घर म्हणजे जगातील सगळ्या सुरक्षित जागा असते. जिथे प्रेम, जिव्हाळा आणि काळजी मिळते ती जागा म्हणजे घर. आणि त्याच घराचे घरपण म्हणजे आई. घर सांभाळणारी आणि मुलांना वाढवणारी. पण जेव्हा आईसारखी जवळची व्यक्तीच रागाच्या भरात हिंसेचा मार्ग स्वीकारते तेव्हा त्या जागेला आपण घर म्हणून शकतो का? जेव्हा पालक चुकतात तेव्हा मुलांच्या मनावर खोल जखम होते. (Mother beats her daughters up because they ordered food from outside, daughters call helpline - see what really happened)ही घटना फक्त कौटुंबिक वादापुरती मर्यादित राहत नाही, तर ती समाजासाठी इशारा आहे की पालकांची वागणूक आणि वाढते घटस्फोटाचे प्रमाण मुलाांच्या मानसिकतेसाठी किती धोक्याचे आहे. व्यसन घराचे सौख्य हिरावून घेऊ शकते. अशा वेळी मुलांच्या सुरक्षेला धक्का पोहोचतो आणि त्यांचा विश्वास डळमळीत होतो. हे विधान सिद्ध करणारा प्रकार घडला. जो ऐकून सगळ्यांनाच धक्का बसला.
अहमदाबादमध्ये घडलेली एक घटना समाजाला हादरवून टाकणारी ठरली. दोन किशोरवयीन मुलींनी मदतीसाठी हेल्पलाइनवर फोन केला, त्यांच्या तक्रारीने सगळ्यांनाच चकीत केले. मुलींनी जन्मदात्या आईविरुद्ध तक्रार नोंदवण्यासाठी मदत मागितली होती. आईला राग आला कारण मुलींनी घरात ऑनलाइन जेवण मागवलं होतं. मुलींनी सांगितल्यानुसार, नेहमी स्वयंपाक त्या दोघीच करायच्या. आई बरेचदा घराबाहेरच असते. त्या दिवशीही त्यांची आई मध्यरात्रीपर्यंत घरी आली नाही. घरी आल्यावर तिला कळले की मुलींनी बाहेरुन जेवण मागवले होते. ती आधीच दारुच्या नशेत होती. त्यातून वाद वाढला आणि संतापाच्या भरात आईने हात उचलला. मुलींना बेदम मारहाण केली. मुलींनी धैर्य दाखवत ताबडतोब महिला हेल्पलाइन 'अभयम्' ला कॉल केला आणि मदतीची मागणी केली. पोलिस आणि समाजसेवक लगेच घटनास्थळी पोहचले आणि मुलींना आधार दिला.
या घटनेवर कायदेशीर कारवाई होईलच, पण त्यासोबत समाजानेही संवेदनशीलता दाखवायला हवी. अशा प्रसंगी फक्त दोष देणे नको तर कुटुंबाला मार्गदर्शन, समुपदेशन आणि मदत मिळणेही तितकेच महत्त्वाचे आहे. बालहक्क आणि महिला हक्क यांचे रक्षण करण्याची जबाबदारी आपल्या सर्वांचीच आहे. मुलांना सुरक्षित वातावरण मिळावे यासाठी जागरुकता वाढायला हवी. दोघी मुली किशोरवयीन आहेत तरी त्यांना एक भाऊही आहे. त्यांचा भाऊ वडिलांसोबत राहतो. आईच्या व्यसनांमुळेच आई-वडिलांचा घटस्फोट झाल्याचे मुलींनी सांगितले. तसेच आता त्या मुली त्यांच्या आजी-आजोबांसोबत राहत आहेत.