घरात स्वयंपाक करताना रोजच्या वापराची भांडी स्वच्छ आणि व्यवस्थित ठेवणे गरजेचे असते. तवा, पॅन आणि कढई यांचा वापर रोजचाच असतो. पण अनेकदा आपण पाहतो की भाजी, डोसा किंवा इतर कोणताही पदार्थ करताना तो भांड्याला चिकटतो, तेलकट होतो आणि भांड्याची चमकही कमी होते. खरं तर हे सगळं भांड्याची योग्य काळजी न घेतल्यामुळे होतं. जर थोडं लक्ष दिलं, तर ही भांडी अनेक वर्षे टिकतात आणि पदार्थही नेहमीच नीट शिजतात.
नवीन लोखंडी तवा किंवा कढई घेतली की थेट वापरण्याऐवजी ती प्रथम सीझनिंग करणे गरजेचे असते. म्हणजे ती व्यवस्थित धुवून पुसून त्यावर थोडं तेल लावून गरम करायचं. या प्रक्रियेमुळे तव्यावर एक नैसर्गिक थर तयार होतो, ज्यामुळे पदार्थ चिकटत नाहीत. नॉन-स्टिक पॅनसाठी मात्र हे आवश्यक नसते, पण त्याचे कोटिंग टिकवण्यासाठी एक नियम असतो तो म्हणजे तवा सतत गरम करायचा नाही. वापरताना मध्येच गॅस थोडावेळ बंद करायचा. स्वयंपाक करताना मध्यम आचेवर गरम करणेही महत्त्वाचं आहे. थंड तव्यावर किंवा खूपच तापलेल्या पॅनवर अन्न टाकल्यास ते पटकन चिकटते. म्हणून आधी भांडे योग्य प्रमाणात तापवून मगच तेल किंवा मिश्रण घालायचे म्हणजे चिकटत नाही.
भांडी धुताना अनेक जण अयोग्य डिशवॉश पावडर वापरतात, पण त्यामुळे नॉन-स्टिक पॅनचे कोटींग जाऊ शकते आणि लोखंडी तव्याला गंज लागू शकतो. अशा वेळी कोमट पाण्यात सौम्य साबण मिसळून हलक्या हाताने धुणे योग्य असते. धुतल्यानंतर लोखंडी भांडे पूर्ण कोरडे करुन त्यावर थोडंसं तेल लावून ठेवावं, त्यामुळे ते गंजत नाही आणि कितीही वापरले तरी खराब होत नाही.
नॉन-स्टिक भांड्यात स्टीलचा किंवा लोखंडी चमचा वापरु नये, कारण त्याने पॅनचं कोटिंग निघतं. त्याऐवजी लाकडी किंवा सिलिकॉन स्पॅटुला वापरावा. आणि जर कधी पदार्थ जळला असेल, तर थोडं पाणी आणि बेकिंग सोडा टाकून काही मिनिटं ठेवा, चिकटलेले थर सहज निघून जाईल.
प्रत्येक भांड्याची काळजी वेगळ्या पद्धतीने घ्यायची असते. कास्ट आयर्न तवा नियमित तेल लावून ठेवावा, नॉन-स्टिक पॅन ओव्हरहीट करु नये आणि स्टेनलेस स्टील कढई प्रत्येक वापरानंतर लगेच कोमट पाण्याने धुवावी.



