Lipstick Ban In North Korea: सामान्यपणे महिलांमध्ये आपलं सौंदर्य खुलवण्यासाठी लिपस्टिक वापरणं फारच कॉमन आहे. फार पू्र्वीपासून ओठांसाठी लालीचा वापर केला जातो. अनेक देशांमध्ये लिपस्टिक किंवा मेकअपला आत्मविश्वास, स्टाइल आणि फॅशनचं प्रतीक मानतात. महिला किंवा तरूणी वेगवेगळ्या रंगांचे लिपस्टिक वापरतात. पण आपल्याला वाचून आश्चर्य वाटेल की, एक देश असाही आहे, जिथे मेकअप केवळ सुंदर दिसण्याचं साधन नाही तर विचारधारा आणि सत्तेचं नियंत्रणाशी संबंधित आहे. हा देश म्हणजे नॉर्थ कोरिया. इथे मेकअप करण्याला सरकार एक राजकीय पाउल मानतात.
नॉर्थ कोरिया हा देश नेहमीच आपल्या कठोर नियमांसाठी आणि गोपनीय व्यवस्थेसाठी चर्चेत असतो. येथील हुकूमशहा किम जोंग उन यांच्या शासनात लोकांचे कपडे, खाणं, हेअरस्टाइल इतकंच नाही तर रोजच्या सवयी सुद्धा सरकार ठरवतात. रिपोर्ट्सनुसार आता महिलांच्या मेकअपवर सुद्धा कठोर नियम लागू आहेत. जर हे नियम पाळले नाही तर त्यांना गंभीर परिणाम भोगावे लागू शकतात.
लाल आणि डार्क रंगाच्या लिपस्टिकवर बंदी, पण का?
जगभरात लाल लिपस्टिकला बोल्ड आणि स्टायलिश मानलं जातं. पण नॉर्थ कोरियामध्ये याला पाश्चिमात्य प्रभाव मानलं जातं. सरकारचं मत आहे की, गर्द रंग व्यक्तीची वेगळी प्रतिमा आणखी खुलवतं. हे समाजवादी व्यवस्थेसाठी धोक्याचं मानलं जातं. त्यामुळे लाल किंवा डार्क रंगाची लिपस्टिक लावणं इथे गुन्हा आहे. नॉर्थ कोरियामध्ये महिलांना केवळ हलकं आणि सामान्य मेकअप करण्याची परवानगी आहे. हलक्या गुलाबी रंगाचं किंवा सॉफ्ट रंगाचं लिपस्टिक इथे मान्य आहे. बोल्ड मेकअप, डार्क लिपस्टिक किंवा परदेशी ब्यूटी प्रॉडक्टवर इथे बंदी आहे. बोल्ड मेकअप आणि डार्क लिपस्टिकला इथे देशाच्या विचारधारेच्या विरोधात मानलं जातं.
कोण लक्ष ठेवतं
या नियमांची अंमलबजाणी करण्यासाठी खास लोकांची नेमणूक करण्यात येते. त्यांना फॅशन पोलीस म्हटलं जातं. हे लोक रस्त्यांवर, कॉलेजमध्ये आणि सार्वजनिक ठिकाणांवर महिलांवर लक्ष ठेवतात. महिलांचे कपडे, मेकअप आणि लूकवर लक्ष ठेवलं जातं. जर एखादी महिला लाल किंवा डार्क लिपस्टिक लावून दिसली तर तिला दंड भरावा लागतो. पुन्हा पुन्हा नियम तोडल्यास तुरूंगातही टाकलं जाऊ शकतं.
अजून कशावर बंदी?
नॉर्थ कोरियामध्ये केवळ लिपस्टिक किंवा बोल्ड मेकअपवरच नाही तर येथील लोकांना सरकारने मंजूर केलेल्याच २८ ते ३० हेअरस्टाइलपैकीच एक निवडायची असते. तसेच इथे परदेशी आणि सेकंड हॅंड कपडे वापरण्यावरही बंदी आहे. जास्त फॅशनेबल कपडे घातल्याने अॅंटी-सोशलिस्टचा आरोप लावला जाऊ शकतो. शिक्षाही मिळू शकते.
