सोशल मीडियावर एका स्विगी डिलिव्हरी बॉयचा एक फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो त्याच्या लहान मुलीला त्याच्या बाईकवर घेऊन जाताना दिसत आहे. लिंक्डइनवर हा फोटो शेअर करण्यात आला आहे. या फोटोमागचं सत्य समजल्यावर लोक भावुक झाले आहेत आणि डिलिव्हरी बॉयच्या संघर्षाला सलाम करत आहेत.
गुरुग्राममधील एका कंपनीचे सीईओ मयंक अग्रवाल यांनी त्यांच्या पोस्टमध्ये ही घटना शेअर केली आहे. मयंक यांनी सांगितलं की, एक दिवस त्यांनी जेवण ऑर्डर केलं होतं आणि डिलिव्हरी बॉयला फोन करून दुसऱ्या मजल्यावर येण्यास सांगितलं. पण कॉलवर त्यांना एका लहान मुलीचा आवाज ऐकू आला. त्यांनी विचारलं तेव्हा डिलिव्हरी बॉयने त्यांना त्याची मुलगी त्याच्यासोबत असल्याचं सांगितलं. हे ऐकून मयंक स्वतः खाली आले.
मयंक यांनी खाली येताच पाहिलं की अवघ्या दोन वर्षांची एक मुलगी बाईकवर शांतपणे बसली होती. डिलिव्हरी बॉयने पंकज असं त्याचं नाव सांगितलं. त्याने सांगितलं की मुलीच्या जन्मावेळी त्याच्या पत्नीचं निधन झालं होतं. घरी मुलांची काळजी घेण्यासाठी कोणी नव्हतं, म्हणून तो त्याच्या मुलीला सोबत घेऊन जातो. मोठा मुलगा आहे तो क्लासला गेला असल्याने पंकज मुलीची अशी काळजी घेतो.
डिलिव्हरी बॉयच्या चेहऱ्यावर कोणतीही तक्रार नव्हती, फक्त एक स्मितहास्य होतं. काही ग्राहकांनी त्याला जर तुला हे मॅनेज करता येत नसेल तर घरी बस असा सल्ला दिला. यावर मयंक यांनी लोकांना समजून घेण्याचं आवाहन केलं. ही त्याची इच्छा नाही तर त्याचा नाईलाज आहे. मुलांच्या सुरक्षेबद्दल बोलण्यापूर्वी, त्याच्याकडे दुसरा पर्याय नाही हे समजून घ्या असं म्हटलं आहे.
या पोस्टनंतर सोशल मीडियावर अनेकांनी पंकजला सपोर्ट केला आहे. अनेक युजर्सनी पंकजचं भरभरून कौतुक केलं आणि समाजाकडून अधिक सहानुभूती आणि पाठिंबा मिळावा अशी मागणी केली. स्विगीच्या ऑपरेशन्स टीमचा भाग असल्याचा दावा करणाऱ्या एका लिंक्डइन युजरने मदतीसाठी पंकजशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केल्याचं म्हटलं जात आहे.