आजकाल लहानमोठ्या सगळ्या गोष्टी लोकं ऑनलाईन मागवतात. भाजीपाला, दूध, औषधं, गोडधोड… अगदी काही मिनिटांत सगळं दारात हजर. मोबाइलवर दोन-चार क्लिक केले की काम झालं, एवढं सोपं आहे ते. (Something went wrong when a young woman ordered online at midnight, brave delivery partner became hero after incidence )वेळ वाचतो, कष्ट कमी होतात आणि सोय वाढते, म्हणूनच डिलिव्हरी अॅप्स आपल्या रोजच्या आयुष्याचा भाग झाली आहेत.
तमिळनाडूमध्ये घडलेली घटना. अशाच एका रात्रीची ही गोष्ट. रात्र बरीच झाली होती. शहर झोपलं होतं आणि सगळीकडे शांतता होती. सुमारे तीन वाजेच्या दरम्यान ब्लिंकइटसाठी डिलिव्हरी पार्टनर म्हणून काम करणाऱ्या एका मुलाला एका घरातून एक ऑर्डर प्लेस झाली. रात्री उशीरा ऑर्डर डिलिव्हर केली की पैसेही जास्त मिळतात म्हणून त्याने ऑर्डर स्विकारली, लिस्ट पाहिली आणि त्याला जरा नवलच वाटलं. त्यात तीन रॅटकिलचे पॅकिट्स हवे असल्याचे सांगितले होते. बाकी यादीत काहीच नाही.
डिलिव्हरी पार्टनरने ऑर्डर स्वीकारली. काम म्हणजे काम, असंच त्याचं रोजचं गणित. झाले असतील घरात भरपूर उंदीर शांतपणे झोपू देत नसतील म्हणून कदाचित एवढ्या रात्री उंदरांचे विष मागवले असावे असे म्हणतं त्याने दुकानातून सामान घेतलं. पत्ता गाठल्यावर एका मुलीने दार उघडलं आणि तिला पाहून मात्र तो मुलगा क्षणभर थांबला. समोर उभी असलेली महिला अस्वस्थ दिसत होती. डोळे सुजलेले, आवाज थरथरणारा. त्या रात्रीचं तिच्या दरातून आत दिसणारं वातावरण काहीतरी वेगळंच सांगत होतं.
त्याने सामान पुढे केलं पण हातातून बॅग काही सुटली नाही. क्षणभराचा तो निर्णय फार मोठा ठरु शकतो, याची जाणीव त्याला झाली आणि माणूस म्हणून त्याने आधी माणूसपण निवडलं. त्याने शांतपणे बोलायला सुरुवात केली. “सगळं ठीक आहे ना ताई?” हा साधा प्रश्न त्या क्षणी खूप मोठा ठरला. त्या महिलेला कुणीतरी ऐकतंय, समजून घेतंय, या भावनेने तिला अश्रु अनावर झाले आणि तिला रडताना पाहून त्याच्या मनातून जर - तरचे विचार निघूनच गेले. औषध नक्कीच उंदरांसाठी नव्हतं. याची त्याला खात्री पटली.
सॉरी मी ही ऑर्डर पूर्ण करु शकत नाही. जीव देणं हा पर्याय नाही, तुम्ही असा निर्णय घेऊ नका. असे म्हणून त्याने ऑर्डर कॅन्सल केली. त्यानंतर त्याने या घटनेचा व्हिडिओ तयार केला आणि त्याचा अनुभव सांगत तो व्हिडिओ पोस्टही केला. पाहता पाहता चांगलाच व्हायरल झाला. अनेक जणांनी या बातमीची नोंदही घेतली. न्यूज18, एनडीटीव्ही इंडियासारख्या विविध चॅनल्सनीही मुलाच्या कामगिरीची दखल घेतली. सोशल मिडियावर लोकांनी त्याचं कौतुक केलं. माणुसकी आजही जिवंत आहे असे म्हणत लोकांनी त्याला शाबासकी दिली.
