ब्रिटनच्या ३५ वर्षीय व्हिक्टोरिया थॉमससोबत असं काही घडलं की, तिचं आयुष्यच बदलून गेलं आहे. एके दिवशी जिममध्ये वर्कआउट सेशनदरम्यान तिचं हृदय अचानक थांबलं. त्यावेळी उपस्थित असलेल्या लोकांनी सीपीआर दिला, रुग्णवाहिका बोलावण्यात आली आणि १७ मिनिटं तिच्या हृदयाचे ठोके थांबले. या घटनेचा संदर्भ देत व्हिक्टोरिया म्हणाली की, "हृदयाचे ठोके थांबल्यानंतर असं वाटलं की मी वर तरंगत आहे आणि माझे शरीर खाली निर्जीव पडलं आहे."
व्हिक्टोरिया थॉमसचा हार्ट अटॅक आल्यानंतर रुग्णवाहिका वेळेवर पोहोचल्याने आणि लगेच सीपीआर दिल्याने जीव वाचला आहे. डॉक्टरांनी नंतर तिच्यात पेसमेकर बसवला, ज्यामुळे भविष्यात कार्डिएक अरेस्ट सारखी स्थिती निर्माण झाल्यास आपोआप शॉक देऊन हृदय पुन्हा सुरू करणं सोपं होईल. महिलेची प्रकृती गंभीर होती, परंतु तीन दिवस कोमात राहिल्यानंतर ती शुद्धीवर आली आणि हळूहळू बरी झाली.
व्हिक्टोरियाला समजलं की, तिला डॅनॉन आजार आहे, हा एक दुर्मिळ अनुवांशिक आजार आहे ज्यामध्ये हृदयाचे स्नायू कमकुवत होतात. हृदय खूप लवकर खराब होऊ शकतं. अनेक प्रकरणांमध्ये त्यामुळे हृदय बंद पडतं. गर्भधारणेदरम्यान ही स्थिती अधिक गंभीर झाली. तिचं हृदय फक्त ११ टक्के काम करत होतं. डॉक्टरांनी स्पष्टपणे सांगितलं की, तिच्याकडे जगण्यासाठी फक्त काही महिने शिल्लक आहेत, जर हार्ट ट्रान्सप्लान्ट ताबडतोब केलं नाही तर तुमचं आयुष्य काही दिवसांचं आहे.
अनेक महिन्यांच्या आशेनंतर, व्हिक्टोरिया थॉमसला एक योग्य हार्ट डोनर सापडला आहे. तो तिच्यासाठी एक आयुष्य बदलणारा क्षण होता. व्हिक्टोरियाचं ऑपरेशन यशस्वी झालं. यानंतर तिचं आयुष्य आणखी बदललं. "आता मी पुन्हा श्वास घेऊ शकते, धावू शकते आणि माझ्या मुलाला मोठं होताना पाहू शकते" असं व्हिक्टोरियाने म्हटलं आहे. या घटनेची सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे.