South Korean Brushing Culture : सामान्यपणे जास्तीत जास्त देशांमध्ये सकाळी झोपेतून उठल्यावर आणि रात्री झोपण्याआधी टूथब्रश करण्याची प्रथा आहे. क्वचितच कुणी दुपारी ब्रश करत असेल, पण जर आपण दुपारच्या जेवणानंतर दक्षिण कोरियामधील एखाद्या ऑफिसमध्ये गेलात, तर एक वेगळंच दृश्य पाहायला मिळेल. प्रत्येकजण आपल्या हातात टूथब्रश आणि मिंट टूथपेस्ट घेऊन वॉशरूमकडे जाताना दिसेल. हे एखाद्या जाहिरातीचं शूटिंग नाही, तर तिथल्या दैनंदिन संस्कृतीचा भाग आहे.
होय, दक्षिण कोरियात लोक दिवसातून तीन वेळा ब्रश करतात. इथे दात साफ ठेवणं हे केवळ वैयक्तिक स्वच्छतेचं चिन्ह नाही, तर सामाजिक शिष्टाचाराचं प्रतीक मानलं जातं. स्वच्छ, उजळ हसणं म्हणजे चांगला स्वभाव आणि आत्मविश्वास यांचं प्रतिक मानलं जातं.
‘ट्रिपल थ्री फॉर्म्युला’?
कोरियामध्ये ब्रश करणं ही एक सार्वजनिक सवय बनली आहे, ज्यात तीन महत्त्वाचे नियम आहेत. दिवसातून तीन वेळा ब्रश करणे, प्रत्येक जेवणानंतर तीन मिनिटांच्या आत ब्रश करणे, आणि ब्रश करताना तीन मिनिटे वेळ देणे. या “ट्रिपल थ्री फॉर्म्युला”मुळे दात केवळ स्वच्छ राहतात असं नाही, तर श्वासातील दुर्गंधीची समस्या दूर होण्यास मदत होते.
शाळेतूनच सुरू होचं ब्रशिंगचं ट्रेनिंग
कोरियन मुलांमध्ये ही सवय लहानपणापासून रुजवली जाते. किंडरगार्टन आणि डे-केअर सेंटर्समध्ये मुलांना एकत्र ब्रश करायला शिकवलं जातं. शिक्षक त्यांना योग्य ब्रशिंगची पद्धत, कालावधी आणि वेळेचं महत्त्व समजावतात. शाळांमध्ये लांब सिंक आणि विशेष "टूथब्रशिंग झोन" असतात, जिथे सर्व मुले एकत्र ब्रश करतात. ही केवळ स्वच्छतेची सवय नाही, तर शिस्त आणि सामूहिक जबाबदारी शिकवण्याचं एक साधन आहे.
ऑफिस आणि सार्वजनिक ठिकाणीही दिसतं हे कल्चर
दक्षिण कोरियामध्ये ही सवय फक्त शाळांपुरती मर्यादित नाही. कॉर्पोरेट ऑफिस, मॉल, कॅफे, बसस्थानकं, रेल्वे स्टेशन सर्व ठिकाणी लोकांना लंच किंवा स्नॅक्सनंतर ब्रश करताना पाहायला मिळतं. सार्वजनिक वॉशरूममध्ये लांब सिंक आणि अनेक नळ असतात, ज्यामुळे लोक सहजतेने ब्रश करू शकतात. कोरियन लोकांसाठी ब्रश करणं हे कॉफी ब्रेकइतकंच दैनंदिन जीवनाचा भाग आहे.
हा ट्रेंड सुरू कसा झाला?
या सवयीची सुरुवात 1980च्या दशकात झाली. त्यावेळी कोरियन डेंटल असोसिएशनने देशभरात एक मोठा ओरल हेल्थ कॅम्पेन सुरू केला होता. उद्देश होता लोकांना दातांच्या स्वच्छतेबद्दल जागरूक करणं. कोरियन अन्नात लसूणाचं प्रमाण जास्त असल्याने अनेकांना तोंडाच्या दुर्गंधीची समस्या येत होती. त्यामुळे तज्ज्ञांनी दिवसातून तीन वेळा ब्रश करण्याची सवय लावण्याचा सल्ला दिला. हळूहळू ही मोहीम संस्कृतीचा भाग बनली आणि आज ती कोरियन जीवनशैलीचा अविभाज्य घटक आहे.
ट्रिपल थ्री फॉर्म्युलाचा फायदा
हा फॉर्म्युला केवळ डेंटल हेल्थ सुधारत नाही, तर आत्मविश्वास वाढवतो. स्वच्छ दात आणि ताज्या श्वासामुळे संवाद अधिक सहज आणि प्रभावी होतो. म्हणूनच आज दक्षिण कोरियामध्ये ब्रश करणं ही केवळ “हायजीन हॅबिट” नाही, तर एक “कल्चर कोड” बनली आहे.
