हनिमूनला गेल्यावर बेपत्ता झालेल्या कपलबाबत आता धक्कादायक खुलासा करण्यात आला आहे. राजा रघुवंशीच्या हत्येच्या आरोपाखाली पत्नी सोनमला अटक करण्यात आली आहे. सोनमने बॉयफ्रेंडच्या मदतीने पतीचा काटा काढला आहे. सध्या मेघालय पोलीस आरोपींची कसून चौकशी करत आहेत. सोनम आणि राजा रघुवंशी हनिमूनसाठी मेघालयातील शिलाँग येथे गेले होते, येथे राजाची हत्या करण्यात आली. या प्रकरणाबद्दल सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे, मेरठच्या ब्लू ड्रम घटनेप्रमाणेच आता याबाबतही मीम्स व्हायरल होत आहेत.
लग्नानंतर हनिमूनला जाण्याचं स्वप्न पाहणाऱ्या प्रत्येक कपल आधीपासूनच कुठे जायचं याची तयारी करत असतं. त्यांना त्यांचे खास क्षण अत्यंत सुंदर आणि निसर्गरम्य ठिकाणी घालवायचे असतात. पण गेल्या काही महिन्यांत लग्नानंतर हत्या केल्याच्या ज्या काही घटना सातत्याने समोर येत आहेत त्यावरून लग्न करण्यासाठी उत्सुक असलेल्या मंडळींमध्ये भीतीचं वातावरण पाहायला मिळत आहे.
इंदूरच्या धक्कादायक घटनेनंतर लोक आता मुद्दाम हनिमूनबद्दल इतरांना खूप भीती दाखवत आहेत. मीम मेकर्स देखील याबद्दल बरेच मीम्स शेअर करत आहेत, ज्यामध्ये असं म्हटलं जात आहे की, हनिमूनवरुन जिवंत परतणं ही मोठी कामगिरी आहे. या प्रकरणासंदर्भात चित्रपटांच्या अनेक व्हिडीओ क्लिप शेअर केल्या जात आहेत, अजय देवगणच्या चित्रपटाची एक क्लिप सर्वाधिक व्हायरल होत आहे.
ज्यामध्ये अजय एन्ट्री करताच लोक त्याला नमस्कार करू लागतात. "जास्त काही नाही... हनिमूनवरुन जिवंत परत आला..." असं कॅप्शनमध्ये म्हटलं आहे. तसेच अमिताभ बच्चन आणि हॉलिवूड चित्रपटांच्या क्लिप्स देखील मीम्स बनवून शेअर केल्या जात आहेत. ज्यामध्ये हिरो शस्त्र घेऊन तयार होताना दाखवला जात आहे. काही लोक हनिमूनबाबत अनेक प्रकारच्या ऑफर देखील देत आहेत, ज्यामध्ये हनिमून सुरक्षा रक्षकाचा पर्याय देखील दिला जात आहे. सोशल मीडियावर अशा पोस्टचा महापूर आला आहे, जसं लोक ब्लू ड्रम शेअर करून भीती दाखवत होते, त्याचप्रमाणे आता हनिमून ट्रेंड होत आहे.