Emotional Viral Video : एक मुलगी कोणत्याही वडिलांसाठी परीसारखीच असते. बाप आपल्या लेकीवर किती प्रेम करतो, हे खऱ्या अर्थाने एक वडिलच जाणू शकतात. लेकीचे लाड पुरवणं, तिला हवं ते घेऊन देणं, तिची काळजी घेणं हे जवळपास प्रत्येक वडील करतात. त्यांना कुठलाही त्रास होणार नाही ना याबाबत त्यांच्या मनात हुरहुर लागलेली असते. त्यांना कसं सुरक्षित ठेवता येईल याचाही सतत ते विचार करत असतात. सध्या सोशल मीडियावर वडील आणि लेकीच्या नात्याची, प्रेमाची, जबाबदारीची आणि मजबुरीची अशीच एक हृदयस्पर्शी कहाणी सध्या सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. जी पाहून कुणाचंही मन भरून येईल.
पोटाची खळगी भरण्यासाठी, घर चालवण्यासाठी ऑटो रिक्षा चालवणारा एक वडील आणि त्यांच्यासोबत कायम ऑटोमध्ये असलेली त्यांची छोटीशी लेक… हे दृश्य अनेकांच्या मनाला स्पर्श करत आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये ती चिमुकली ऑटो रिक्षात शांत झोपलेली दिसते. तेव्हा व्हिडीओ बनवणारा व्यक्ती त्या ड्रायव्हरला विचारतो, “ही मुलगी तुमचीच आहे का? आणि ती नेहमी तुमच्यासोबतच का असते?”
या प्रश्नावर त्या वडिलांनी सांगितलेली कहाणी ऐकून मनाला नक्कीच चटका बसतो. ते म्हणतात, “तिची आई आता या जगात नाही. घरी आम्ही दोघंच आहोत. तिला एकटी सोडून जाण्याचं धाडस मला होत नाही, म्हणून मी तिला नेहमी माझ्यासोबतच ठेवतो.” त्या शब्दांत दुःखं तर होतंच, पण त्याहून जास्त प्रेम आणि जबाबदारी जाणवते.
व्हिडिओत पुढे ती मुलगी आनंदाने ज्यूस पिताना दिसते. त्या व्यक्तीने तिला मायेने कुशीत घेत म्हटलं, “एक बाप आपल्या मुलीसाठी काहीही करू शकतो.” शेवटी वडील आणि लेक दोघेही हसत निरोप घेतात.
हा व्हिडीओ फक्त एक भावनिक कहाणी नाही, तर तो वडिलांच्या त्यागाची, संघर्षाची आणि प्रेमाची साक्ष आहे. आपल्या मुलांच्या सुरक्षिततेसाठी, त्यांच्या स्वप्नांसाठी एक वडील कितीही अडचणी असल्या तरी खंबीरपणे उभा राहतो, हेच या कथेतून पुन्हा एकदा समोर येतं. म्हणूनच हा साधा पण हृदयाला भिडणारा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
लोकांच्या भावनिक प्रतिक्रिया
हा व्हायरल झालेला व्हिडीओ इन्स्टाग्रामवर @ghatkoparbuzz नावाच्या हँडलवर पोस्ट करण्यात आला आहे. आतापर्यंत या व्हिडिओला ७.७ लाखांपेक्षा जास्त लाइक्स मिळाले आहेत. इतकंच नाही तर लोकांनी हा व्हिडीओ बघून अनेक भावनिक कमेंट्सही केल्या आहेत. एका यूजरने लिहिलं की, "त्याच्या चेहऱ्यावर अजूनही हसू आहे आणि तो त्याच्या जीवनाने आनंदी आहे". तर दुसऱ्या एका यूजरने लिहिलं की, "मी एक सिंगल फादर आहे. एक वडील म्हणून मुलीला हँडल करणं फार अवघड असतं, पण मी मॅनेज करू शकतो".
