Steering car in women's hands. | महिलांच्या हातात गाडीचं स्टेअरिंग.

महिलांच्या हातात गाडीचं स्टेअरिंग.

- नेहा सराफ
 

वर्ष १९५३.

मुळा-मुठेच्या काठावर निवांतपणे वसलेल्या पुण्यात सुधा आपटे यांच्याकडे हेवी व्हेइकल (अवजड वाहनांसाठीचं ) एकमेव लायसन्स होतं. सुधा यांचं माहेरही पुण्यातलंच. लग्न झाल्यावर आपट्यांच्या घरात त्या आल्या. तिथे सासरे त्रिंबक यांनी सुरू केलेल्या आपटे मोटार स्कूलचा गाडा पती वासुदेव आपटे पुढे नेत होते. त्याकाळी महिला फारशा चारचाकी चालवत नसत. मुख्य म्हणजे आजच्यासारखी घरोघरी चारचाकी नव्हती. आर्थिकदृष्ट्या संपन्न, डॉक्टर आणि सरकारी नोकर याच वर्गाकडे बहुतांश चारचाकी असायची. पुढे महिलांना जर महिला प्रशिक्षक असेल तर त्या चारचाकी शिकू शकतात हा विचार वासुदेव यांच्या व्यवहारी मनात आला आणि सुधा यांच्या वाहन शिक्षणाचा श्रीगणेशा झाला. त्याकाळी त्यांनी उच्चभ्रू वर्गातील अनेक महिलांना गाडी शिकवली. पुढेपुढे तर त्या इतक्या तयार झाल्या की लांबून गाडीचा आवाज ऐकूनही त्या तिची यांत्रिक स्थिती सांगू शकत असायच्या. काही वर्षांनी त्यांच्या दोनही मुली नीला आपटे - सोमण आणि मोहिनी आपटे - वैशंपायन यांनीही गाडीचं प्रशिक्षण घेतलं आणि दिलंही. या दोघींकडेही हेवी व्हेइकलची लायसन्स होती. याच संदर्भात मोहिनी म्हणतात,‘मी १९८५ ते २००७ अशी २२ वर्षें गाडी शिकवत होते. घरातून बाहेर पडण्याची परवानगी नसणाऱ्या अनेकजणींना अगदी घरी जाऊन कंपाउण्डच्या आतही गाडी शिकवली. विदेशात जाणाऱ्या मुलींपासून, गृहिणी, महिला अधिकारी अशा अनेकजणी माझ्या हातून गाडी शिकल्या. सुरुवातीला फियाट मग मारुती कार आणि सँट्रोही मी शिकवली. काहीवेळा पुरुषांकडून साइड न देणं, टोमणे मारणं असे अनुभव आले; पण कौतुकाचे क्षण माझ्या वाट्याला अनेक आले. मी आजही वयाच्या ६५व्या वर्षी नातवाला फिरवून आणण्यासाठी गाडी चालवते’.

वर्ष २०२०.

१८ वर्ष पूर्ण झालेल्या ऐश्वर्यानं लगेच हौसेनं चारचाकी शिकायला सुरुवात केली. वडिलांसह घरात कोणालाच गाडी येत नसताना तिनं गाडी शिकली आणि ती आता गावाहून तालुक्याला सगळ्या कुटुंबाला फिरवते. ऐश्वर्या म्हणते, ‘चार वर्षे झाली मला गाडी शिकून. सुरुवातीला भीती वाटली, आली मोठी फौजदारीण वगैरे ऐकावं लागलं; पण आता असं बोलणारेच मला तालुक्यापर्यंत सोडवतेस का, म्हणून विचारतात.’ पुण्यात राहणारी पूजा (नाव बदललेलं) गेली १० वर्षे झाली गाडी चालवते. लांबच्या पल्ल्याचा प्रवासही ती करते; पण अजूनही ती ड्रायव्हिंग सीटवर असली की तिचे बाबा आणि धाकटा भाऊ गाडी थांबेपर्यंत सूचना देतात. ती म्हणते, ‘धाकटा भाऊ गाडी चालवत असेल तर बाबा इतक्या सूचना देत नाहीत, मला मात्र देतात. अनेकदा हे मला खटकतं, पण म्हणून मी गाडी चालवणं थांबवणार नाही.’

मागील ११ महिन्यांपासून सरिता आव्हाड पिंपरीत रिक्षा चालवतात. लॉकडाऊनमुळे त्यांचा व्यवसाय अनेक महिने बंद होता. शाळकरी मुलांसाठी आणि महाविद्यालयीन तरुणींसाठी त्यांची रिक्षा नियमित वापरली जायची. या सगळ्या अनुभवाबद्दल त्या सांगतात, ‘मी सकाळी ८ ते संध्याकाळी ७ रिक्षा चालवते. घरचं सगळं आवरून कामाला लागते आणि घरी जाऊनही स्वयंपाक करायचा असतो म्हणून नाइट करत नाही; पण अनेक वयोवृद्ध मंडळी आवर्जून महिला चालकांना प्राधान्य देतात. लहान मुलांचा आणि त्यातही विशेषतः पालकांचाही महिला चालकाची रिक्षा लावण्याकडे कल असतो. वाईट अनुभवही अनेकदा येतात; पण तेच धरून बसलं तर मीटर चालणार नाही, त्यामुळे ते तिथेच टाकून मी पुढे जाते’

संगीता मागील १० वर्षांपासून स्कूलबस चालवतात. पतीचा अपघात झाल्यानं त्यांनी सुरुवात केली आणि आता त्यांना ते काम अंगवळणी पडलं आहे. सकाळी ६ ते ८, सकाळी ११ ते दुपारी २, संध्याकाळी साडेचार ते ७ अशी त्यांची कामाची वेळ आहे. मधल्या वेळेत त्या घरची कामं उरकतात. त्या म्हणतात, ‘कष्ट सगळीकडेच आहेत. मग हे काम का नको, असा मी विचार केला. कोणाच्यातरी हाताखाली दिवसभर राबण्यापेक्षा माझ्या स्टेअरिंगची मी राणी असते. त्यामुळे मला हेच काम आवडतं.’

 

१९ वर्षांची अंकिता गोरख बारवकर दौंड तालुक्यातील वरवंड गावात ट्रॅक्टर चालवते. ती सांगते, ''‘आमच्या फळबागा आहेत. चिकू, डाळिंब, सीताफळांची लागवड केली जाते. अशावेळी वडिलांना मदत म्हणून मी ट्रॅक्टर शिकले. मी शेतीतील कामासाठीच ट्रॅक्टर चालवते. फोटो व्हायरल झाल्यावर अनेकजण कौतुक करतात; पण मी वडिलांना मदत म्हणूनच शिकले.’

या व्यतिरिक्त घरच्या कामांसाठी, आजारी व्यक्तीची ने-आण करण्यासाठी, मुलांना शाळेत सोडायला, ऑफिसमध्ये ये- जा करायला अशा अनेक कारणांसाठी महिला गाडी शिकतात. पण अजूनही तिच्या ड्रायव्हिंगला सहजपणे स्वीकारण्यापेक्षा कुतूहल, आश्चर्य, कौतुक क्वचित खिजवणं, टोमणे मारणं अधिक आहे. समानतेच्या बाता मारणाऱ्या आपल्याला बाई सहजपणे भाजी विकत आणू शकते तशीच चारचाकीही चालवू शकते हे स्वीकारायला मात्र दुर्दैवाने वेळ लागतोय. 

 

(नेहा डिजिटल लोकमतमध्ये वार्ताहर आहे)

neha25saraf@gmail.com

Web Title: Steering car in women's hands.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.