The story about anganwadi tai who makes children to love anganwadi | मुलांना अंगणवाडीचा लळा लावणा-या विश्रांती ताई
मुलांना अंगणवाडीचा लळा लावणा-या विश्रांती ताई

विश्रांती अरुण गोगावले

स्थळ : गोगावलेवाडी, जि. सातारा

मेढा-महाबळेश्वर रस्त्यालगत मेरूलिंग डोंगराच्याजवळ कण्हेर धरणानजीक गोगावलेवाडी गावात विश्रांती किराणा मालाची टपरी चालवायची. गावात तिच्या नणंदबाई अंगणवाडीसेविका होत्या. मात्र, जून 2004ला नणंदेचं निधन झालं आणि विश्रांतीनं ही अंगणवाडी चालविण्याचं ठरवलं. 

गोगावलेवाडीत सुमारे 60 ते 65 कुटुंबं गोसावी समाजाची. यातील एकेका जोडप्याला सात ते आठ मुलं आहेत.  वारंवार येणा-या  बाळंतपणांमुळे आई कुपोषित आणि त्यामुळे बाळ जन्माला येतानाच कुपोषित ! अंगणवाडीत गोसावी वस्तीतील मुलं कधी फिरकत नव्हती. खाऊ घेण्यापुरताच त्यांचा आणि अंगणवाडीचा संबंध !

या वस्तीवर जाऊन विश्रांतीने आरोग्याविषयी जनजागृती करण्याचा प्रयत्न केला; पण जुन्या चालीरितींना घट्ट कवटाळून बसलेल्या येथील महिला कायम लसीकरणाच्या विरोधात होत्या. मग विश्रांतीने छोट्या मुलांवर लक्ष देण्याचं ठरवलं. 

ही मुलं अंगणवाडीत येतील, यासाठी ती प्रयत्न करू लागली. सध्या या वस्तीवर 23 मुलं आहेत, त्यातल्या 11 मुली आणि 4 मुलं नियमित अंगणवाडीत येतात; पण त्यासाठी विश्रांतीने रक्ताचं पाणी केलं आहे.
समाजमंदिरात भरणा-या  अंगणवाडीत पोषण आहार वाटपाची वेळ दुपारी 1 होती. तिथे बसणा-या  मुलांना खाऊ मिळतो, हे हेरून गोसावी समाजातली मुलं घरातून ताटं घेऊन मंदिराबाहेर थांबायची. कधी आहार द्यायला उशीर झाला तर बाहेर उभी राहिलेली ही चिमुरडी ताटावर दगड मारून चक्क थाळी नाद करून स्वत:कडे लक्ष वेधायची. 

प्रसंगी विश्रांतीला ओरखडून, दगड मारून ही मुलं आपला राग व्यक्त करत.
बघता बघता विश्रांतीच्या प्रेमाने चित्र बदललं. विश्रांतीने पहिल्यांदा घरातील मुलं शिक्षणाच्या निमित्ताने घराबाहेर काढली. बाई आपल्याला खायला देतात म्हणून तिनं विद्यार्थ्यांच्या मनात घर केलं. त्यानंतर तिनं स्तनदा माता, मुलं यांच्या आहार आणि लसीकरणाची सुरुवात केली. प्रारंभी याला विरोध झाला.
मात्र, आता बाई सांगतात तर करू, अशी भूमिका पालकांची झाली आहे. अंगणवाडीत येणार्‍या मुलांसह घरी असणा-या गर्भवती महिलांची आरोग्य काळजी घेण्यासाठी ती विशेष प्रयत्न करते. वस्तीतील सातहून अधिक कुपोषित मुलं तिने सामान्य श्रेणीत आणली आहेत.

विश्रांती म्हणते, ‘माया आणि प्रेमाने वागवलं तर मुलं सगळं ऐकतात, याचा अनुभव मी गेल्या 11 वर्षात घेत आहे. पूर्वी जी मुलं शाळेत अत्यंत कळकट अवस्थेत यायची, ती आता छान आवरून येतात. 
अगदी रविवारीही बाई आज शाळेत येऊ का? असं विचारतात.’

---------------------------------------------------

गोसावी वस्ती आणि विश्रांती ताई 

* शिक्षणापासून कोसोदूर असलेल्या, स्वच्छतेची जाणीव हरपलेल्या गोसावी वस्तीतील एकेक मूल शोधून त्यांच्या स्वच्छतेपासून शिक्षणापर्यंत काम 
* अंगणवाडीत ओढून आणलेली सात मुलं आता अकरावी प्रवेशासाठी शहरात येत आहेत.
* गोसावी वस्तीच्या इतिहासात हा दिवस पहिल्यांदाच उजाडला आहे!

- प्रगती पाटील
(वरिष्ठ बातमीदार, लोकमत : सातारा आवृत्ती)

Web Title: The story about anganwadi tai who makes children to love anganwadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.