बरोबर तिचा रस्साही बनवता येतो. झुकिनी चिरून फोडणीला टाकून त्यात आलं लसूण मिरची वाटून घालून शिजवली आणि मग त्यात थोडं क्रीम, दही आणि धनेजिरे पूड घातली , मीठ घातलं की उत्तम चविष्ट भाजी तयार होते.

झुकिनीची फुलंही खाल्ली जातात. त्यांच सूप बनवता येतं. ग्रीसमध्ये या फुलांमध्ये चीज, भात, मसाले भरतात आणि मग ती तळून खातात.

( लेखिका भौतिकशास्त्राच्या अभ्यासक आहेत.)

टॅग्स :पौष्टिक आहारवेट लॉस टिप्सहेल्थ टिप्स