घर कसं कायम प्रसन्न वाटलं पाहिजे. त्यासाठी घराची स्वच्छता आपण करत असतो. वेगवेगळ्या शोभेच्या वस्तू घरात आणून ठेवतो. सतत कचरा काढतो. लादी पुसतो. अनेक अशा गोष्टी आपण करतो. घरात वास चांगला यावा यासाठी आपण वेगवेगळे रूमफ्रेशनर सुद्धा वापरतो. पण कधीकधी हे रुमफ्रेशनर डोकेदुखीचं कारण ठरतात. त्यांचा वास फारच उग्र असतो. खास करून लहान मुलांना अशा फ्रेशनरर्समुळे त्रास होतो. सर्दी होते. पित्त होतं. पण मग घरातील उबट वास घालवायला काय करायचं ? घरीच छान रूमफ्रेशनर तयार करता येतो. अगदी सोपा आहे.
एक लिटरभर पाणी घ्या. ते उकळत ठेवा. त्या पाण्यामध्ये लवंग घाला. वापरून झालेल्या लिंबाचे तुकडे घाला. सालं घाला. रोजमेरीची एक काडी घाला. पाणी भरपूर उकळून घ्या. पाण्याची पातळी कमी होईल. पाणी अर्धा लीटर पर्यंत कमी झाले की त्यात व्हॅनिला इसेंस घाला. बाजारात तो आरामात विकत मिळतो. त्याचा वास छान येतो. आता ते पाणी गार होऊ द्या. गार झाल्यावर ते एका स्प्रेच्या बाटलीत गाळून घ्या. गाळले नाही तर साले सडू शकतात.
लवंग कशाला घालायची असा प्रश्न पडला असेल ना. लवंगेच्या वासाने किटाणू पटकन घरात येत नाहीत. वासही फार उग्र येत नाही. आता हा स्प्रे तयार करा आणि वापरा. वापरताना लक्षात ठेवा की, विकतच्या फ्रेशनर प्रमाणे याला घट्टपणा नाही. यात केमिकल्स नाहीत. त्यामुळे स्प्रे करताना वरच्या दिशेने करा. चालू पंख्यावर स्प्रे केला तर उत्तमच. असं केल्याने स्प्रे मधून गळलेले पाणी जमिनीवर पडून जमीनीला ओल येणार नाही. लहान मुलांनाही याचा त्रास होणार नाही. उलट आरोग्यासाठी चांगलेच आहे. यातील कोणताही पदार्थ हानिकारक नाही. आवडत असेल तर थोडा कापूरही यात घालू शकता.