पैसे असणं किंवा नसणं याचा तुमच्या आनंदाशी काहीही संबंध नाही. पगार कमी असल्याने अनेक लोक त्रस्त असताना दुसरीकडे लाखो रुपये कमावणारे देखील समाधानी नसल्याचं समोर आलं आहे. अशा परिस्थितीत पैसा कमावणं जास्त महत्त्वाचं आहे की मानसिक समाधान, शांतता हे स्वत:ला विचारण्याची आता आवश्यकता आहे. याच दरम्यान सोशल मीडियावर एका महिलेच्या पोस्टची जोरदार चर्चा रंगली आहे. ३४ वर्षांची महिला दरवर्षी सुमारे ४० लाख रुपये कमवते, परंतु आता ती इतकी थकली आहे की कामावर जाण्यापूर्वी दररोज रडते. तिने रेडिटवर हा अनुभव शेअर केला.
१२ वर्षांनंतर ब्रेकची आवश्यकता
महिलेने स्पष्ट केलं की, ती एनालिटीक लीड म्हणून काम करते. १२ वर्षे सतत काम केल्यानंतर, तिला सध्या चांगला पगार मिळत आहे, परंतु आयुष्यात अजिबात समाधान नाही. मानसिक आणि शारीरिक थकवा तिच्या आरोग्यावर परिणाम करत आहे. ती ३-४ महिन्यांचा करिअर ब्रेक घेण्याचा आणि नंतर नवीन वर्षाच्या सुरुवातीला कामावर परतण्याचा विचार करत आहे. पण या निर्णयाबद्दल तिच्या मनात अनेक प्रश्न आहेत.
"मी कामावर जाण्यापूर्वी रोज रडते"
महिलेने तिच्या पोस्टमध्ये लिहिलं आहे की, "मी कामावर जाण्यापूर्वी रोज रडते. मला असं वाटतं की, मी आता हे सहन करू शकत नाही." तिने स्पष्ट केले की कामाचा दबाव इतका वाढला आहे की त्याचा तिच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. मानसिक थकवा, झोपेचा अभाव आणि भावनिक अस्थिरता तिला सतत त्रास देत आहेत.
पुन्हा तोच पगार आणि पद मिळेल का?
महिलेला काही महिने सुट्टी घेऊन जानेवारी किंवा फेब्रुवारीमध्ये पुन्हा नोकरी शोधायला सुरुवात करायची आहे. पण तिची सर्वात मोठी भीती अशी आहे की, जर ती काही महिने कामापासून दूर राहिली तर तिला पुन्हा तोच पगार आणि पद मिळेल का? तिच्याकडे काही बचत आहे ज्यामुळे तिला सहा महिने पगाराशिवाय जगण्यास मदत होऊ शकते, परंतु तिला काळजी आहे की यामुळे तिचे करिअर धोक्यात येऊ शकतं.
सोशल मीडियावरील प्रतिक्रिया
महिलेच्या पोस्टवर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेकांनी म्हटलं की मानसिक आरोग्य सर्वात आधी येतं आणि पैसा नंतर येतो. काहींनी तिला खर्च कमी करण्याचा सल्ला दिला जेणेकरून तिची बचत जास्त काळ टिकेल. काहींनी थोडी विश्रांती घेण्याचा सल्ला दिला जेणेकरून तिच्या रिज्युमवर जास्त ब्रेक दिसणार नाही. तर काहींनी महिन्यातून एक सुट्टी घेणं, टीम किंवा रोल बदलणं किंवा कमी तणावपूर्ण नोकरी करणं असे छोटे बदल सुचवले.