Join us

Best Salad Recipe : सॅलेडला सुंदर ट्विस्ट, 4 रेसिपी- मश्रूम-रताळी-काकडीचे असे सॅलेड की तबियात खुश!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2022 17:57 IST

पौष्टिक आणि चविष्ट सॅलेडचे 4 प्रकार.. मश्रुम, रताळे, घेवडा आणि काकडीच्या हेल्दी सॅलेडच्या घ्या सोप्या रेसिपीज!

ठळक मुद्देआहाराद्वारे चव आणि आरोग्य दोन्ही सांभाळायचे असल्यास जेवणात मश्रुम, रताळे, घेवडा आणि काकडीच्या चविष्ट सॅलेडचा अवश्य समावेश करावा. 

जेवणात चवीसोबतच आरोग्याचा विचारही व्हायला हवा. तो झाल्यास अनेक आरोग्यविषयक समस्यांवर आहार हा औषधासारखं काम करतो. उच्च रक्तदाब ही समस्या वाढत चालली आहे. गोळ्या औषधं याद्वारे उच्च रक्तदाब नियंत्रित ठेवला जातो. डाॅ. व्ही. के.मिश्रा म्हणतात उच्च रक्तदाबाच्या समस्येत औषधांसोबतच आहाराची पथ्यंही महत्वाची असतात. आहाराची पथ्यं पाळताना मध्येच काहीतरी चटक-मटक, चटपटीत खाण्याची इच्छा होते. पण यासाठी आहाराची पथ्यं तोडण्याची गरज नसते. डाॅ. व्ही. के. मिश्रा यासाठी मश्रुम, रताळी, बिन्स , केळ, मनुका, काकडी यापासूनच्या पौष्टिक आणि चविष्ट सॅलेडचे पर्याय सूचवतात. हे सॅलेड केवळ उच्च रक्तदाबाच्या रुग्णांसाठीच नाही तर इतर सामान्य लोकांसाठीही महत्त्वाचे आहेत. या सॅलेडच्या रेसिपी अगदी सोप्या आहेत.

Image: Google

मश्रुम सॅलेड

एका मोठ्या भांड्यात 1 कप मश्रुम, 1 बारीक चिरलेला कांदा, 2 बारीक चिरलेले टमाटे, उकडेलेला घेवडा एकत्र करावा. यात थोडा लसूण ठेचून किंवा बारीक चिरुन घालावा. ड्रेसिंगसाठी यात थोडं व्हिनेगर आणि 2 लहान चमचे ऑलिव्ह तेल घालावं. हे सर्व मिश्रण हळूवार हातानं वर खाली करुन एकत्र करावं.

Image: Google

फ्रूट सॅलेड

नेहमीच्या फ्रूट सॅलेडपेक्षा हे फ्रूट सॅलेड वेगळं  आहे. एका मोठ्या भांड्यात  1 कप साधं दही ( सायीचं नाही), अर्धा कप खजूर ( बिया काढून बारीक तुकडे केलेले), अर्धा कप मनुके आणि अर्धं केळ बारीक तुकडे करुन घालावं. हे सर्व नीट मिसळून मग खावं. या फ्रूट सॅलेडमधे सिझनप्रमाणे जांभूळ, नाशपती, संत्री या फळांचाही समावेश करता येतो. 

Image: Google

रताळी आणि घेवड्याचं सॅलेड

रताळी आणि घेवड्याचं सॅलेड करण्यासाठी 2 रताळी, उकडलेला घेवडा, थोडा ब्रोकोली, 1 गाजर, थोडे उकडलेले मक्याचे दाणे आणि सेलेरीचे पानं घ्यावी. हे सर्व नीट बारीक चिरुन एकत्र करावं. यात मीठ आणि थोडी मिरेपूड घालून सॅलेड पुन्हा चांगलं हलवून घ्यावं.

Image: Google

काकडी आणि लसणाचं सॅलेड

लसणाच्या खमंग स्वादाचं हे सॅलेड करण्यासाठी एका भांड्यात काकडी किसून घ्यावी.  यात आधी भाजून मग वाटलेला लसूण घालावा. किसलेल्या काकडीत लसूण मिसळल्यानंतर यात छोटा अर्धा चमचा ॲपल सायडर व्हिनेगर आणि 2 मोठे चमचे पाणी घालवं. हे नीट मिसळून घेतलं की यात थोडा बारीक चिरलेला पुदिना, चवीपुरतं मीठ, काळी मिरेपूड आणि थोडं मध घालून सॅलेड नीट हलवून घ्यावं. 

टॅग्स :अन्नआरोग्यआहार योजना