Join us

Summer Special : उन्हाळ्यात पुदिन्याचा 1 कप चहा पिण्याचे  मिळतात 7 फायदे, पोटाला मस्त थंडावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2022 19:09 IST

भर उन्हाळ्यात कोणी चहा पिण्याचा सल्ला देतं का? पण पुदिन्याचा चहा उन्हाळ्यातही अवश्य प्यावा. थंडावा देणाऱ्या या चहाचे फायदे अनेक ..

ठळक मुद्देउन्हाळ्यात पचनाच्या निर्माण होणाऱ्या समस्या पुदिन्याच्या चहानं दूर होतात. महिलांच्या आरोग्यासाठी पुदिन्याचा चहा लाभदायी आहे. शांत झोपेसाठी पुदिन्याचा चहा प्यावा.

पुदिन्याचा मुख्य वापर चटणीसाठी केला जातो हे माहिती आहे. पण उन्हाळ्यात शरीराला, त्वचेला थंडावा मिळण्यासाठी पुदिन्याचा उपयोग चहासाठी देखील केला जातो. पुदिन्याचा चहा आरोग्यास लाभदायी ठरतो. पुदिन्यामध्ये मेन्थाॅल, प्रथिनं, फायबर, कर्बोदकं, अ जीवनसत्व, रिबोफ्लेविन, तांबं, लोह हे पोषक घटक असतात. या घटकांचा लाभ पुदिन्याच्या चहाद्वारे शरीरास होतो. 

Image: Google

पुदिन्याचा चहा कसा करतात?

पुदिन्याचा चहा करण्यासाठी 8-10 पुदिन्याची पानं, अर्धा छोटा चमचा मिरेपूड, अर्धा छोटा चमचा सैंधव मीठ आणि  2 कप पाणी घ्यावं. पुदिन्याचा चहा तयार करण्यासाठी भांड्यात पाणी घेऊन ते मंद आचेवर उकळत ठेवावं. पाण्याला उकळी आल्यावर त्यात पुदिन्याची पानं, मिरेपूड आणि सैंधव मीठ घालून पाणी पुन्हा 5 मिनिटं उकळावं. नंतर चहा गाळून तो प्यावा. हा गरम चहा भर उन्हातही शरीराला थंडावा देतो हे विशेष. 

Image: Google

पुदिन्याचा चहा का प्यावा?

1. उन्हाळ्यात नियमित पुदिन्याचा चहा प्याल्यास पचनाशी निगडित समस्या दूर होतात. पुदिन्याच्या चहामुळे पचन क्रिया सुरळीत होते. 

2. डोकेदुखी, मायग्रेनचा त्रास असल्यास पुदिन्याचा चहा पिल्यानं आराम मिळतो. पुदिन्याच्या चहातील घटक वेदना कमी करण्यास फायदेशीर असतात. 

3. पुदिन्याचा चहा महिलांसाठी विशेष फायदेशीर ठरतो. मासिक पाळीत पोटात, कमरेत होणाऱ्या वेदना पुदिन्याचा चहा पिल्यानं  कमी होतात. त्यामुळे मासिक पाळीत पुदिन्याचा चहा घेण्याचा सल्ला तज्ज्ञ देतात. 

4.  पुदिन्याच्या चहातील पोषक घटकांमुळे शरीर आणि मनावरचा ताण कमी होऊन शांत झोप लागण्यास मदत होते. निद्रानाशाच्या समस्येत पुदिन्याचा चहा फायदेशीर ठरतो. 

Image: Google

5. पुदिन्याचा चहा प्याल्यानं केसांचा पोत चांगला होतो. पुदिन्याच्या चहामुळे केस मजबूत होतात. केस गळण्याची समस्या दूर होवून केस दाट होतात. 

6. पुदिन्याच्य चहामुळे वजन नियंत्रित राहातं. वजन कमी करायचं असल्यास पुदिन्याचा चहा प्यावा. तसेच पुदिन्याच्या चहानं रक्तातील साखर नियंत्रित राहाते.

7. पुदिन्याच्या चहातून शरीराला मेन्थाॅल मिळतं. त्यामुळे त्वचेस थंडावा मिळतो. ॲलर्जीची समस्या असल्यास पुदिन्याचा चहा पिणं लाभदायी ठरतं. 

टॅग्स :अन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.पाककृतीसमर स्पेशल