बऱ्याचदा घरात भांडी धुण्याचा साबण संपतो. त्यावेळी भांडी नेमकी कशी स्वच्छ करायची असा प्रश्न पडतो. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, साबणाशिवायही भांडी सहज स्वच्छ करता येतात. काही कमाल ट्रिक्स वापरून तुम्ही साबणाशिवाय भांडी एकदम नव्यासारखी चकाचक करू शकता. यासाठी बाहेरून कोणतीही वस्तू आणण्याची गरज नाही. भांडी कशी स्वच्छ करायची हे जाणून घेऊया...
बेकिंग सोडा वापरा
साबणाशिवाय भांडी स्वच्छ करण्यासाठी बेकिंग सोडा खूप प्रभावी ठरू शकतो. सर्वप्रथम भांडी गरम पाण्याने धुवा आणि त्यावर थोडा बेकिंग सोडा टाका. सोडा थोडा वेळ तसेच राहू द्या आणि नंतर स्पंज वापरून स्वच्छ करा. जर प्लेट्स चिकट असतील तर बेकिंग सोडा भांड्यांवर ५-६ मिनिटे राहू द्या. नंतर नीट घासल्यानंतर, भांडी पुन्हा पाण्याने धुवा.
नॅचरल क्लिनर बनवा
घरी नॅचरल क्लिनर बनवण्यासाठी, एक कप गरम पाणी घ्या. त्यात २ चमचे मीठ आणि लिंबाचा रस घाला. सर्व घटक पूर्णपणे मिसळून हे मिश्रण तयार करा. या मिश्रणाचा एक चमचा भांड्यांवर ओता आणि ते चांगले घासून घ्या. यामुळे तुमची भांडी पूर्णपणे स्वच्छ होतील. मीठ भांड्यांमधून अन्नाचे कण काढून टाकण्यास मदत करतं आणि लिंबू भांड्यांमधून येणारी दुर्गंधी दूर करतं.
राखेने स्वच्छ करा
भांडी धुण्याच्या साबणाचा शोध लागण्यापूर्वी भांडी स्वच्छ करण्यासाठी राख वापरली जात असे. राख भांडी स्वच्छ करण्यास, दुर्गंधी दूर करण्यास आणि भांडी निर्जंतुक करण्यास मदत करते. राख थेट भांड्यांवर टाका. स्पंज आणि पाण्याने स्वच्छ करा.
तांदळाचं पाणी वापरा
तांदळाच्या पाण्यात स्टार्च आणि सायट्रिक अॅसिड असल्याने चिकटपण सहज निघून जातो. तुम्हाला फक्त एका भांड्यात तांदळाचे पाणी घ्यायचं आहे आणि भांडी त्यात ३० मिनिटे भिजवून ठेवा. त्यानंतर भांडी चांगली, स्वच्छ धुवा. अशा प्रकारे तुम्ही भांडी सहज स्वच्छ करू शकता.
व्हिनेगरचा वापर करा
एक स्प्रे बॉटल घ्या. त्यात १ कप पाणी आणि ४-५ चमचे व्हिनेगर घाला. बॉटल चांगली हलवा आणि संपूर्ण भांड्यावर स्प्रे मारा. भांडी काही मिनिटं तशीच राहू द्या. नंतर स्पंज आणि कोमट पाण्याने ती पूर्णपणे स्वच्छ करा. याशिवाय, बेकिंग सोडा आणि लिंबाचा रस मिसळून भांडी देखील सहज स्वच्छ करता येतात.