Join us
Daily Top 2Weekly Top 5

लेकीला उलट्या, आईच्या डोळ्यात पाणी; पुढे जे घडलं ते पाहून तुम्ही कराल भारतीय रेल्वेला सलाम!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2026 14:43 IST

बंगळुरूहून गुजरातसाठी प्रवास करणाऱ्या एका महिला प्रवाशाच्या मुलीची तब्येत ट्रेनमध्ये अचानक बिघडली.

सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ हे व्हायरल होत असतात. असाच एक व्हिडीओ सध्या लोकांचं लक्ष वेधून घेत आहे. बंगळुरूहून गुजरातसाठी प्रवास करणाऱ्या एका महिला प्रवाशाच्या मुलीची तब्येत ट्रेनमध्ये अचानक बिघडली. आजारी मुलीची अवस्था पाहून आईच्या डोळ्यात पाणी आलं. जेव्हा परिस्थिती हाताबाहेर गेली, तेव्हा महिलेने टीटीईकडे (TTE) औषधं मागवण्याबाबत चौकशी केली. विशेष म्हणजे यानंतर पुढच्या स्टेशनवर खुद्द डॉक्टरच औषधं घेऊन हजर झाले.

इन्स्टाग्रामवर 'डॉक्टर भावना' (@chaos_to_care) नावाच्या युजरने रेल्वेतील प्रवासाचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडिओच्या सबटायटलमध्ये त्यांनी सांगितलं की, १३ मार्च रोजी बंगळुरूहून गुजरातला जात असताना मी माझ्या मुलीला शेवग्याच्या शेंगांचं सूप पाजलं, त्यानंतर तिला उलट्या होऊ लागल्या. मुलीला त्रास होताना पाहून आई घाबरली आणि तिने टीटीईला औषध ऑर्डर करण्याबाबत विचारलं.

पुढच्या स्टेशनवर मिळाले उपचार

भावना यांनी सांगितलं की, टीटीईशी बोलल्यानंतर अवघ्या काही मिनिटांतच हिंदपूर स्थानकावर एक डॉक्टर आले होते. त्या डॉक्टरने मुलीची नीट तपासणी केली आणि तिला औषध दिलं. विशेष म्हणजे डॉक्टरांनी औषधाचं रितसर बिलही दिलं. या तत्पर सेवेने महिला प्रवाशाला आश्चर्याचा धक्का बसला आणि त्यांनी भारतीय रेल्वेचे मनापासून आभार मानले. ३४ सेकंदांच्या या रीलच्या शेवटी मुलगी सुखरूप आणि आनंदी दिसत आहे.

"तुम्ही नशीबवान होतात, अनेकदा असं घडत नाही"

भारतीय रेल्वेच्या या कामगिरीचं युजर्स कमेंट सेक्शनमध्ये जोरदार कौतुक करत आहेत. एका युजरने लिहिले, "मी रेल्वे हॉस्पिटलमध्ये कार्यरत आहे आणि आम्ही ट्रेनमधील अशा अनेक इमर्जन्सी मेडिकल केसेस हाताळतो." दुसऱ्या युजरने लिहिले, "तुम्ही नशीबवान होतात, अनेकदा असं घडत नाही." तर अन्य एकाने म्हटले की, "जेव्हा जेव्हा शक्य असतं, तेव्हा भारतीय रेल्वे पुढच्या स्टेशनवर मदत मिळेल याची खात्री करते. ही मदत खरोखरच कौतुकास्पद आहे. भारतीय रेल्वेला सलाम!"

"भारतीय रेल्वेचे खूप खूप आभार!"

डॉक्टर भावना यांनी कॅप्शनमध्ये लिहिलं की, "धावत्या ट्रेनमधील घाबरलेल्या अवस्थेपासून ते सुटकेच्या श्वासापर्यंतचा हा प्रवास होता. माझ्या बाळाला मदतीची गरज होती आणि ती अपेक्षेपेक्षा लवकर मिळाली. वेगवान वैद्यकीय मदत, योग्य काळजी आणि पारदर्शकता! भारतीय रेल्वेचे खूप खूप आभार!" भावना यांनी पालकांना सल्ला दिला की, प्रवासादरम्यान अशी परिस्थिती आली तर अजिबात घाबरून जाऊ नका, रेल्वे कर्मचाऱ्यांना त्वरित माहिती द्या, मदत नक्की मिळेल. 

English
हिंदी सारांश
Web Title : Indian Railways: Mother's tears turn to gratitude after daughter falls ill.

Web Summary : A mother traveling by train from Bangalore to Gujarat was worried when her daughter fell ill. The TTE arranged for a doctor at the next station, who provided immediate treatment. The mother thanked Indian Railways for their prompt service and care.
टॅग्स :भारतीय रेल्वेव्हायरल व्हिडिओसोशल मीडियासोशल व्हायरल