Sanitary Pad Viral Video : महिलांना त्यांच्या मासिक पाळीच्या दिवसांमध्ये स्वच्छतेची खूप काळजी घ्यावी लागते. कारण जराही दुर्लक्ष केलं तर इन्फेक्शन किंवा एखादा गंभीर आजार होण्याचा धोका असतो. त्यामुळे महिला या दिवसात भरपूर काळजी घेतात. मासिक पाळीत सुती कापडांसोबतच आता सॅनिटरी पॅड्स किंवा टेम्पॉनचा वापर केला जातो. पण सोशल मीडियावर सध्या एक व्हिडीओ जोरात व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर जगभरातील महिलांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. कारण या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे की, बाजारात मिळणाऱ्या काही नकली सॅनिटरी पॅड्स महिलांच्या आरोग्यासाठी किती घातक ठरू शकतात.
सामान्यपणे जास्तीत जास्त महिला मार्केटमधून पॅड्स आणून ते थेट वापरतात. पण अलीकडे मार्केटमध्ये बनावट पॅड्सचे पॅकेट्स सहज मिळू लागले आहेत. हे पॅड्स चेक न करता वापरल्यास गंभीर आरोग्य समस्या निर्माण होऊ शकतात. अशाच एका महिलेसोबत घडलेला प्रकार आता सगळ्यांसाठी धोक्याची घंटा ठरला आहे.
ही महिला बाजारातून नव्या पॅड्सचं पॅकेट घेऊन आली होती. वापरल्यानंतर तिला खाज सुटू लागली. तिने ऐकलं होतं की बनावट पॅड्समुळे अशी अॅलर्जी होऊ शकते. म्हणून तिने स्वतःच पॅडची टेस्ट केली. जेव्हा तिने पॅड्स लाईटखाली धरले, तेव्हा तिला धक्का बसला. कारण पॅडच्या आत बुरशी, कीटक आणि काळे डाग स्पष्ट दिसत होते. बाहेरून पॅकेजिंग अगदी स्वच्छ दिसत होतं, पण आतून ते इन्फेक्टेड होतं.
महिलेने हा तिचा अनुभव सोशल मीडियावर शेअर केला आणि व्हिडीओ काही तासांतच व्हायरल झाला. लाखो व्ह्यूज आणि हजारो कमेंट्स मिळाल्या. काहींनी म्हटलं, 'हे डिसिकेंट बीड्स असतील, जे ओलावा शोषतात'. तर काहींनी तो “व्हायरलसाठी बनवलेला व्हिडिओ” असल्याचं मत दिलं. पण बहुसंख्य महिलांनी चिंता व्यक्त केली.
अनेक महिलांनी कमेंट्समध्ये आपल्या अनुभवांची कहाणी सांगितली आहे. काहींनी लिहिलं की, त्यांनाही पॅड वापरल्यानंतर खाज, पुरळ किंवा जळजळ होते. कदाचित हीच त्यामागची खरी कारणं असू शकतात.
