कधीकधी एक छोटीशी गोष्ट संपूर्ण आयुष्याची दिशाच बदलून टाकते. "जर त्याने त्याचा पाय गमावला, तर तू त्याच्यावर तितकंच प्रेम करशील का?" हाच प्रश्न एका मुलीच्या आयुष्यात सर्वात मोठा टर्निंग पॉईंट ठरला. या प्रश्नाने केवळ तिच्या प्रेमाची परीक्षाच घेतली नाही, तर ती आपल्या नात्यासाठी किती खंबीर आहे, हेही सिद्ध करून दाखवलं.
अश्विन आणि चक्कू एकाच शाळेत शिकत होते. हळूहळू त्यांच्या मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं. अश्विनने तिला सांगितलं की, जेव्हा त्याने तिला पहिल्यांदा डान्स करताना पाहिलं, तेव्हाच तो तिच्या प्रेमात पडला होता. ही एका निरागस आणि खऱ्या प्रेमाची सुरुवात होती, जी भविष्यात अनेक संकटांचा सामना करणार होती. जेव्हा त्यांच्या नात्याबद्दल घरच्यांना समजलं, तेव्हा त्यांनी याला जोरदार विरोध केला. मुलीचा फोनही काढून घेण्यात आला जेणेकरून त्या दोघांचा संपर्क तुटावा. मात्र अश्विन दर आठवड्याला तिला भेटण्यासाठी लांबचा प्रवास करून यायचा. हेच सिद्ध करत होतं की खरं प्रेम कोणत्याही अडथळ्याला जुमानत नाही.
एका घटनेने सगळंच बदललं. एका मद्यधुंद चालकाने अश्विनच्या बाईकला धडक दिली. या भीषण अपघातात अश्विनला आपला एक पाय गमवावा लागला. ही केवळ शारीरिक दुखापत नव्हती, तर त्यांच्या नात्याची सर्वात मोठी परीक्षा होती. हताश होऊन अश्विनने तिला स्वतःहून सोडून जाण्यास सांगितलं, पण तिने स्पष्ट शब्दांत नकार दिला. "काहीही झालं तरी मी कायम तुझ्यासोबतच राहीन" हा शब्द तिने पाळला.
अपघातानंतर मुलीच्या पालकांनी अश्विन आता तिच्या लायकीचा उरला नाही, असं म्हणत विरोध केला. पण तिने हार मानली नाही. अनेक वर्ष तिने आपल्या प्रेमासाठी लढा दिला. अखेर या दोघांनी लग्नगाठ बांधली. लग्नानंतर तिला जाणीव झाली की, खरं प्रेम हे छोट्या छोट्या गोष्टींत लपलेलं असतं, जिथे फक्त सुख असतं.
या जोडप्याची गोष्ट इन्स्टाग्रामवर 'POI' नावाच्या अकाउंटवरून शेअर करण्यात आली आहे. @adithya_chakkuu या इन्स्टाग्राम हँडलवर त्यांचे व्हिडीओ आणि फोटो लोकांची मनं जिंकत आहेत. अनेक युजर्सनी या प्रेमाला 'सत्य' म्हटलं आहे. एका युजरने लिहिलं की, "या पिढीतही दिलेले सर्वच शब्द खोटे नसतात." तर दुसऱ्याने म्हटलं की, "अशी माणसं आपल्याला आठवण करून देतात की, खरं प्रेम आजही अस्तित्वात आहे." ही गोष्ट सिद्ध करते की, जेव्हा प्रेम खरं असतं, तेव्हा जगातील कोणतंही वादळ फिकं पडतं.
