Join us

लग्नाच्या लेहेंग्यावर मायेची खिडकी आणि खिडकीत कुटुंबाचे मेसेज! नवरीचा अनोखा घागरा, मायेच्या शिदोरीची सांगतो गोष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2022 14:42 IST

Lehenga With Window: लग्नाचा लेहेंगा आणि त्यावर खिडकी!! आहे की नाही वेगळीच गोष्ट.. पण नेमकं हे प्रकरण तरी काय आणि का व्हायरल होत आहे या नवरीचा व्हिडिओ? बघा त्याचीच ही गंमत...

ठळक मुद्देही छोटीशी खिडकी इतक्या नजाकतीने घडविण्यात आली आहे की तिच्या लेहेंग्याकडे पाहून यात अशीही काही अनोखी गंमत असेल, असं वाटतंही नाही.

लग्न म्हटलं की हौशीला खरोखरंच काही मोल नसतं. आयुष्यात एकदाच होणारी ही गोष्ट. त्यामुळे ते थाटामाटात आणि अगदी कोणतीच कसर न ठेवता करायचं असं अनेक मुला- मुलींचं आणि त्यांच्या आई- वडिलांचंही स्वप्न असतंच. त्यातही जर नवरी (bride) असेल तर ती तर तिचं लग्न (wedding) आणि लग्नासंबंधी सगळ्याच लहान- मोठ्या गोष्टींबाबत अगदी स्वप्नाळू असते. यात सगळ्यात जास्त जिव्हाळ्याचा विषय असतो तो लग्नाच्या वेळी नेसायची साडी किंवा मग लेहेंगा. या एका कपड्यासोबत आयुष्यभराच्या आठवणी मग जोडल्या जातात. म्हणूनच तर या एका नवरीने तिचा लेहेंगा (lehenga) खूप वेगळ्या पद्धतीने डिझाईन करून घेतला आहे..

 

simranbalarjain या इन्स्टाग्रामच्या पेजवरून शेअर करण्यात आलेला हा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल झाला आहे. सिमरन बलार जैन असं या नवरीचं नाव असून तिने तिचा हा लेहेंगा बँगलोर येथील मकाना स्टुडियोतून डिझाईन करून घेतला आहे. आजवर कधीही पाहिली नसेल अशी अनोखी गोष्ट तिच्या या घागऱ्यामध्ये दडलेली आहे. तिच्या या घागऱ्याच्या बॉर्डरला चौकोनी पॅच आहेत. ड्रेस डिझायनरला सांगून सिमरनने एका पॅचला मधोमध कापले. त्यामुळे एखाद्या खिडकीप्रमाणे तो पॅच आता दिसत आहे. 

 

लेहेंग्याला ही खिडकी का करून घेतली असावी, असा प्रश्न अगदी साहजिक आहे. त्यामागचं कारणही तेवढंच इमोशनल आहे. या पॅचमध्ये तिने एक छानशी जागा तयार करून घेतली आहे. आणि या जागेत तिच्या माहेरच्या लोकांनी तिच्यासाठी छानसे संदेश लिहिले आहेत. ही छोटीशी खिडकी इतक्या नजाकतीने घडविण्यात आली आहे की तिच्या लेहेंग्याकडे पाहून यात अशीही काही अनोखी गंमत असेल, असं वाटतंही नाही. आता या लेहेंग्यासोबत माहेरच्या मंडळींचं मेसेजरुपी प्रेम तिच्याकडे आयुष्यभर जपलं जाणार. म्हणूनच तर सध्या सोशल मिडियावर गाजतो आहे तिचा खिडकीवाला घागरा... 

 

टॅग्स :सोशल व्हायरललग्नइन्स्टाग्राम