Join us
Daily Top 2Weekly Top 5

लग्न कर म्हणून घरच्यांनी खाल्लं डोकं, संतापून मुलीनं केलं टक्कल- ती म्हणते, आता बोला..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2026 18:13 IST

Tired of Marriage Pressure, Woman Shaves Her Head - Viral Video Sparks Debate : लग्नाच्या विषयावरुन मुलीने उचलले भलतेच पाऊल.

अलीकडे सोशल मीडियावर एका तरुणीचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आणि त्यावरुन लग्न, स्वातंत्र्य आणि समाजाच्या अपेक्षा याबद्दल मोठी चर्चा सुरू झाली. व्हिडिओ एका मुलीचा होता. हा समाज मला जगू देणार आहे की नाही असा प्रश्न ती विचारत होती. (Tired of Marriage Pressure, Woman Shaves Her Head - Viral Video Sparks Debate)पण तिच्यावर अशी वेळ का आली आणि नक्की प्रकार काय घडला? झाले असे की लग्नाचे वय आहे, तरुण आहे, वेळेतच लग्न व्हावं यासाठी घरच्यांचा दबाव वाढत होता. समाजाकडून टोमणे ऐकावे लागत होते. स्थळं येत होती आणि मुलीला भेटण्याची इच्छा अजिबात नव्हती. वैतागून तिने अजबच निर्णय घेतला. कोणालाही न जुमानता तिने टक्कल करुन टाकलं.    

काही लोकांनी तिच्या निर्णयाला धाडसाचे पाऊल म्हटले, तर काहींनी इतका टोकाचा निर्णय घेण्याची गरज नव्हती असे मत व्यक्त केले. मात्र या घटनेमुळे एक मोठा प्रश्न पुन्हा समोर आला की मुलींना लग्न करायची इच्छा का नसते? पूर्वीच्या काळात शिक्षण, करिअर किंवा आर्थिक स्वावलंबन यासाठी महिलांना फारशा संधी मिळत नव्हत्या. त्यामुळे ठराविक वयानंतर लग्न करणे हा आयुष्याचा पुढचा टप्पा मानला जायचा. पण आता परिस्थिती खूप बदलली आहे. आज अनेक मुली शिक्षण घेत आहेत, स्वतःच्या पायावर उभ्या राहत आहेत आणि करिअर घडवण्यावर भर देत आहेत. त्यामुळे लग्न हा आयुष्याचा एकमेव उद्देश न राहता तो फक्त एक भाग आहे याची जाणीव मुलींना झाली आहे. अनेकांना आधी स्वतःचे ध्येय पूर्ण करायचे असते, स्वतःला ओळखायचे असते आणि मगच लग्नाचा विचार करायचा असतो.

पण घरच्यांचा दबाव हा देखील एक महत्त्वाचा मुद्दा ठरतो. अनेक कुटुंबांमध्ये मुलगी ठराविक वयात आली की लग्नाचा विषय वारंवार काढला जातो. नातेवाईकांची विचारपूस, लोकांचे टोमणे, काही वेळा हा दबाव इतका वाढतो की मुलींना मानसिक ताणही जाणवू लागतो. अशा परिस्थितीत काही जणी शांतपणे आपले मत मांडतात, तर काही वेळा सोशल मीडियावर दिसल्याप्रमाणे वेगळ्या पद्धतीने आपला विरोध व्यक्त करतात.

खरं तर लग्न करायचं की नाही, कधी करायचं किंवा कोणाशी करायचं हा निर्णय प्रत्येक व्यक्तीचा वैयक्तिक असतो. बदलत्या काळात मुली स्वतःच्या आयुष्याबद्दल अधिक सजग होत आहेत आणि स्वतःचे निर्णय स्वतः घेण्याची इच्छा व्यक्त करत आहेत. त्यामुळे कुटुंब आणि समाजानेही या बदलत्या विचारसरणीकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलणे गरजेचे आहे. 

मला माझ्या स्वातंत्र्यापेक्षाही प्रिय असलेले केस मी कापले, पण माझ्यावर अशी वेळ का यावी. असे निर्णय घ्यायची इच्छाच का व्हावी. हा समाज मला जगू देणार आहे की नाही? असे विविध प्रश्न त्या मुलीने विचारले. हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला. काहींनी हसण्यावारी नेला पण परिस्थिती खरंच गंभीर आहे का ?

English
हिंदी सारांश
Web Title : Woman shaves head, frustrated by marriage pressure; video sparks debate.

Web Summary : Fed up with relentless marriage pressure, a young woman shaved her head, sparking online debate about societal expectations. She questions if society will allow her to live freely, highlighting the conflict between tradition and individual choice.
टॅग्स :सोशल व्हायरलसोशल मीडियालग्नमहिला