Join us  

'मेरा पती बहोत गंदा है'- नवऱ्याला शिव्या घालत तिनं केलं पॅराग्लायडिंग कारण.. पाहा व्हिडिओ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2022 11:32 AM

पॅराग्लायडिंगला घाबरलेल्या तरुणीचा व्हिडिओ पाहून तुम्हीही पोट धरुन हसाल...

ठळक मुद्देपॅराग्लायडींग करायला लावणाऱ्या नवऱ्याला शिव्या देताना तरुणीचा व्हिडिओ व्हायरल खरंच भितीने गाळण उडाली की नाटक करते, नेटीझन्सनी उपस्थित केला सवाल

पॅराग्लायडिंग करणं हे काही येड्यागबाळ्याचं काम नाही, हवेत उंच गेल्यावर वरुन अगदी मुंगीसारखे दिसणारे लोक आणि इतक्या फूटांवर आपण एकटे किंवा फारतर दोघं असल्याने वाटणारी भिती आपण शब्दांत मांडू शकत नाही. ज्यांनी पॅराग्लायडिंग केले आहे, तेच यामागचा थरार जाणू शकतात. अॅडव्हेंचर म्हणून याकडे पाहिले जात असले तरी अनेकांना पॅराग्लायडिंग करण्यात मजाही येते. मात्र पॅराग्लायडिंग करताना खूप घाबरलेल्या एका तरुणीचा व्हिडिओ नुकताच सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यामध्ये ही तरुणी पॅराग्लायडिंग करताना अक्षरश: रडताना दिसते. इतकच नाही तर यापुढे जात ती आपल्या नवऱ्याला खूप शिव्याही देताना दिसत आहे. त्यामुळे कदाचित नवऱ्याने जबरदस्ती केल्याने ती पॅराग्लायडिंग करत असल्याचे वाटते. तिच्या या सगळया बोलण्याचा व्हिडिओ तिने स्वत: आणि तिच्यासोबतच्या इन्स्ट्रक्टरने मोबाइलवर सेल्फीस्टीकच्या माध्यमाने शूट केला आहे. पण सध्या ट्विटरवर हा व्हिडिओ खूप व्हायरल झाला असून नेटीझन्स त्यावर एकाहून एक जोक्स करताना दिसत आहेत. 

पॅराग्लायडिंग करताना या तरुणीच्या सोबत एक इन्स्ट्रक्टर असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. जसे ती वर जायला लागते तशी ती आपल्या नवऱ्याला खूप शिव्या देते. ब्रिजेश मी तुला मारुन टाकणार आहे असंही ती भितीपोटी म्हणते, नवऱ्याला शिव्या देताना ती मेरा पती बहोत गंदा है असंही म्हणते. तिच्या या वाक्यावर नेटीझन्सना हसू आवरत नाही. पुढे देवा माझं लग्न का लावून दिलंस असंही बोलताना दिसते. तसंच ती जशी वर जाते तशी ती इन्स्ट्रक्टरला सांगते, की मी खूप घाबरले आहे त्यामुळे मी अजिबात खाली पाहू शकत नाही. तेव्हा इन्स्ट्रक्टर तिला सांगतो, तुम्हाला खाली पाहायची गरज नाही. सुरुवातीला ती डोळ्यावर हात ठेऊन मला नाही जायचे असेही ओरडताना दिसते. 

मला खाली उतरवा अशी विनवणी ती इन्स्ट्रक्टरला करतीये, मात्र तो तिला सातत्याने धीर देण्याचा प्रयत्न करताना दिसतो. आकाशात असताना एका ठिकाणी थांबवून तो तरुणीला खालचे नयनरम्य दृश्य पाहायला सांगतो. पण ती काही केल्या ऐकत नसल्याने शेवटी काहीसा वैतागून तो तिला खाली उतरवतो. तिचा हा घाबरलेला व्हिडिओ पाहून आपल्यालाही कदाचित हसू आवरणार नाही. मात्र काही जण ही तरुणी घाबरल्याचे नाटक करत असल्याचेही व्हिडिओच्या खाली कमेंट करताना म्हणतात. चार दिवसांत हा व्हिडिओ एक लाखांहून अधिक जणांनी पाहिला असून अनेकांनी तो रीट्विट केला आहे. पॅराग्लायडिंग आणि पती पूजा एकाच वेळी असे म्हणत दिल तो बच्चा है जी या ट्विटर अकाऊंटवरुन हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे.  व्हिडिओ शूटींग सुरू असताना इन्स्ट्रक्टर तिला हा व्हिडिओ व्हायरल होईल असे म्हणतोही. त्याचे ते शब्द खरे ठरतात आणि तिचा ओरडण्याचा हा व्हिडिओ व्हायरल होतो. 

टॅग्स :सोशल व्हायरलसोशल मीडियाट्विटर