आजच्या धकाधकीच्या जीवनात एक नवीन ट्रेंड पाहायला मिळत आहे. दोन व्यक्ती, दोन पगार आणि मुलांशिवाय एक सुखी आयुष्य! यालाच लोक DINK (डबल इन्कम, नो किड्स) असं म्हणत आहेत. विशेषतः आजची 'जेन-जी' (Gen-Z) पिढी या ट्रेंडने कमालीची प्रभावित झालेली दिसत आहे. तरुण कपल मुलांची जबाबदारी उचलण्यापेक्षा 'डिंक' लाइफस्टाइलला एक उत्तम पर्याय मानत आहेत.
सध्या हा कल वाढत असताना सर्वांच्या मनात एकच प्रश्न येत आहे की, भारतासारख्या देशात जिथे 'कुटुंबाचं महत्त्व' आणि मुलांचं संगोपन हा जीवनाचा अविभाज्य भाग मानला जातो, तिथे तरुणांमध्ये इतका मोठा बदल कसा काय शक्य आहे? गेल्या काही वर्षांत असं काय घडलं की लोक 'डिंक' कल्चरला पसंती देऊ लागले आहेत? याबद्दल मानसोपचारतज्ज्ञ डॉ. भवनीत कौर यांनी जेन-जी पिढीची मानसिकता स्पष्ट केली आहे.
१८% जेन-जी महिलांना मूल नको
एका सर्वेक्षणानुसार, तरुण पालकांची विचारसरणी बदलत आहे. 'नोव्हा आयव्हीएफ फर्टिलिटी अवेअरनेस' सर्वेक्षणात १८% जेन-जी महिलांनी आपल्याला मूल नको असल्याचं स्पष्टपणे सांगितलं आहे. दुसरीकडे 'यूगोव्ह इंडिया'च्या (YouGov India) मते, मेट्रो शहरांमधील १८% तरुण कपलना फक्त एकच मूल हवं आहे.
या बदलामागे अनेक सामाजिक आणि आर्थिक कारणं आहेत. वाढती महागाई आणि मुलांच्या संगोपनाचा खर्च तरुणांना अधिक सावध बनवत आहे. त्याचबरोबर, ते आपले मानसिक आरोग्य, वैयक्तिक स्वातंत्र्य आणि करिअरमधील स्थिरता यांना प्राधान्य देत आहेत. '९ ते ५' च्या धावपळीच्या आयुष्यात तरुण आता पालकत्वाला एक गरज न मानता, एक 'पर्याय' म्हणून पाहत आहेत.
'स्लो लिविंग' कडे कल
एक काळ असा होता जेव्हा तरुण 'हसल कल्चर' (सतत काम करण्याची ओढ) मागे धावत होते. मात्र, आता जेन-जीने ही शर्यत थांबवली आहे. हसल कल्चरमुळे येणारा थकवा आणि मानसिक तणावामुळे तरुण आता 'स्लो लिविंग' कडे वळत आहेत. ते स्वतःचा आनंद, शांतता आणि वर्क-लाइफ बॅलन्स निवडत आहेत.
आजचे तरुण प्रत्येक गोष्ट स्वतःच्या अटींवर जगत आहेत. अशा परिस्थितीत मुलांशिवाय असलेली जीवनशैली त्यांना आकर्षित करत आहे, जिथे त्यांना मुलांच्या जबाबदारीचं दडपण नसतं, उलट स्वतःसाठी वेळ आणि स्वातंत्र्य मिळतं. आजच्या काळात हा केवळ एक ट्रेंड नसून, जगण्याचा एक नवा दृष्टिकोन बनला आहे.
