बॉलिवूडचा 'हँडसम हंक' वरुण धवन सध्या एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे. पडद्यावर नेहमी हसमुख दिसणाऱ्या वरुणच्या वैयक्तिक आयुष्यात गेल्या काही महिन्यांपासून थोडे चढ - उतार आले, ज्याचा खुलासा त्याने नुकताच 'Be A Man, Yaar!' या पॉडकास्टमध्ये बोलताना केला आहे. वरुणची चिमुकली लेक, लारा, एका गंभीर आजाराशी झुंज देत होती. 'डेव्हलपमेंटल डिस्प्लेजिया ऑफ द हिप' (DDH) नावाच्या या आजारामुळे अवघ्या दीड वर्षांच्या लाराला नीट चालताही येत नव्हते. एका बापासाठी आपल्या लहान मुलीला अडीच महिने प्लास्टरमध्ये पाहणे किती वेदनादायक होते, याची दुःखद कहाणी वरुणने मांडली आहे. नेमका काय आहे हा आजार आणि लहान मुलांच्या बाबतीत पालकांनी कोणती काळजी घ्यायला हवी? याविषयी पाहूयात...(Varun Dhawan daughter Lara DDH disease).
वरुणने सांगितले की, त्याची मुलगी लारा हिला 'डेव्हलपमेंटल डिस्प्लेजिया ऑफ द हिप' (DDH) नावाचा आजार असल्याचे निदान झाले होते. जेव्हा लारा साधारण दीड वर्षांची होती, तेव्हा हा आजार समोर आला, ज्याचा परिणाम तिच्या चालण्यावर आणि धावण्यावर होत होता. 'Be A Man, Yaar!' या पॉडकास्टमध्ये बोलताना वरुणने या आजाराबद्दल सविस्तर माहिती दिली. वरुणने सांगितले की, "आपल्या कंबरेचा सांधा हा एका 'बॉल आणि सॉकेट' प्रमाणेच असतो. मांडणीच्या हाडाचा वरचा भाग (जो चेंडू सारखा गोल असतो) कंबरेच्या हाडातील एका खोलगट भागात घट्ट बसलेला असतो. यामुळेच आपण पाय सर्व दिशांना हलवू शकतो आणि व्यवस्थित चालू शकतो. परंतु या आजारात कंबरेचे ते 'सॉकेट' पुरेसे खोल नसते. त्यामुळे मांडणीच्या (Developmental Dysplasia Of The Hip) हाडाचा गोल भाग त्यात नीट बसत नाही. परिणामी, हा सांधा वारंवार निखळतो किंवा सैल होतो. काही मुलांमध्ये जन्मतःच हा सांधा पूर्णपणे बाहेर सरकलेला असतो, तर काहींमध्ये वाढत्या वयानुसार हा दोष जाणवू लागतो. यामुळे एक पाय दुसऱ्या पायापेक्षा आखूड दिसू शकतो आणि चालताना तोल बिघडतो."
शस्त्रक्रियेशिवाय झाले उपचार...
वरुणने पुढे सांगितले की, सुदैवाने लाराला कोणत्याही मोठ्या शस्त्रक्रियेची गरज भासली नाही. मात्र, नितंबाचा सांधा पुन्हा जागेवर बसवण्यासाठी एक विशेष वैद्यकीय प्रक्रिया करावी लागली. त्यानंतर तिला तब्बल अडीच महिने 'स्पायका कास्ट' (Spica Cast) मध्ये ठेवावे लागले. हा काळ वरुण आणि त्याची पत्नी नताशा दलाल यांच्यासाठी मानसिकदृष्ट्या अत्यंत कठीण होता. "भूल दिल्यानंतर शुद्धीवर आलेल्या आपल्या लहान मुलीला प्लास्टरमध्ये पाहणे पालकांसाठी खूप वेदनादायक होते," अशा शब्दांत वरुणने आपल्या भावना व्यक्त केल्या.
नको कडवट ग्रीन टी, ना डाएटिंग! नेहमीच्या चहात करा १ छोटासा बदल - वजन घटेल, पोट होईल सपाट...
या आजाराची लक्षणं काय आहेत ?
१. दोन्ही पायांच्या लांबीमध्ये फरक दिसणे.
२. मांडीवर किंवा नितंबांवर त्वचेच्या घड्या असमान असणे.
३. बाळाचे पाय बाहेरच्या बाजूला पसरवताना अडथळा येणे किंवा 'कट' असा आवाज येणे.
४. बाळ चालायला लागल्यावर लंगडणे किंवा एका बाजूला झुकून चालणे.
आरशात पाहताच डोळ्यांखालची डार्क सर्कल्सच दिसतात, करा काकडी उपाय-डोळ्यांवरुन हटणार नाही नजर...
काळजी कशी घ्यावी?
१. बाळाला कपड्यात गुंडाळताना पाय मोकळे ठेवावेत. पाय सरळ आणि एकमेकांना जोडून घट्ट बांधू नका. बाळाला पाय मोकळेपणाने हलवता आले पाहिजेत.
२. बाळाला पोटाशी किंवा पाठीवर घेताना त्याचे गुडघे कंबरेपेक्षा थोडे वर आणि पाय पसरलेले (M-Position) असावेत.
३. बाळ जन्माला आल्यावर डॉक्टरांकडून कंबरेच्या सांध्याची तपासणी करून घ्यावी. संशय असल्यास सहा आठवड्यांच्या वयात अल्ट्रासाऊंड सोनोग्राफी करणे फायदेशीर ठरते.
