Join us
Daily Top 2Weekly Top 5

दुर्मिळ आजारामुळे १२ किलोंनी वाढला तरुणीच्या स्तनांचा आकार, असह्य वेदना होणारा भयंकर आजार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2025 16:29 IST

Thaynara Marcondes : थायनारा मार्कोंडेस ही ब्राझीलमधील २२ वर्षीय तरुणी आहे. काही महिन्यांत तिच्या स्तनांचा आकार वाढला होता.

जगभरात अनेक दुर्मिळ आजार आहेत, ज्याबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे. असाच एक आजार ब्राझीलमधील एका मुलीला झाला ज्यामध्ये तिच्या स्तनांचा आकार हा अचानक वाढू लागलेा. धक्कादायक बाब म्हणजे काही महिन्यांत स्तनांचा आकार १२ किलोपर्यंत वाढला. यानंतर तरुणीला सर्जरीद्वारे आकार कमी करावा लागला. जगात फक्त ३०० लोकांना हा आजार आहे.

थायनारा मार्कोंडेस ही ब्राझीलमधील २२ वर्षीय तरुणी आहे. काही महिन्यांत तिच्या स्तनांचा आकार वाढला होता, ज्यामुळे तिच्यावर १० तासांची सर्जरी करण्यात आली. या सर्जरीमध्ये तिच्या स्तनातून २२ पौंड (सुमारे १० किलो) अतिरिक्त टिशू काढून टाकण्यात आले. सोशल मीडियावर हा अनुभव शेअर करताना थायनारा म्हणाली की, "सुरुवातीला मी मीडियम साईजचे टी-शर्ट घालायची, पण काही महिन्यांत स्तनांचं वजन दरमहा ७५० ग्रॅम या वेगाने वाढू लागलं. हळूहळू जुने कपडे घालणं बंद केलं आणि शेवटी मला खास तयार केलेले कपडे वापरावे लागले."

"मला ब्रा घालता येत नव्हती. एके दिवशी मी ८ टी-शर्ट वापरून पाहिले पण एकही होत नव्हतं. मी घाबरले." सुरुवातीला थायनारा याकडे दुर्लक्ष करत होती, पण जेव्हा लोक रस्त्यावरून जाताना तिच्याकडे पाहू लागले आणि बोटे दाखवू लागले तेव्हा ती काळजीत पडली. "एकदा मी सुपरमार्केटमध्ये गेले आणि काही लोकांना वाटलं की मी काही वस्तू चोरल्या आणि लपवून ठेवल्या. तेव्हा मला समजलं की हे आता सामान्य राहिलेले नाही" असं तिने सीएनएन ब्राझीलला सांगितले. 

वाढत्या स्तनांच्या आकाराचा थायनाराच्या दैनंदिन जीवनावर वाईट परिणाम झाला, कंबर, मान आणि खांद्यामध्ये असह्य वेदना, शूज घालणं, धावणं आणि जिमला जाणे हे सर्व थांबलं. कधीकधी वेदना इतक्या तीव्र होत्या की तिला व्हीलचेअरची आवश्यकता होती. डॉक्टरांना सुरुवातीला कॅन्सरची शंका होती, परंतु नंतर थायनाराला गिगान्टोमास्टिया नावाचा एक दुर्मिळ आजार असल्याचं निदान झाले, ज्यामध्ये स्तनांची वाढ जास्त आणि अनियंत्रित होते. जगात आतापर्यंत याची ३०० प्रकरणं नोंदवली गेली आहेत. 

हार्मोनल असंतुलन, लठ्ठपणा, गर्भधारणा, औषधं किंवा ऑटोइम्यून आजार यासारख्या अनेक कारणांमुळे ही स्थिती उद्भवू शकते. थायनाराची केस खूप गुंतागुंतीची होती. स्तनांचं वजन तब्बल २६ पौंड (१२ किलो) पर्यंत पोहोचलं होतं. २५ ऑक्टोबर २०२३ रोजी तिची सर्जरी झाली, ज्यामध्ये एकूण २२ पौंड टिशू काढून टाकण्यात आले. यासाठी सहा लाखांचा खर्च झाला.  आता जेव्हा थायनारा स्वतःला आरशात पाहते तेव्हा तिचा विश्वास बसत नाही.

टॅग्स :सोशल व्हायरलआरोग्य