lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Weight Loss & Diet > ऐन तारुण्यात छातीत जळजळ, डोकेदुखी, अशक्तपणा, लो एनर्जी यानंं त्रस्त आहात? -ही त्याची कारणं...

ऐन तारुण्यात छातीत जळजळ, डोकेदुखी, अशक्तपणा, लो एनर्जी यानंं त्रस्त आहात? -ही त्याची कारणं...

कोरडी त्वचा, निस्तेज चेहरा व केस, डोळ्यांखाली काळी वर्तुळं अशी ही लिस्ट वाढतच जाते. त्यासाठी पार्लरच्या वाऱ्या,कॉस्मेटिक्सवर भरमसाठ खर्च हे सगळं करायला पण खाण्यात बदल करा म्हटलं तर पटत नाही त्यांना ...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2021 01:18 PM2021-04-08T13:18:41+5:302021-04-08T15:53:16+5:30

कोरडी त्वचा, निस्तेज चेहरा व केस, डोळ्यांखाली काळी वर्तुळं अशी ही लिस्ट वाढतच जाते. त्यासाठी पार्लरच्या वाऱ्या,कॉस्मेटिक्सवर भरमसाठ खर्च हे सगळं करायला पण खाण्यात बदल करा म्हटलं तर पटत नाही त्यांना ...

acidity, headache, weakness, low energy all because of poor diet habits | ऐन तारुण्यात छातीत जळजळ, डोकेदुखी, अशक्तपणा, लो एनर्जी यानंं त्रस्त आहात? -ही त्याची कारणं...

ऐन तारुण्यात छातीत जळजळ, डोकेदुखी, अशक्तपणा, लो एनर्जी यानंं त्रस्त आहात? -ही त्याची कारणं...

Highlightsहल्ली मोठ्या मॉल्समध्ये परदेशात मिळतात तसे प्रोटीन बार्स,स्नॅक् बार्स मिळतात जे प्रचंड महाग असतात ,तेच सगळे घटक वापरुन आपण वेगवेगळे लाडू किंवा ड्राय फ्रुट्स चे लाडू बनवतो ते मात्र या मुलांना खायला आवडत नाही, याला काय म्हणावं?

वैद्य राजश्री कुलकर्णी, (एम.डी. आयुर्वेद)

वयाच्या सतरा अठरा वयापर्यंत मुलं मुली दोघांच्याही शरीराची वाढ पूर्ण होते , उंची वाढायची थांबते आणि मग आपण त्यांना म्हणतो की ते ॲडलट्स ( adults) झाले .स्वतःचं रंग,रुप, लुक्स आणि पर्सनॅलिटी याबद्दल सर्वांत जास्त सजग असण्याचा हा तारुण्याचा सळसळता काळ ! कॉलेज लाईफ, खाणं पिणं, फिरणं,गाड्या बेफामपणे चालवणं, आयुष्य एन्जॉय करणं ,मौजमजा हे सगळं अनुभवायचा हा काळ ! याच काळात मग शरीर कमावणे,वेगवेगळे स्पोर्ट्स, पर्सनॅलिटी डेव्हलप करणं हे सगळं सुरु होतं ! थोडंही जास्त वजन असेल तर डाएट करणं हे अगदी आद्य कर्तव्य ठरतं त्यातही मुलींना तर झिरो फिगर वगैरे गोष्टींचं इतकं आकर्षण असतं की थोडंही इकडे तिकडे खायची त्यांची तयारी नसते. लगेच वजन वाढायचा त्यांना धाक असतो .
विशेषतः परदेशात या वयातील मुलांची डाएट फॅड खूप असतात आणि ते जे करतील ते आंधळेपणाने फॉलो करायची आपल्याकडे चढाओढ असते .यात वजन कमी करण्याच्या नादात जीव गमावून बसल्याची उदाहरणं देखील कमी नाहीत.


वास्तविक सर्वांत जास्त एनर्जीची या वयात गरज असते कारण फिजिकल आणि मेंटल दोन्ही ऍक्टिव्हिटीज या वयात खूप मोठ्या प्रमाणात असतात. दिवसभर कॉलेज,क्लासेस,वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज,परीक्षा, सबमिशन्स,स्पर्धा,गॅदरिंगस अशा खूप गोष्टींत मुलं बिझी असतात, त्यांचं मन, मेंदू आणि शरीर व्याप्त असतं .  त्यामुळे सतत शरीराला एनर्जीची गरज असते. होतं नेमकं उलटं ! डाएट,वेळ नसणं, लाज वाटणं अशा अनंत गोष्टींमुळे मुलं या वयात खाण्याची खूप आबाळ करतात. घरातून निघताना धावपळीत काहीही न खाता निघणं, चहा,दूध काहीही न पिणं, डबा न्यायची लाज वाटते म्हणून डबाही न नेणं मग बाहेर काही विशेष मिळत नाही म्हणून काहीतरी तळकट,जंक फूड खाणं, एखादा वडापाव खाऊन दिवस काढणं,चहा पिऊन भूक मारणं ,नुसतं कोल्ड्रिंक पिणं ,घरी गेल्यावरही लगेच बाहेर जायचं म्हणून न खाणं किंवा काहीतरी बळजबरीने, घाईने पोटात ढकलणे, रात्री वेळी अवेळी जेवणं असे सगळे चुकीचे आणि आरोग्य दृष्ट्या घातक उद्योग या वयात मुलं करतात.
छातीत जळजळ, डोकेदुखी, अशक्तपणा, लो एनर्जी ,ऍनिमिया अशा तक्रारी त्यामुळे तरुण वयातील मुलांनाही होताना दिसतात.त्यात जर डाएटिंगचं फॅड डोक्यात असेल तर मग त्या मुलांची रयाच जाते, कोरडी त्वचा,निस्तेज चेहरा व केस ,डोळ्यांखाली काळी वर्तुळं अशी ही लिस्ट वाढतच जाते. त्यासाठी पार्लरच्या वाऱ्या,कॉस्मेटिक्स वर भरमसाठ खर्च हे सगळं करायला ही मुलं तयार असतात पण खाण्यात बदल करा म्हटलं तर मात्र पटत नाही त्यांना ...
तरुण वयात शरीरात होणाऱ्या चयापचयाला अनुसरून किमान तीन वेळा खाणं अपेक्षित आहे.सकाळी बाहेर पडताना भरपूर नाश्ता करुनच निघालं पाहिजे. त्यातही ब्रेड किंवा इतर तेलकट पदार्थ खाण्यापेक्षा घरी तयार केलेले व हेल्दी पदार्थ खावेत म्हणजे आपले ट्रॅडिशनल पदार्थ जसे की ,पोहे,उपमा,थालीपीठ ,इडली वगैरे. या पदार्थांचं वैशिष्ट्य असं की यात कार्बोहायड्रेट, प्रथिनं,स्निग्ध पदार्थ या सगळ्यांचा उत्तम मेळ साधलेला असतो . रवा, पोहे, उडीद डाळ, तांदूळ,विविध डाळी हे बेसिक पदार्थ वापरुन त्या बरोबर वेगवेगळ्या भाज्या ,ओलं खोबरं वगैरे वापरल्यामुळे हे पदार्थ परिपूर्ण होतात. क्वचित बदल म्हणून इतर पदार्थ खाणं ठीक आहे पण मिसळ,वडापाव, सामोसे ,भजी ,सँडविच हे पदार्थ कायम नाश्त्यासाठी खाणं चुकीचं आहे.
जेवणाच्या वेळा पाळणं हे पौष्टिक आहार घेण्याइतकंच महत्वाचं आहे. वेगवेगळ्या कारणांनी जेवणाच्या वेळा रोज बदलणं किंवा एकदम जेवणच स्कीप करणं हे आरोग्याच्या मुळावरच घाला घातल्या प्रमाणे आहे. आपला टिपिकल महाराष्ट्रीयन जेवणाचा मेनू हा परिपूर्ण आहाराचा उत्तम नमुना आहे. वरणभात, भाजी,पोळी ,एखादी ओली कोरडी चटणी, कोशिंबीर / सॅलड ,तूप ,लिंबू असं जेवण केलं तर शरीराला आवश्यक असणारी सर्व तत्त्वं मिळतात . बाहेर खाणं, पिझ्झा, बर्गर्स,सँडविच,केक,पेस्ट्री हे मजा म्हणून खाणं वेगळं आणि नियमित खाणं वेगळं.


तरुण पिढीतील माझे सधन कुटुंबातील अनेक पेशंट्स आहेत जे रोज असं बाहेरचंच दोन्ही वेळा खातात आणि घरचं अन्न आवडत नाही असं म्हणतात. आरोग्यविषयक अनेक तक्रारी त्यामुळे कमी वयातच निर्माण होतात.
सुका मेवा किंवा फळं खाण्याविषयी अनास्था हा या तरुण पिढीचा अजून एक प्रॉब्लेम आहे. फळांचा ताजा रस किंवा फोडी यांना डाऊन मार्केट वाटतात पण कृत्रिम चवीची माझा ,गोल्डस्पॉट सारखी शीतपेये मात्र हे चवीचवीने पितात. घरी फळं सुकून,सडून वाया घालवतात आणि बाहेर मात्र अव्वाच्या सव्वा पैसे देऊन हीच मुलं फ्रुटसॅलड , स्मूदी असले प्रकार खातात.हल्ली मोठ्या मॉल्समध्ये परदेशात मिळतात तसे प्रोटीन बार्स,स्नॅक् बार्स मिळतात जे प्रचंड महाग असतात ,तेच सगळे घटक वापरुन आपण वेगवेगळे लाडू किंवा ड्राय फ्रुट्स चे लाडू बनवतो ते मात्र या मुलांना खायला आवडत नाही, याला काय म्हणावं?
हीच गोष्ट दुधाच्या बाबतीत लागू होते. हल्ली तर शाळकरी मुलं सुद्धा दूध न पिता चहा, कॉफी मागतात आणि आईवडील देखील कौतुकानं ते देतात. वास्तविक खेळ खेळणारी किंवा व्यायाम करणारी मुलं असतील तर हाडांच्या मजबूती साठी रोज किमान २०० ये २५० मिली दूध पिणं आवश्यक आहे, बरीच मुलं जिम इन्स्ट्रक्टरने सांगितलं तर ऐकतात देखील पण इतर मुलांचं मात्र कल्याण आहे !
या एकूणच विषयासाठी मुलांना स्वतःला या विषयी जागरुक करणं आणि घरच्यांनी थोडी शिस्त लावून ते सगळं नीट होईल असं बघणं हे महत्त्वाचं आहे. तरुण पिढी आपल्या देशाचा महत्वाचा आधारस्तंभ आहे आणि तिच्या स्वास्थ्याची जबाबदारी आपली देखील आहे हे आपण लक्षात घ्यायला हवं ,नाही का?

rajashree.abhay@gmail.com
(लेखिका आयुर्वेद तज्ज्ञ आणि  आयु:श्री आयुर्वेदिक हॉस्पिटल व रिसर्च सेंटरच्या संचालक आहेत.) 

 

Web Title: acidity, headache, weakness, low energy all because of poor diet habits

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.