Join us  

रोज कोरडी भाजी पोळी नेता डब्यात? सलाड-कोशिंबीर काहीच खात नाही?- पोट सांभाळा कारण..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2021 12:37 PM

रोजच्या आहारात सलाड असायलाच हवे. त्यामुळे तुम्ही आरोग्याच्या कित्येक समस्यांपासून स्वत:ला दूर ठेऊ शकाल. तेव्हा सलाड खायचा कंटाळा करु नका.

ठळक मुद्देकाकडी, मुळा, बीट, गाजर, कोबी, टोमॅटो, लेट्यूस यांचा यामध्ये समावेश होतोपोट साफ राहण्यासाठी आणि वजन नियंत्रणात आणण्यासाठी उपयुक्त

आपला आहार सर्वांगीण असावा असे आपण वारंवार म्हणतो. पण सर्वांगिण आहार म्हणजे नेमके काय तर त्यात तृणधान्ये, कडधान्ये, भाज्या, फळे, डाळी, दूध अशा सर्व गोष्टींचा पुरेशा प्रमाणात समावेश असायला हवा. भाज्यांमध्येही पालेभाज्या, फळभाज्या आणि सलाड यांचा समावेश होतो. यामध्येही सर्व रंगाचे सलाड आहारात असणे आवश्यक आहे. हे सलाड नुसते खाण्याबरोबरच याच्या आपण वेगवेगळ्या पद्धतीने कोशिंबिरीही करु शकतो. तर कधी कडधान्ये आणि फळांबरोबर काही कॉम्बिनेशन्सही करु शकतो. यात दही, मायोनिज यांसारख्या घटकांचा समावेश केल्यास हे सलाड आणखी टेस्टी लागू शकते. आता सलाड म्हणजे नेमक्या कोणत्या भाज्या, तर काकडी, मुळा, बीट, गाजर, कोबी, टोमॅटो, लेट्यूस यांचा यामध्ये समावेश होतो. त्यामुळे यातील एक किंवा दोन घटक तुमच्या रोजच्या आहारात असतील असा प्रयत्न करा. पाहूयात आहारातील सलाडचे महत्त्व आणि शरीरासाठी असणारे त्याचे फायदे...

१. जेवणाच्या सुरुवातीला कोशिंबिर किंवा सलाड खाल्ल्याने नंतर आपण नकळत कमी जेवतो. त्यामुळे तुम्हाला वजन कमी करायचे असल्यास किंवा विनाकारण जास्तीचे खाणे टाळायचे असल्यास सलाड खाणे फायद्याचे ठरते. 

२. पचनासाठी सॅलेड अतिशय उपयुक्त असते, कारण सॅलेडमध्ये फायबरचे प्रमाण सर्वाधिक असते. यातील तंतुमय पदार्थांमुळे खाल्लेल्या अन्नाचे योग्य पद्धतीने पचन होण्यास मदत होते. तसेच बद्धकोष्ठता टाळू शकतो. 

३. सलाडमधील घटकांमुळे कोलेस्टेरॉल कमी होण्यास मदत होते. सध्या अनेकांना कोलेस्टेरॉलची समस्या उद्भवते, त्यावर औषधोपचार केले नाही तर ही समस्या वाढते. पण ती उद्भवूच नये यासाठी आहारात सलाडचा समावेश केल्यास अधिक चांगले. त्यामुळे तुम्ही हृदयरोगापासून स्वत:चा बचाव करु शकता. 

४. शरीराला आवश्यक असलेली जीवनसत्त्वे आणि खनिजे सलाडमधून मिळतात. यामध्ये कॅल्शियम, फोलिक अॅसिड, लोह, जस्त, मॅग्नेशियम, फायबर या घटकांचा समावेश असतो. 

५. जास्त कॅलरीज शरीरासाठी घातक असतात. पण सॅलेडमध्ये कॅलरीजचे प्रमाण अतिशय कमी असते त्यामुळे ते आरोग्यासाठी उत्तम. 

६. सलाडमधील बऱ्याच भाज्या या कंदमुळे असतात. त्यामुळे त्यांच्यात तंतूमय पदार्थ जास्त असल्याने पचनशक्ती सुधारण्यास मदत होते. तसेच दिर्घकाळ ऊर्जा टिकून राहण्यासाठी सलाड फायदेशीर असते.     

७. सलाडमधील घटकांमुळे तुमची त्वचा तजेलदार राहण्यास मदत होते. सलाडच्या सेवनाने चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होण्यासही मदत होते. 

८. आहारतज्ज्ञांच्या मते, सलाडमध्ये कधीही मीठ घालू नये. जर तुम्हाला त्यावर मीठ टाकून खाणे आवडत, असेल तर त्यासोबत सैंधव मीठ किंवा रॉक सॉल्ट वापरा. 

९. जास्त वेळ चिरुन ठेवलेले सलाड खाऊ नये. कारण त्यातील पोषक घटक कमी होतात. तसेच पावसाळ्यामध्ये बॅक्टेरिया खूप सक्रिय असतात, जे शरीरासाठी हानिकारक असतात. 

टॅग्स :हेल्थ टिप्सआरोग्यपौष्टिक आहार