Join us

मैद्याचा जाडजूड पिझ्झा बेस नको म्हणत कुणी मूगडाळ पिझ्झा करतं का? याला पिझ्झा म्हणावं की..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2023 16:37 IST

Swadeshi Moong Dal Corn Burst Pizza Viral Video : पिझ्झा हेल्दी आणि देसी व्हावा यासाठी एकाने चक्क पिझ्झाचा बेस म्हणून मूग डाळ वापरली

पिझ्झा हा गेल्या काही वर्षात आपल्या देशात अतिशय आवडीने खाल्ला जाणारा पदार्थ. यामध्ये असंख्य प्रकार उपलब्ध असून लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडणारा हा पदार्थ आपल्याला हवे ते टॉपिंग घालून मिळतो. झटपट होणारा आणि तरीही क्रंची, चिझी असा हा पिझ्झा आपण प्रत्येक जण कधी ना कधी खातो. या पिझ्झाचा बेस मैद्याचा असल्याने त्यावर कितीही भाज्या घातल्या तरी तो अजिबात हेल्दी नसतो असे म्हटले जाते. पण हा बेसच जर बदलला तर पिझ्झा नक्कीच हेल्दी होऊ शकतो. आता हेल्दी बनवायचं म्हणून काय करायचं यालाही काही सीमा असते. पिझ्झा हेल्दी आणि देसी व्हावा यासाठी एकाने चक्क पिझ्झाचा बेस म्हणून मूग डाळ वापरली (Swadeshi Moong Dal Corn Burst Pizza Viral Video). 

स्वदेशी पिझ्झा म्हणत इन्स्टाग्रामवर हा व्हिडिओ अपलोड करण्यात आला आहे. यामध्ये एक व्यक्ती चक्क एका तव्यावर मूगाच्या पीठाचे धिरड्यासारखे जाडसर काही टाकताना दिसतो. तो पिझ्झाचा बेस आहे असेही तो सांगतो. हा बेस मूगाचा असून मैदा वापरलेला नाही असेही हा व्यक्ती अतिशय आनंदाने सांगताना दिसतो. मग या जाडसर अशा बेसचे एका सुरीने ८ काप केले जातात आणि त्याचा वरचा भाग वेगळा केला जातो. आतमध्ये कांदा, गाजर आणि शिमला मिरची बारीक चिरुन घातल्या जातात. त्यावर कॉर्न आणि मोझोरोला चीज घालते जाते. त्यावर चीज स्लाईसही लावले जातात आणि मग हा ओपन केलेला वरचा भाग पुन्हा खाली जोडला जातो. 

यावर पुन्हा बटर, मोझोरोला चीज, चीज स्लाईस आणि थोड्या भाज्या घालून तो चांगला गरम केला जातो. पाहताना हा पिझ्झा नेहमीच्याच पिझ्झासारखा दिसतो. मात्र तो खाण्यासाठी अतिशय हेल्दी असल्याने प्रत्येकाने हा पिझ्झा एकदा तरी ट्राय करावा असे आवाहन या व्हिडिओद्वारे करण्यात येत आहे. या पिझ्झाची किंमत २०० रुपये असून तो दिल्लीच्या मेट्रो स्टेशनच्या गेट क्रमांक २ पाशी मिळत असल्याचे या पोस्टच्या कॅप्शनमध्ये नमूद केलेले आहे. साधारण महिन्याभरात १३ लाखांहून अधिक जणांनी हा व्हिडिओ लाईक केला असून असंख्य जणांनी तो पाहिला आहे. नेटीझन्सनी यावर संमिश्र प्रतिक्रिया देत आपली मतं नोंदवली आहेत. 

टॅग्स :सोशल व्हायरलसोशल मीडियाअन्नपाककृती