सोशल मीडियावर सतत काही ना काही पोस्ट होत असते आणि त्यामुळे आपल्याला जगभरात चालू असणाऱ्या घडामोडी अगदी एका क्लिकवर कळतात. आता हेच पाहा ना, मागच्या महिन्यात इन्स्टाग्रामच्या एका अकाऊंटवर एक व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. मोठ्या प्रमाणात व्हायरल Viral Video झालेला हा व्हिडिओ पाहून तुम्हीही चकीत व्हाल. पोटापाण्यासाठी कोणाला काय करावं लागेल सांगता येत नाही, असं तुम्हाला मनोमन वाटल्याशिवाय राहणार नाही. याचं कारण म्हणजे या व्हिडिओमध्ये एक तरुण समोसा विकत असल्याचे दिसते. आता सामोसा विकून पैसे मिळवणे यात फार काही वेगळे नाही. पण हा तरुण आपल्या ग्राहकांना गरमागरम समोसे मिळावेत यासाठी काय करतो ते पाहा.
हातात उकळत्या तेलाचा स्टोव्ह घेऊनच तो एका ठिकाणहून दुसऱ्या ठिकाणी जात आहे. एका हातात समोसाचे सामान आणि दुसऱ्या हातात हा उकळत्या तेलाचा स्टोव्ह. चालत येऊन तो रस्त्यावरच एका ठिकाणी बसतो आणि तयार असलेले समोसे पटकन तळतो. विशेष म्हणजे हे गरमागरम समोसे हा तरुण अतिशय कमी किमतीत देत आहे. १० रुपयांना हे ४ छोटे गरमागरम समोसे विकत असल्याने त्याच्या समोसांची विक्रीही चांगली होत असावी असा अंदाज आहे. लखनऊमधील पुस्तक बाझार येथे तो नेहमी हे सामोसे विकण्यासाठी येत असल्याचेही सदर व्हिडिओमध्ये म्हटले आहे. तर जास्तीत जास्त लोकांनी या तरुणाला सपोर्ट करा असेही त्यामध्ये म्हणण्यात आले आहे.
युट्यूब स्वाद ऑफीशियल या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. गेल्या २५ दिवसांमध्ये ५० लाखांहून अधिक जणांनी हा व्हिडिओ पाहिला असून ५ लाखांहून अधिक लाइक्स मिळाले आहेत. इतकेच नाही तर अशाप्रकारे कष्ट करुन आपले पोट भरणाऱ्या या तरुणाचे नेटीझन्सनी भरभरुन कौतुक केले आहे. देव त्याचे भले करो, रस्त्यावर अशाप्रकारे समोसाची विक्री करत असूनही तो वापरत असलेली सर्व भांडी आणि साधने अतिशय स्वच्छ असल्याचेही काहींनी कौतुक केले आहे. हा समोसा टेस्टी दिसत असल्याचे म्हणत काहींनी हा तरुण नेमका कुठे समोसाची विक्री करतो याबाबत विचारणा केल्याचे दिसते.