Join us

लेकीची माया! कष्ट करणाऱ्या आईचा त्रास कमी करण्यासाठी लेकीची अशीही धडपड- पाहा इमोशनल व्हिडिओ 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2022 14:59 IST

Viral Video of Daughter's Love: लेकीची माया असतेच वेगळी... कधी ती लेक बनून स्वत:चे लाड करून घेते तर कधी आई बनून माय- बापाचे कष्ट कमी करण्याचा प्रयत्न करते.. या व्हिडिओतली ही चिमुरडीही अगदी तशीच..

ठळक मुद्देहा व्हिडिओ नेमका कोणत्या गावातला, याची काहीही माहिती नाही. पण व्हिडिओतल्या ७- ८ वर्षांच्या मुलीनं मात्र नेटकऱ्यांचं मन जिंकून घेतलं आहे. 

जन्मदात्या आई- वडिलांच्या मायेची सर कशालाच नाही, हे अगदी शंभर टक्के मान्य. पण तसंच लेकीची मायाही (Daughter's Love) जगावेगळी असते हे देखील तितकंच खरं. मुलापेक्षा मुलींच्या हृदयात माय- बापासाठी असलेला मायेचा पाझर जरा जास्तच असतो, असं म्हटलं तरी ते वावगं होणार नाही. आई- वडिलांचं वय वाढत जातं, तशा मुलीही परिपक्व होत जातात आणि प्रसंगी आईचीची आई होतात. असंच काहीसं करून दाखवलं आहे, या चिमुरडीने. हा व्हिडिओ (viral video) नेमका कोणत्या गावातला, याची काहीही माहिती नाही. पण व्हिडिओतल्या ७- ८ वर्षांच्या मुलीनं मात्र नेटकऱ्यांचं मन जिंकून घेतलं आहे. 

 

bhutni_ke_memes या इन्स्टाग्राम पेजवर शेअर (instagram share) झालेला हा व्हिडिओ आतापर्यंत हजारो लोकांनी बघितला आहे. ''Her understanding and love for her mother melted my heart'' अशी कॅप्शन या व्हिडिओला देण्यात आली आहे. अवघ्या काही सेकंदांचा हा व्हिडिओ आहे. पण बघितल्यावर नक्कीच लेकीचे कौतूक वाटत रहावे, असा आहे. या व्हिडिओमध्ये जी आई आणि मुलगी दिसते आहे ते अगदी गरीब, कष्टकरी वर्गातले आहेत.

 

आई भाजीवाली आहे आणि कोणत्यातरी मार्केटमध्ये बसून भाज्या विकते आहे. वर कडाक्याचं ऊन आहे. आईला खूप घाम आला आहे. तरी पोटासाठी त्या भर ऊन्हात काम करणं गरजेचंच आहे. आईच्या मागे तिची ७- ८ वर्षांची लेक उभी आहे. उन्हामुळे खरंतर ती पण घामेजून गेली आहे. पण तरीही आईचे कष्ट कमी करण्यासाठी ती धडपडते आहे. चेहऱ्यावर एक गोड हसू आहे. या मुलीच्या हातात एक रिकामा प्लास्टिकचा ट्रे दिसतो आहे. या ट्रेच्या मदतीने ती आईला मागच्या बाजूने वारा घालते आहे आणि आईला होणारी गरमी कमी करण्याचा प्रयत्न करते आहे. कामाच्या नादात व्यस्त असणाऱ्या आईला चिमुरडी आपल्यासाठी काय करते आहे, हे कदाचित लक्षातही आलेले नाही. पण चिमुरडी मात्र तिच्या परीने आईचा त्रास कमी करण्याचा मनापासून प्रयत्न करत आहे. हा व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांना या मुलीचे भारीच कौतूक वाटत आहे. 

 

टॅग्स :सोशल व्हायरलइन्स्टाग्रामसोशल मीडिया