वजन कमी करणं काय सोपं काम नाही किंवा ते काही दिवसांत लगेच कमी होईल असेही नाही. खरचं वेटलॉस करण्यासाठी आपल्याला दररोजचा आहार आणि लाईफस्टाईलमध्ये काही छोटे बदल करावे लागतात. आहाराचा विचार केला तर, आपल्या रात्रीच्या जेवणावर थोडे नियंत्रण ठेवल्याने वजन कमी होण्यास फार मदत होते. भारतीय स्वयंपाकघरात सहज उपलब्ध असणाऱ्या विविध डाळी फक्त भूकच भागवत नाहीत, तर त्यातील फायबर आणि प्रोटीन्स चयापचय क्रिया वेगवान करून चरबी जाळण्यास मदत करतात. वेटलॉस करण्यासाठी 'डाळी' हा आपल्या आहारातील सर्वात महत्त्वाचा आणि अत्यंत फायदेशीर पदार्थ मानला जातो(green moong dal weight loss benefits).
वजन घटवण्यासाठी केवळ व्यायाम पुरेसा नसून, आहारात प्रथिनांचे प्रमाण योग्य असणे गरजेचे असते आणि भारतीय आहारात डाळी हा प्रथिनांचा सर्वोत्तम स्रोत आहेत. वजन कमी करण्यासाठी डाळी खाणे गरजेचे असले तरी, सगळ्याच डाळी वजन कमी करण्यासाठी फायदेशीर असतात का? कोणती डाळ जास्त परिणामकारक ठरते ? ती कधी आणि कशा पद्धतीने खाल्ली तर वजन कमी होण्यास मदत होते? याबद्दल फारशी माहिती आपल्याला नसते.'ॲस्टर सीएमआय हॉस्पिटल' (बेंगळुरू) येथील क्लिनिकल न्यूट्रिशन अँड डाएटेटिक्स विभागाच्या प्रमुख 'सुश्री एडविना राज' (Ms. Edwina Raj) यांनी एका संकेतस्थळाला दिलेल्या माहितीनुसार, वेटलॉस करण्यासाठी कोणती डाळ फायदेशीर आहे आणि ती नेमकी कशी व कधी खावी याबद्दल माहिती दिली आहे(how to eat moong dal for weight loss).
सतत वाढणाऱ्या वजनाला आळा घालण्यासाठी 'ही' डाळ फायदेशीर...
न्युट्रिशनिस्ट एडविना राज यांच्या मते, वजन कमी करण्यासाठी 'सालीसकट हिरव्या मुगाची डाळ' (Green Moong Dal) खाणे अधिक फायदेशीर ठरते. रात्रीच्या वेळी हिरवी मुगाची डाळ खाल्ल्याने ती केवळ सहज पचते असे नाही, तर ती पचनक्रिया वेगवान करण्यासही मदत करते. यामुळे शरीरातील अतिरिक्त चरबी कमी होण्यास आणि पर्यायाने वजन घटवण्यास मोठी मदत मिळते.
वजन कमी करण्यासाठी मुगाची डाळ अत्यंत गुणकारी मानली जाते, कारण ती खाल्ल्यानंतर पोट दीर्घकाळ भरलेले राहते, ज्यामुळे वारंवार लागणारी भूक आणि अवेळी काहीतरी खाण्याची इच्छा कमी होते. याशिवाय, सालीसकट हिरव्या मुगाची डाळ खाल्ल्याने ती शरीरासाठी 'एनर्जी बूस्टर' प्रमाणे काम करते. यामुळे तुमचा स्टॅमिना वाढतो आणि व्यायाम करण्याची क्षमताही सुधारते, परिणामी वजन वेगाने कमी होण्यास मदत होते.
वजन कमी करण्यासाठी रात्री मुगाची डाळ खाण्याचे ३ मोठे फायदे...
१. कमी कॅलरी असलेली डाळ :- USDA (United States Department of Agriculture) च्या अहवालानुसार, १०० ग्रॅम कच्च्या मुगाच्या डाळीत साधारणपणे ३४७ कॅलरीज असतात. शिजवल्यानंतर याचे प्रमाण आणखी संतुलित होते. रात्रीच्या वेळी आपल्या शरीराची हालचाल कमी असते आणि चयापचय क्रिया (Metabolism) मंदावलेली असते. अशा वेळी मुगाची डाळ खाल्ल्याने शरीराला ती पचवण्यासाठी जास्त कष्ट करावे लागत नाहीत. ही डाळ सहज पचते आणि त्यातून शरीराला आवश्यक तितकी ऊर्जा (Energy) देखील मिळते, ज्यामुळे शरीरात अतिरिक्त चरबी साठत नाही.
२. भरपूर प्रमाणांत प्रथिने मिळतात :- जर आपल्याला वजन कमी करायचे असेल तर हाय प्रोटिन्स असलेली मुगाची डाळ खाणे अत्यंत फायदेशीर ठरते. मुगाची डाळ खाल्ल्याने शरीराला दिवसभराचा थकवा दूर करण्यासाठी आवश्यक ऊर्जा मिळते आणि स्नायूंचे आरोग्य सुधारण्यास मदत होते. याशिवाय, यातील प्रथिने 'हार्मोनल हेल्थ' सुधारण्यासाठी उपयुक्त ठरतात, ज्यामुळे भूक नियंत्रित राहते आणि वारंवार काहीतरी चटपटीत खाण्याची इच्छा होत नाही.
३. फायबरचा उत्तम खजिना :- वजन कमी करण्यासाठी मुगाची डाळ खाण्याचा तिसरा मोठा फायदा म्हणजे त्यातील फायबर. हे फायबर मेटाबॉलिज्म वेगवान करून शरीरातील अतिरिक्त चरबी कमी करण्यास मदत करते. तसेच, मुगाची डाळ बद्धकोष्टतेचा त्रास कमी करते आणि आतड्यांच्या हालचाली योग्य रीतीने करण्यास मदत करते. यामुळे पचनसंस्था आणि आतड्यांची व्यवस्थित सफाई होते, परिणामी पोट साफ राहते आणि वजन कमी होण्याच्या प्रक्रियेला गती मिळते.
वजन कमी करण्यासाठी मुगाची डाळ खाण्याची योग्य पद्धत कोणती?
वजन कमी करण्यासाठी मुगाच्या डाळीचा फायदा तेव्हाच होतो, जेव्हा ती योग्य पद्धतीने खाण्यासाठी तयार केली जाते. मुगाची डाळ कमी मीठ आणि अगदी हलक्या मसाल्यांचा वापर करून उकडवून खाणे सर्वात जास्त फायदेशीर ठरते. आपण मुगाच्या डाळीचे सूप किंवा मोड आलेल्या मुगाचे सॅलॅड देखील खाऊ शकता. डाळ तयार करताना ती जास्त तेलात तळणे किंवा त्यात लोणी आणि क्रीम टाकणे टाळावे, कारण यामुळे कॅलरीज वाढतात आणि वजन कमी होण्यास अडथळा येतो. दुपारच्या किंवा रात्रीच्या जेवणात मुगाच्या डाळीचा समावेश केल्याने पचनक्रिया सुधारते. मुख्य म्हणजे यामुळे पोट दीर्घकाळ भरलेले राहते, ज्यामुळे अति प्रमाणांत खाण्याच्या सवयीवर नियंत्रण मिळवता येते.
मुगाची डाळ केवळ वजनच कमी करत नाही, तर ती आतड्यांच्या आरोग्यात सुधारणा करते आणि पोट फुगण्याच्या समस्येवर फायदेशीर ठरते. रक्तातील साखरेची पातळी न वाढवता शरीराला सातत्याने ऊर्जा पुरवण्याचे काम ही डाळ करते.
मुगाच्या डाळीचा आहारात समावेश करताना दिवसभरात पुरेसे पाणी पिणे देखील अत्यंत आवश्यक आहे, कारण यामुळे वजन कमी होण्याच्या प्रक्रियेला अधिक वेग मिळतो. त्यामुळे, खरोखरच वजन कमी करायचे असेल तर आहारात मुगाच्या डाळीचा समावेश करावा.
