भारताच्या ७७ व्या प्रजासत्ताक दिनानंतर देशभरात उत्साहाचे वातावरण असताना, एका साध्या पण मनाला भिडणाऱ्या घटनेने सोशल मीडियावरील नेटिझन्सचे आणि नागरिकांचे लक्ष वेधून घेतले आहे. एका रॅपिडो (Rapido) रिक्षाचालकाने रस्त्यावर पडलेला राष्ट्रध्वज अत्यंत आदराने उचलून एका लहान मुलीला परत केल्याचा व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. ही घटना केवळ देशप्रेमाचीच नाही, तर आपल्या राष्ट्रध्वजाप्रती असलेल्या निष्ठेची साक्ष देते. (Viral Video Shows Rapido Captain Honouring The National Flag On Rupublic Day)
नेमकी घटना काय?
प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून सगळीकडे तिरंग्याचा जयजयकार सुरू होता. अनन्या सिंग नावाच्या एका तरुणीने 'एक्स' (पूर्वीचे ट्विटर) वर हा हृदयस्पर्शी व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये दिसते की, अनन्या रॅपिडो रिक्षातून प्रवास करत असताना, शेजारून जाणाऱ्या एका कारच्या खिडकीतून एक छोटी मुलगी मोठ्या उत्साहात तिरंगा फडकवत होती. मात्र, अचानक तिच्या हातातील छोटा ध्वज निसटला आणि रस्त्यावर पडला.
रिक्षाचालकाने तत्परतेने घेतलेला निर्णय चर्चेत आहे. रस्त्यावर पडलेला तिरंगा पाहताच रिक्षाचालकाने क्षणाचाही विलंब न लावता आपली रिक्षा थांबवली. तो खाली उतरला आणि त्याने अत्यंत आदराने तो ध्वज उचलला. इतकेच नाही, तर ध्वजाला लागलेली धूळ त्याने प्रेमाने झटकली आणि तो ध्वज पुन्हा त्या चिमुकलीच्या हातात सोपवला. जेव्हा मुलीला तिचा तिरंगा परत मिळाला, तेव्हा तिच्या चेहऱ्यावर उमटलेले हास्य आणि रिक्षाचालकाच्या डोळ्यातील समाधान कॅमेऱ्यात कैद झाले आहे.
सोशल मीडियावर कौतुकाचा वर्षाव हा व्हिडिओ शेअर करताना अनन्याने लिहिले की, "आज माझ्या रॅपिडो ड्रायव्हरसोबत एक खूप गोड आणि अभिमानास्पद क्षण अनुभवला. एका मुलीने चुकून तिरंगा खाली पाडला होता, माझ्या कॅप्टनने (ड्रायव्हर) खाली उतरून तो स्वच्छ केला आणि प्रेमाने तिला परत दिला."
हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी त्या रिक्षाचालकाचे भरभरून कौतुक केले आहे. अनेकांनी म्हटले आहे की, "खरे राष्ट्रप्रेम हे मोठ्या भाषणांमध्ये नसून अशा छोट्या कृतींमध्ये असते." या साध्या रिक्षाचालकाने दाखवलेला आदर हा प्रत्येक भारतीयासाठी प्रेरणादायी ठरला आहे. अशा प्रकारे, प्रजासत्ताक दिनाच्या धामधुमीत एका सामान्य नागरिकाने आपल्या कृतीतून 'तिरंगा हा केवळ कापडाचा तुकडा नसून तो देशाचा आत्मा आहे' हे पुन्हा एकदा सिद्ध केले आहे.
