Viral Post : अमेरिकेत जवळपास एक दशक घालवल्यानंतर भारतात परतलेल्या एका भारतीयाने सोशल मीडियावर मोठे लक्ष वेधून घेतले आहे. भारतात परतल्यानंतर आपण 'पूर्णपणे बरे झालो' असल्याचा दावा करत या NRI ने अमेरिकेच्या आरोग्य व्यवस्थेवर तीव्र टीका केली आहे. अमेरिकेतील हेल्थकेअर सिस्टीम ही रुग्णांच्या काळजीपेक्षा नफ्यावर जास्त लक्ष देते आणि लोकांना केवळ 'पैसे कमावण्याची साधने' म्हणून पाहते, असं त्यानं म्हटलं आहे.
रेडिटवरील एका पोस्टमध्ये त्या NRI ने लिहिलं, 'भारताने मला बरे केले. मी अमेरिकेत 10 वर्षे घालवली. शिक्षण आणि करिअरसाठी ते ठिकाण चांगलं होतं, पण मला माझं घर आणि कुटुंब खूप आठवत होतं.'
स्टाफ डेटा सायंटिस्ट म्हणून काम करत असताना, 2017 मध्ये त्या NRI ला आरोग्याच्या समस्या जाणवू लागल्या. याच काळात अमेरिकेच्या आरोग्य व्यवस्थेतील त्रुटी आणि चिंताजनक बाबी त्याच्या लक्षात आल्या.
अमेरिकेच्या हेल्थकेअर सिस्टीमवर टीका
NRI च्या मते, अमेरिकेची आरोग्य व्यवस्था फारच किचकट गोष्टींनी भरलेली आहे, ज्यामुळे साध्या चिंता किंवा मानसिक समस्याही अधिक गुंतागुंतीच्या आणि धोकादायक वाटू लागतात. 2018 मध्ये त्याला ‘स्किझोअॅफेक्टिव्ह डिसऑर्डर’ असल्याचे निदान करण्यात आले होते. तरीही त्याने आपल्या करिअरमध्ये प्रगती सुरूच ठेवली. मात्र, अमेरिकन डॉक्टरांनी दिलेल्या निदानाच्या रिपोर्टबाबत त्याच्या मनात शंका निर्माण झाली.
स्किझोफ्रेनिया निदान आणि भारतातील उपचार
आपल्या मानसिक आजाराबद्दल बोलताना तो म्हणतो, “जर मला अजूनही स्किझोफ्रेनिया असता, तर मी शिक्षण पूर्ण करून नोकरी करूच शकलो नसतो. स्किझोफ्रेनियाचे रुग्ण खूप तीव्र आणि वास्तव वाटणारे भ्रम व भास अनुभवतात.”
यानंतर त्याने दुसरे मत घेण्याचा निर्णय घेतला आणि बंगळुरू येथील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ अँड न्यूरोसायन्सेस या भारतातील नामांकित मानसिक आरोग्य संस्थेत एका वरिष्ठ मानसोपचारतज्ज्ञांचा सल्ला घेतला. तो सांगतो, “डॉक्टरांनी मला सांगितले की माझा स्किझोअॅफेक्टिव्ह डिसऑर्डर काही काळापासून रेमिशनमध्ये आहे. सध्या मला मूड डिसऑर्डर आणि क्वचित येणारी चिंताआहे.”
भारतीय आरोग्य व्यवस्थेचे कौतुक
गेल्या वर्षी भारतात परतलेल्या त्या NRI ने भारतीय आरोग्य व्यवस्थेबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. तो म्हणाला, “मी बरा झालो आहे. माझ्या आयुष्यात दुसरे काहीही बदललेले नाही. फरक इतकाच आहे की इथे अशी हेल्थकेअर सिस्टीम आहे जिथे डॉक्टर खरोखरच रुग्णांची काळजी घेतात, त्यांना नफ्याचा स्रोत मानत नाहीत.”
रेडिटवर भारताचे कौतुक
या पोस्टनंतर अनेक रेडिट वापरकर्त्यांनी भारताच्या आरोग्य व्यवस्थेचे कौतुक केले. एका युजरने लिहिले, “भारतीय हेल्थकेअर सिस्टीमला कमी लेखले जाते.” दुसऱ्याने म्हटले, “योग्य ठिकाणी उपचार घेतले तर ही प्रणाली अतिशय उत्तम आणि परवडणारी आहे.” तिसऱ्या युजरने प्रतिक्रिया दिली, “होय, भारताकडे जगातील सर्वोत्तम आरोग्य व्यवस्थांपैकी एक आहे. मी तिचे नेहमीच कौतुक करतो.”
ही घटना केवळ एका व्यक्तीचा अनुभव नसून, जगभरातील आरोग्य व्यवस्थांमधील फरक आणि मानवी दृष्टिकोनावर नव्याने विचार करण्यास भाग पाडणारी आहे.
