सोशल मीडियावर भन्नाट गोष्टी या नेहमीच व्हायरल होत असतात. अशीच एक गोष्ट जोरदार व्हायरल होत आहे, जी पाहिल्यावर तुम्हाला आश्चर्याचा धक्काच बसेल. अमेरिकेतील लक्झरी रिटेल वेबसाइट नॉर्डस्ट्रॉमवर एक साधी भारतीय किराणा सामानाची बॅग ४८ डॉलर म्हणजेच जवळपास ४,१०० रुपयांना विकली जात आहे. ही बॅग भारतातील अनेक घरात दिसते, ज्याला जपानी ब्रँड प्यूबकोने 'इंडियन स्मारिका बॅग' असं नाव दिलं आहे.
विशेष म्हणजे या बॅगवर हिंदीमध्ये "रमेश स्पेशल नमकीन", "अनिता कन्फेक्शनरी वर्क्स" आणि "चेतक स्वीट्स" असं लिहिलेलं आहे. ही तीच बॅग आहे जी भरपूर सामान विकत घेतल्यावर भारतातील अनेक दुकानांमध्ये मोफत मिळते, पण परदेशात आता ती जास्त किमतीला विकली जात आहे. प्यूबकोने ही कापडाची बॅग स्टायलिश आणि अनोख्या डिझाईनची असल्याचं म्हटलं आहे.
नॉर्डस्ट्रॉमच्या वेबसाईटवर, प्रवाशांसाठी ही बॅग गरजेची असल्याचं म्हटलं आहे. ही बॅग पुनर्वापर केलेल्या साहित्यापासून बनवली आहे आणि भारतीय संस्कृतीचे प्रतिक म्हणून विकली जात आहे. पण भारतीयांसाठी ती फक्त एक किराणा सामानाची पिशवी आहे जी स्नॅक्स, मिठाई किंवा किराणा सामान खरेदी केल्यावर मोफत दिली जाते. या बॅगेचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला.
शील मोहनोत नावाच्या युजरने "हाहा, ही माझ्या शहरातील एका स्नॅक्स स्टोअरची बॅग आहे, जी नॉर्डस्ट्रॉममध्ये ४८ डॉलरला विकली जात आहे" असं म्हटलं आहे. तर दुसऱ्या युजरने "माझी आई ही बॅग फुकट आणायची आणि जर माझ्या आईला ती मोफत मिळाली नाही तर ती दुकानदाराशी भांडली असती आणि पुन्हा कधीही त्या दुकानात गेली नसती" असं म्हटलं आहे. नेटकरी यावर जोरदार प्रतिक्रिया देत आहेत.