Join us

खतरनाक! सोशल मीडियावर फेमस होणं १९ वर्षांच्या मुलीच्या जीवावर बेतलं, काय आहे डस्टिंग चॅलेंज?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2025 17:40 IST

एका १९ वर्षीय मुलीचा सोशल मीडियाच्या खतरनाक ट्रेंडच्या नादात मृत्यू झाला आहे.

सोशल मीडियावर विविध गोष्टी व्हायरल होत असतात. अशीच एक धक्कादायक घटना आता समोर आली आहे. एरिझोनाच्या एका १९ वर्षीय मुलीचा सोशल मीडियाच्या खतरनाक ट्रेंडच्या नादात मृत्यू झाला आहे. पालकांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलगी व्हायरल होणाऱ्या "डस्टिंग" चॅलेंजमध्ये भाग घेत होती, ज्याला "क्रोमिंग" असंही म्हणतात.

काय आहे डस्टिंग चॅलेंज?

सोशल मीडिया प्रोफाईल आणि व्हिडिओंवर अधिक व्ह्यूज मिळविण्यासाठी या ट्रेंडमध्ये युजर्स कीबोर्ड क्लीनिंग स्प्रे हुंगतात आणि ते करत असताना स्वत:चं रेकॉर्डिंग करतात. हे चॅलेज करत असताना रेना ओ'रूर्केला कार्डिएक अरेस्ट आला. तिला उपचारासाठी तातडीने रुग्णालयात नेण्यात आलं. जवळजवळ एक आठवडा बेशुद्धावस्थेत होती, त्यानंतर तिला ब्रेन डेड घोषित करण्यात आलं. 

"पप्पा... मी प्रसिद्ध होणार आहे"

पालकांना या घटनेने मोठा धक्का बसला आहे. "ती नेहमी म्हणायची, पप्पा... मी प्रसिद्ध होणार आहे. फक्त तुम्ही पाहत राहा. मी प्रसिद्ध होणार आहे" असं मुलीचे वडील आरोन ओ'रुरके यांनी एझेड फॅमिलीला सांगितलं आहे. मुलीच्या आईनेही याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. पालक आता इतरांना सावध करण्याचा प्रयत्न करत आहेत जेणेकरून अधिक तरुण त्याला बळी पडू नये.

अत्यंत चिंताजनक ट्रेंड

ऑनरहेल्थ स्कॉट्सडेल ऑसबॉर्न मेडिकल सेंटरमधील अतिदक्षता विभागाचे प्रमुख डॉ. रँडी वीसमॅन यांनी या ट्रेंडला “अत्यंत चिंताजनक” म्हटलं आहे. "जेव्हा मुलं गॅसमधील हे केमिकल श्वास घेण्याच्या माध्यमातून आत घेतात. तेव्हा ते प्रत्यक्षात मुलांच्या फुफ्फुसांमध्ये आणि त्यांच्या शरीराच्या उर्वरित भागात ऑक्सिजनची जागा घेतं" असं त्यांनी स्पष्ट केलं आहे.

गॅसमुळे थोड्या वेळासाठी उत्साहाची भावना निर्माण होऊ शकते, परंतु नुकसान हे कायमचं होणारं आणि जीवघेणं असू शकतं. डॉक्टर म्हणाले की, यामुळे लिव्हर फेल्युअर, हार्ट फेल्युअर, फुफ्फुसांचा आजार होऊ शकतो. अनेक तरुणांसोबत असं घडलं आहे. 

टॅग्स :सोशल व्हायरलसोशल मीडिया