भारतात आयफोन खरेदी करणं अनेकदा खूप मोठी गोष्ट मानली जाते, परंतु एका भारतीय महिलेने हा समज मोडीत काढत हा महागडा आयफोनसोबत घेऊन सार्वजनिक वाहतुकीचा वापर केला आहे. इन्स्टाग्रामवर 'स्वाती' नावाच्या महिलेने सांगितलं की, नुकताच बाजारात आलेला १,४०,००० रुपये किमतीचा iPhone 17 Pro Max खरेदी केल्यानंतरही ती इतरांसारखा बसमधूनच प्रवास करणं पसंत करते.
सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये ती एका खचाखच भरलेल्या बसमध्ये उभी असल्याचं दिसत आहे. तिने लिहिलं आहे की, "मी माझ्या स्वतःच्या पैशाने iPhone 17 Pro Max खरेदी केला. तरीही देशातील बाकीच्या लोकांप्रमाणे बसमध्ये उभी आहे. कारण यश नेहमी aesthetic दिसत नाही. कधीकधी ते सार्वजनिक वाहतूक, थकलेले पाय आणि शांत अभिमान यासारखं दिसतं. जर तुम्हाला हे समजलं तर उत्तम. जर नाही समजल, तर हे रील तुमच्यासाठी नाही."
व्हायरल व्हिडिओवर अनेक वेगवेगळ्या प्रतिक्रिया आल्या आहेत, ज्यातून यश आणि आर्थिक निवडीबद्दल लोकांच्या दृष्टिकोनात फरक असल्याचं दिसून येतं. एका युजरने 'किती शांत आणि आनंदी ऊर्जा आहे' अशी कमेंट केली, तर दुसऱ्याने 'अशा प्रकारचा सकारात्मक दृष्टिकोन आवडला' असं म्हटलं. तिसऱ्याने, 'हे खूप प्रेरणादायक आहे' अशी प्रतिक्रिया दिली आहे.
काही युजर्सनी महिलेचं भरभरून कौतुक केलं, तिच्या दृढनिश्चयाची आणि दृष्टिकोनाची प्रशंसा केली. "हे पाहून खरोखर प्रेरणा मिळाली. आनंदी राहा आणि प्रगती करत राहा" असंही म्हटलं. तर काही लोकांनी तिच्या महागडा आयफोन खरेदी करायच्या निर्णयावर टीका केली आहे. "जेव्हा तुम्हाला आधीच माहीत आहे की तुम्ही आर्थिकदृष्ट्या किती संघर्ष करत आहात, तेव्हा आयफोन घेणं हा अजिबात हुशारीचा निर्णय नाही" असं म्हटलं आहे.
