रिक्षाने अनेक जण दररोज प्रवास करतात. या प्रवासादरम्यान त्यांच्यासोबत काही घटना देखील घडतात. काही वेळा रिक्षा चालकाची मुजोर पाहायला मिळते तर कधी प्रामाणिकपणा. अशीच एक घटना आत समोर आली आहे, जी सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. एका महिलेने लिंक्डइनवर एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये तिने ऑफिसला जाताना तिला आलेला अनुभव सांगितला आहे.
महिलेने सांगितलं की एका रिक्षा चालकाने तिला रस्त्याच्या मधोमधच सोडलं आणि तिच्या आयुष्यात तिने घेतलेल्या निर्णयांवरही टिप्पणी केली. मुंबईच्या आदिती गणवीरने लिंक्डइनवर एक पोस्ट पोस्ट केली. "ऑफिसला पोहोचण्यापूर्वी एक किलोमीटर आधीच रिक्षा चालक थांबला आणि पुढे जाण्यास नकार दिला. ऑफिसला जाण्यासाठीचं एकूण अंतर १९ किलोमीटर होते, परंतु चालकाच्या मते ते "खूप दूर" होतं, म्हणून तो १८ किलोमीटर चालवल्यानंतर थांबला."
"रिक्षा चालकाने यानंचर नोकरीच्या निवडीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आणि पगाराचा हिशोब सुरू केला. तुम्ही इतक्या दूरची नोकरी का स्वीकारली? असा प्रश्न विचारला. कदाचित तो आधी कोणत्याही दबावाशिवाय स्वतःहून सहमत झाला असला तरी आता तो राईड घेतल्याबद्दल पश्चात्ताप करत असेल. कधीकधी तुमचा प्रवास इतरांना कठीण वाटू शकतो आणि ते तुम्हाला वाटेतच सोडून देतील. काही हरकत नाही, फक्त त्यांना १ स्टार द्या आणि पुढे जा" असं आदितीने म्हटलं आहे.
लिंक्डइनवर अनेक लोकांनी आदितीच्या या पोस्टवर अत्यंत मनोरंजक प्रतिक्रिया दिल्या आहेत. तिची पोस्ट सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. एका लिंक्डइन युजरने गमतीने "ऑटो राईडसाठी हा खूप लांबचा प्रवास आहे" असं म्हटलं. यावर आदितीने हसून उत्तर दिलं, "असं वाटतं की तू त्या रिक्षा चालकाशी बोलला आहेस."