अनेक जण नियमित व्यायाम करतात, डाएट करतात, तरीही वजन काही केल्या कमी होत नाही. यामागे अनेक राणे असू शकतात मात्र बहुतांश वेळा एक महत्त्वाचे कारण असते, ते म्हणजे मेटाबॉलिझम नीट कार्यरत नसणे.(Diet - Gym but still the same weight? see what's wrong with your metabolism ) मेटाबॉलिझम चांगले नसेल तर शरीरात साठलेली चरबी कमी होत नाही आणि प्रयत्न करूनही अपेक्षित परिणाम दिसत नाहीत. त्यामुळे मेटाबॉलिझम म्हणजे काय आणि तो चांगला कसा ठेवता येईल हे समजून घेणे अत्यंत आवश्यक आहे.
मेटाबॉलिझम म्हणजे आपल्या शरीरात सतत चालणारी ऊर्जा निर्मितीची प्रक्रिया. आपण जे अन्न खातो ते पचवून त्यातून ऊर्जा तयार करणे, श्वास घेणे, रक्ताभिसरण चालू ठेवणे, पेशी दुरुस्त करणे, शरीराचे तापमान संतुलित ठेवणे आदी सगळ्या क्रिया होण्यासाठी मेटाबॉलिझम महत्त्वाचे असते. साध्या भाषेत सांगायचे तर शरीर किती वेगाने कॅलरीज जाळते याला मेटाबॉलिझम म्हणतात. ज्यांचा मेटाबॉलिझम चांगला असतो त्यांचे वजन तुलनेने लवकर नियंत्रणात येते, तर मेटाबॉलिझम मंद असले तर वजन कमी करणे कठीण जाते.
मेटाबॉलिझम कमकुवत होण्याची कारणे अनेक असू शकतात. अपुरी झोप, सतत उपाशी राहणे, अतिशय कमी कॅलरीचा आहार, पाणी कमी पिणे, जास्त ताणतणाव, हार्मोन्समधील बदल आणि दीर्घकाळ बसून राहण्याची सवय यामुळे मेटाबॉलिझम मंदावतो. अशा स्थितीत कितीही व्यायाम केला किंवा डाएट केले तरी शरीर चरबी साठवून ठेवते, कारण त्याला ऊर्जा वाचवायची सवय लागली असते.
मेटाबॉलिझम चांगला राहण्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे नियमित आणि संतुलित आहार. खूप वेळ उपाशी राहणे किंवा जेवण टाळणे यामुळे मेटाबॉलिझम आणखी मंदावतो. थोड्या-थोड्या वेळाने योग्य प्रमाणात खाणे शरीराला सतत ऊर्जा मिळत असल्याचा संकेत देते आणि कॅलरी जाळण्याची प्रक्रिया सक्रिय ठेवते. आहारात पुरेशी प्रथिने असणेही महत्त्वाचे आहे, कारण प्रथिने पचवताना शरीर जास्त ऊर्जा खर्च करते.
पाणी पिण्याची सवयही मेटाबॉलिझमवर थेट परिणाम करते. शरीरात पाण्याची कमतरता असेल तर अनेक प्रक्रिया मंदावतात. त्यामुळे दिवसभर पुरेसे पाणी पिणे आवश्यक आहे. सकाळी उठल्यावर कोमट पाणी पिण्याची सवयही मेटाबॉलिझम सुरू करण्यास मदत करते. व्यायामाच्या बाबतीत फक्त चालणे किंवा हलका व्यायाम पुरेसा ठरत नाही. स्नायू मजबूत करणारा व्यायाम केल्यास मेटाबॉलिझम वेगवान होतो, कारण स्नायूंना चरबीपेक्षा जास्त ऊर्जा लागते. तसेच व्यायामात सातत्य ठेवणे महत्त्वाचे आहे. आठवड्यातून एक-दोन दिवस जोरदार व्यायाम करून बाकी दिवस निष्क्रिय राहिल्यास फारसा फायदा होत नाही.
झोप हा मेटाबॉलिझमचा कणा मानला जातो. रोज पुरेशी आणि गुणवत्तापूर्ण झोप न घेतल्यास हार्मोन्स बिघडतात आणि मेटाबॉलिझम मंदावते. त्यामुळे वजन वाढणे किंवा कमी न होणे या समस्या उद्भवतात. ताणतणावही मेटाबॉलिझमवर वाईट परिणाम करतो. सतत तणावात राहिल्यास शरीर ‘स्ट्रेस हार्मोन्स’ तयार करते, जे चरबी जळण्याऐवजी साठवण्यास मदत करतात. वजन कमी करण्यासाठी केवळ डाएट आणि व्यायाम पुरेसे नसून मेटाबॉलिझम मजबूत असणे अत्यंत गरजेचे आहे. मेटाबॉलिझम चांगले असेल तर शरीर आपोआप योग्य पद्धतीने ऊर्जा वापरते आणि वजन नियंत्रणात ठेवणे सोपे जाते.
