पाणी आणि वीज एकत्र आणणारे उपकरण म्हणजे वॉशिंग मशीन, ते वापरताना सावधगिरी बाळगली पाहिजे. सोशल मीडियावर नुकताच एक व्हिडीओ व्हायरल झाला असून, त्यात वॉशिंग मशीन वापरणाऱ्या तरुणाचा शॉक बसून झालेला मृत्यू थरकाप उडवणारा आहे.
लखनौ येथील २८ वर्षीय इरफान हा घरामध्ये वॉशिंग मशीनवर कपडे धुण्यास लावत होता. मशीनला पाणी सोडले, पावडर घातली, मशीन सुरु केले आणि सुरु केलेल्या मशीनमध्ये कपडे वर खाली करण्यासाठी हात घातला आणि पाण्यात करंट लागून तो तिथेच बेशुद्ध पडला. दवाखान्यात नेईपर्यंत त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.
अशीच एक घटना मागच्या आठवड्यात इंदोरमध्ये घडली. पाणी तापवण्यासाठी हिटर सुरु केले आणि पाणी किती तापले पाहण्यासाठी हिटरचे बटन बंद न करताच पाण्यात हात घातला, त्यामुळे त्यालाही विजेचा झटका लागला. मात्र त्याला स्वतःला तिथून सोडवता न आल्यामुळे तोही बेशुद्ध स्थितीत मृत्यूमुखी पडला.
म्हणून विद्युत उपकरणे ही सावधगिरीने हाताळली पाहिजेत. विशेषतः घरात लहान मुले असताना काळजी घेतली पाहिजे. मोठ्यांनीदेखील इस्त्री, वॉशिंग मशीन, हिटर, कुलर, गिझर इ. गोष्टी वापरताना वायर कुठे तुटली नाही ना ते तपासले पाहिजे. जिथे पाणी आणि वीज यांचा संबंध येतो, तिथे उपकरण सुरु असताना हात लावू नये. बटन बंद करून मगच कारवाई करावी, अन्यथा शॉक लागू शकतो.
वॉशिंग मशीन वापरताना मुख्य बटन सुरु केले की वीज पुरवठा सुरु होतो. वॉशिंग मशीनचे बटन जरी सुरु केलेले नसले तरी विद्युत प्रवाह सुरु झालेला असल्यामुळे पाणी आणि वीज यांचा संपर्क आलेला असतो. अशातच वॉशिंग मशीनला कोणतीही कमांड देण्याआधी जर आत हात घालायचा असेल तर मुख्य बटण बंद करणे अनिवार्य ठरते.
या व्यतिरिक्त आणखी एक खबरदारी म्हणून वॉशिंग मशीन लाकडी चौरंगावर, पाटावर ठेवावे. किंवा वॉशिंग मशीनच्या जवळ एखादी लाकडी काठी ठेवावी. त्यामुळे विजेचा झटका लागण्याची शक्यता कमी होते आणि जीव वाचतो. अन्यथा मोठी दुर्घटना घडू शकते. पहा व्हिडिओ -