'परफेक्ट फिगर' करण्याचं वेड सध्या तरुणींमध्ये पाहायला मिळत आहे. याचच एक भयानक उदाहरण चीनमधून समोर आलं आहे. हुनान प्रांतातील एका १६ वर्षीय मुलीने 'झिरो फिगर' मिळवण्यासाठी इतकं खतरनाक डाएटिंग केलं की ते तिच्या जीवावर बेतलं. मेई असं या मुलीचं नाव असून ती मरता मरता थोडक्यात वाचली. तिची प्रकृती इतकी बिघडली की तिला उपचारासाठी आयसीयूमध्ये दाखल करावे लागले.
साउथ चायना मॉर्निंग पोस्टनुसार, मेईने आपल्या वाढदिवशी 'झिरो साईज'चं स्वप्न पूर्ण करण्यासाठी दोन आठवडे फक्त उकडलेल्या भाज्या खाल्ल्या. सुरुवातीला तिला वाटलं की ती योग्य मार्गावर आहे, परंतु काही दिवसांत तिचे शरीर हार मानू लागले. एके दिवशी, मेईला अचानक श्वास घेण्यास त्रास होऊ लागला आणि ती लगेच बेशुद्ध पडली.
१२ तास मृत्यूशी झुंज
मेईला बेशुद्ध अवस्थेत जवळच्या रुग्णालयात नेण्यात आलं, जिथे डॉक्टर तिचा जीव वाचवण्यासाठी प्रयत्न करत होते. ती १२ तास मृत्यूशी झुंज देत होते. तपासणीत असं दिसून आलं की, मेईच्या शरीरात पोटॅशियमचे प्रमाण इतकं कमी झालं होतं की तिच्या अवयवांनी काम करणं थांबवलं होतं. पोटॅशियमची कमतरता इतकी धोकादायक असू शकते की त्यामुळे हृदयविकाराचा झटका देखील येऊ शकतो आणि एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होऊ शकतो.
सल्ल्याशिवाय करू नका डाएटींग
सुदैवाने, डॉक्टरांनी मेईची जीव वाचवला आणि आता ती पूर्णपणे बरी होऊन घरी परतली आहे. या भयानक अनुभवानंतर, मेईने सांगितलं की, ती आता तज्ज्ञांच्या सल्ल्याशिवाय डाएटींग करणार नाही आणि तिच्या आरोग्याला प्रथम प्राधान्य देईल.