बंगळुरूमधील अनेक शाळांना बनावट बॉम्ब धमकी ईमेल पाठवल्याप्रकरणी बंगळुरू शहर पोलिसांनी गुजरातमधील एका महिला सॉफ्टवेअर इंजिनिअरला अटक केली आहे. रेने जोशिलदा असं आरोपी महिलेचं नाव आहे. चेन्नईमध्ये आधी केलेल्या चौकशीनंतर अलीकडेच बंगळुरूमधील सहा ते सात शाळांना पाठवलेल्या बॉम्बच्या धमकी ईमेलशी तिचा संबंध असल्याचं तपासात उघड झालं. महिलेचं एका तरुणावर प्रेम होतं. त्याने नकार दिल्यानंतर बदला घेण्यासाठी तिने असं केल्याचं म्हटलं जातं.
तपासात असं दिसून आलं की, रेनेच्या कारवाया केवळ कर्नाटकपुरत्या मर्यादित नव्हत्या. पोलिसांनी शोधून काढलं आहे की, तिने चेन्नई, हैदराबाद आणि गुजरातसह देशाच्या विविध भागांमधील शाळा आणि सार्वजनिक ठिकाणी बॉम्बच्या धमक्या दिल्या होत्या. तिने विविध शहरांमधील अनेक शाळांना आणि गुजरातमधील अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमलाही ईमेल पाठवले होते.
बंगळुरू पोलिसांनी जूनमध्ये अहमदाबाद पोलिसांनी तिला अटक केल्याचं सांगितलं होतं, परंतु कर्नाटक पोलिसांच्या तपासादरम्यान कर्नाटकातील शाळांना पाठवण्यात आलेल्या बॉम्ब धमकीच्या ईमेलमागे तिचा हात असल्याचं उघड झालं. तिच्या धमकीच्या ईमेलमध्ये तिने "गुजरात विमान अपघाताप्रमाणे तुमच्या शाळा उडवून देईन" असा इशारा दिल्याचा आरोप आहे, ज्यामुळे धमक्यांची गंभीरता वाढली होती.
आयुक्त सीमांत कुमार सिंह यांनी स्थापन केलेल्या विशेष पथकाच्या नेतृत्वाखालील पोलीस तपासात आरोपींनी वापरलेल्या अत्याधुनिक पद्धती उघड झाल्या. तिने ईमेल पाठवण्यासाठी व्हर्च्युअल प्रायव्हेट नेटवर्क (व्हीपीएन) वापरलं, तिचे खरं लोकेशन आणि ओळख लपवून हे केलं. तिने अनेक खाती नोंदणी करण्यासाठी 'गेट कोड' नावाच्या एप्लिकेशनचा वापर करून व्हर्च्युअल मोबाइल नंबर मिळवले. तिच्याकडे तिच्या एक्टिव्हिटीसाठी वापरले जाणारे सहा ते सात व्हॉट्सएप अकाउंट असल्याचं आढळून आलं.
महिलेच्या प्लॅनमध्ये अनेक राज्यांमध्ये सायबर धमक्यांचा समावेश होता, तिचा त्या तरुणाला यामध्ये फसवण्याचा प्रयत्न होता. तरुणाने प्रेमाला नकार दिल्यावर ती संतापली, एकतर्फी प्रेमातून सॉफ्टवेअर इंजिनिअरने टोकाचं पाऊल उचललं. देशभरातील पोलीस ठाण्यांमध्ये रेने जोशिलदा यांच्याविरुद्ध अनेक गुन्हे दाखल आहेत. सह पोलीस आयुक्त (पश्चिम विभाग) वंशी कृष्णा आणि डीसीपी (उत्तर विभाग) नेमागौडा यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेले विशेष तपास पथक सध्या आरोपीची सखोल चौकशी करत आहे.
