Join us  

चाॅकलेट-आइस्क्रीमसह जंक फूडच्या जाहिराती टीव्हीवर दाखवायच्या नाहीत, सरकारने ‘असा’ नियम केला कारण..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2024 6:01 PM

जाहिरातीतील मुलं आइस्क्रीम-चाॅकलेट खाताना पाहून इतर मुलांनाही ती खावीशी वाटतात. अशा जाहिराती पाहून मुलांच्या सवयी बिघडतात. हे होवू नये म्हणून स्पेन सरकारने एक महत्वपूर्ण निर्णय घेतला.. 

ठळक मुद्देटीव्हीवरील जाहिरातीत मुलं चाॅकलेट आइस्क्रीमसारखे जंक फूड खाताना दिसली तरी हे पदार्थ आपण खायचे की नाही, किती खायचे हे आपल्या आरोग्याचा विचार करुन ठरवायचं आहे. 

माधुरी पेठकरटीव्हीवर एखादा कार्यक्रम बघत असताना लहान मुलं जाहिरातींकडे टक लावून बघत असतात. बऱ्याचशा जाहिराती या खाण्यापिण्याच्या असतात. चाॅकलेट, आइस्क्रीमच्या जाहिराती बघून मुलं आई बाबांकडे तेच खायला द्या असा हट्ट करतात.  हे फक्त आपल्याकडेच होतं असं नाही, जगात कुठेही जा मुलं खाण्यापिण्याच्या बाबतीत टीव्हीवर पाहिलेल्या जाहिरातींचे उदाहरण देतात आणि आपल्यासाठी खाण्यापिण्याचे पदार्थ निवडतात. पण जाहिरातीत जे दाखवलं ते आपल्यासाठी, आपल्या आरोग्यासाठी चांगलंच असतंच असं नाही, हे कळण्याचं ते वय नसतं. पण जंक फूड खायला घालून मुलांच्या आरोग्याशी खेळायचा अधिकार कुणालाही नाही असं म्हणत स्पेन सरकारने एक अत्यंत धाडसी निर्णय घेतला आहे. 

(Image :google)

जंकफूडच्या जाहिरातींवर बंदीमुलांच्या आरोग्यावर वाईट परिणाम होतो, जाहिराती पाहून त्यांच्या खाण्यापिण्याच्या सवयी बिघडतात त्यामुळे टीव्ही, रेडिओ, इंटरनेटवर १६ वर्षांखालील मुलांना लक्ष्य करुन केलेल्या जंक फूडच्या जाहिराती दाखवायच्या नाहीत असा नियम स्पेनच्या सरकारने २०२२ मध्ये केला. स्पेनआधी ब्रिटन सरकारने आपल्या देशात टीव्हीवर रात्री नऊ वाजण्याआधीच्या कार्यक्रमादरम्यान १६ वर्षांखालील मुलांना लक्ष्य करणाऱ्या जंकफूडच्या जाहिराती दाखवायच्या नाहीत असा नियम केला होता. कारण ब्रिटनमध्ये १० ते ११ वर्षांची १४ लाख मुलांपैकी ३५ टक्के मुलं स्थूल होती. लहान मुलांमधील स्थूलता (ओबेसीटी) ही समस्या गंभीर होत होती. त्यावरचा उपाय म्हणून ब्रिटनच्या सरकारने विशिष्ट वेळेतील कार्यक्रमादरम्यान १६ वर्षांखालील मुलांना लक्ष्य करुन करण्यात येणाऱ्या जंक फूडवरील जाहिरातींवर बंदी आणली.पण स्पेनने ब्रिटन सरकारच्या एक पाऊल पुढे टाकून मुलांना लक्ष्य करुन करण्यात येणाऱ्या जंक फूडच्या जाहिराती टीव्ही, रेडिओ, इंटरनेटवरुन दाखवण्यावर बंदी आणली. चाॅकलेट, आइस्क्रीम, शीतपेयं, केक, पेस्ट्रीज यासारखे पदार्थ चवीला छान लागतात. त्यामुळे ते मुलांना हवेसे वाटतात. आणि जाहिरातीत जर त्यांच्याच वयाची मुलं हे पदार्थ खात पित असतील तर जाहिराती पाहणाऱ्या मुलांनाही ती खावीशी वाटतातच. असे पदार्थ खाऊन आरोग्यावर मात्र विपरित परिणाम होतो. लहान वयात वजन वाढतं. हे टाळण्यासाठी म्हणून आपण हे करत असल्याचं स्पेन सरकारचं म्हणणं आहे. आपलं लक्ष्य आपल्या देशातील मुलांचं आरोग्य सुदृढ करणं, त्यांना ओबेसीटीच्या समस्येपासून वाचवणं असल्याचं या देशाचं ध्येय आहे. आता टीव्हीवरील जाहिरातीत मुलं चाॅकलेट आइस्क्रीमसारखे जंक फूड खाताना दिसली तरी हे पदार्थ आपण खायचे की नाही, किती खायचे हे आपल्या आरोग्याचा विचार करुन आपल्यालाच ठरवायचं आहे. 

टॅग्स :अन्नआरोग्यलहान मुलंपालकत्वसोशल व्हायरल