भारतावर ब्रिटिश राजवटीचा काळ सुरु झाला तेव्हा भारताला सोन्याचा देश म्हणून ओळखलं जायचं. ब्रिटीश जाताना केवळ राजकीय सत्ता गेली नाही, तर देशातील अमूल्य संपत्तीही हळूहळू परदेशात जाऊ लागली. हिरे, दागिने, राजदरबारी कलाकृती आणि संस्थानिकांचा वैभवशाली वारसा आज लंडन, पॅरिस किंवा खासगी संग्रहांत दिसतो. आज ज्यांची किंमत कोट्यवधी रुपयांत मोजली जाते, अशी अनेक रत्ने मुळात भारतीय मातीची देण आहेत. जगभर चर्चेत असलेल्या मार्गोट रॉबीने परिधान केलेल्या प्रसिद्ध नेकलेसची कहाणीही याच इतिहासाशी जोडलेली आहे.
मार्गोट रॉबीने हा ऐतिहासिक नेकलेस Wuthering Heights या चित्रपटाच्या वर्ल्ड प्रीमियरदरम्यान परिधान केला होता. हा कार्यक्रम लॉस एंजेलिसमधील प्रतिष्ठित TCL Chinese Theatre येथे पार पडला. या प्रसंगी मार्गोट रॉबीने स्कियापरेली (Schiaparelli) या फॅशन हाऊसचा खास कुट्युअर गाउन घालून अगदी सुंदर दिसत होती. मात्र सगळ्यांचं लक्ष वेधलं ते तिच्या गळ्यातील हाराने. त्यासोबत असलेला हा व्हिंटेज नेकलेस, तिच्या लूकमधील खरा आकर्षणबिंदू ठरला आणि भारतीयांच्या रागाचे कारणही.
भारतातील राजघराण्यांकडे जगातील सर्वोत्तम आणि दुर्मिळ हिरे होते. नवानगर, हैदराबाद, बडोदा अशा संस्थानिकांचे खजिने हिऱ्यांनी आणि मौल्यवान दागिन्यांनी भरलेले होते. याच काळात कार्टियरसारख्या युरोपीय ज्वेलरी हाऊसेस भारतीय महाराजांसाठी खास दागिने तयार करत किंवा त्यांच्या संग्रहातील हिरे विकत घेत. या नेकलेसमधील प्रमुख हिरे एकेकाळी भारतीय राजघराण्याच्या मालकीचे होते. ब्रिटिश राजवटीत अनेक संस्थानिकांना आर्थिक अडचणी, राजकीय दबाव किंवा बदलत्या सत्ताकारणामुळे आपले मौल्यवान दागिने विकण्यास भाग पडले. अशाच परिस्थितीत हे भारतीय हिरे भारताबाहेर गेले आणि पुढे कार्टियरकडे पोहोचले.
हा नेकलेस पुढे अभिनेत्री एलिझाबेथ टेलर यांच्या संग्रहात गेला. एलिझाबेथ टेलर यांना ऐतिहासिक, राजेशाही आणि दुर्मिळ दागिन्यांची विलक्षण आवड होती. त्यातील काही दागिने तिने स्वतः खरेदी केले होते, तर काही तिच्या नवऱ्याने म्हणजेच रिचर्ड बर्टन यानी भेट म्हणून दिले होते. भारतीय मूळ असलेले हिरे, कार्टियरचे अप्रतिम डिझाइन आणि त्यामागची राजेशाही कहाणी यामुळे हा नेकलेस एलिझाबेथ टेलर यांच्या सर्वात खास दागिन्यांपैकी एक ठरला.
आज या नेकलेसची अचूक किंमत जाहीर केलेली नसली, तरी तज्ज्ञांच्या मते त्याची किंमत शेकडो कोटी रुपयांच्या घरात असू शकते. हा दागिना केवळ मौल्यवान हिऱ्यांमुळे नाही, तर त्याच्या दीर्घ आणि बहुराष्ट्रीय इतिहासामुळे अनमोल मानला जातो. हा नेकलेस सम्राट जहांगीरने पत्नी महाराणी नूर जहानला भेट म्हणून दिला होता. पुढे हा दागिना जहांगीरचा मुलगा शहाजहान याच्याकडे आला. शहाजहानने तोच नेकलेस आपल्या पत्नी मुमताज महालला दिला. मुमताज महाल यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ उभारण्यात आलेल्या भव्य स्मारकाशी हा दागिना जोडला गेला आणि त्यामुळेच या ऐतिहासिक नेकलेसला ताज महाल नेकलेस असे नाव मिळाले.
मार्गोट रॉबीने जेव्हा हा नेकलेस घातला तेव्हा तिला त्यावरुन फार ट्रोल करण्यात आले. भारतीय मालमत्ता आणि संपत्ती भारताला परत द्या अशा मागण्या सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणावर करण्यात आल्या. हा फक्त नेकलेस नाही तर तो भारताच्या इतिहासाचा भाग आहे असे नेटकरी म्हणत आहेत.
